हिरवी राने, तरुण मने

प्रदीपकुमार माने(विज्ञान-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक)
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

निसर्गात राहणं आपल्याला फक्त शांतच बनवत नाही तर एकाग्रही बनवितं, आपलं मानसिक अन्‌ शारीरिक स्वास्थ्य वाढवतं आणि आपल्याला आनंदीही बनवितं, असं संशोधकांचं निरीक्षण आहे.

एकविसावं शतक हे धकाधकीचं शतक आहे. निवांत वेळ काढणं आज आपणा सर्वांसाठी अवघड अशी गोष्ट झालीय. कितीतरी दिवस किंवा महिने धावपळीत काढल्यानंतर आपण सुटी काढतो अन्‌ ट्रेकिंगला जातो, कुठल्यातरी जंगलात फिरायला जातो किंवा आपल्या मूळ गावी जाऊन येतो. अशा प्रकारची विश्रांती घेतल्यानंतर मग जरा हायसं वाटतं. पुन्हा उत्साह घेऊन आपण आपल्या कामावर परत येतो. पण हा उत्साह आपणाला कशामुळं येतो यावर आपण कधी विचार केलाय का? तुम्ही केला नसेल, पण संशोधक मात्र या गोष्टीचा विचार करतायत. ट्रेकिंग असूद्या किंवा जंगलातली सहल, गावाकडे निवांत राहणं असो वा शहरापासून दूर अशा फार्महाउसवर राहणं या सर्व गोष्टी मानवी जीवनावर कशा पद्धतीनं परिणाम करतात याचा संशोधक अभ्यास करतायत.

एकंदरीत निसर्गात राहणं मानवाच्या वर्तणुकीवर, शरीरावर किंवा मेंदूवर काय परिणाम करतं हा या संशोधकांच्या अभ्यासाचा विषय आहे. या संशोधकांचे निष्कर्ष खूपच मनोरंजक आहेत. या संशोधकांना आढळतंय, की निसर्गात राहिल्यामुळे थकवा तर दूर होतोच पण मेंदूची सर्जनशीलता आणि क्षमताही वृद्धिंगत होते. सतत शहरात राहिल्यामुळं येणारा ताण कमी होतो आणि मानसिक स्वास्थ्य मिळतं. डेव्हिड स्ट्रेअर या मेंदूशास्त्रज्ञाने याविषयीचे प्रयोग अलीकडेच केले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की निसर्गात राहिल्यामुळं मेंदूतला आज्ञानियंत्रण करणारा ‘प्रिफंट्रल कॉट्रेक्‍स’ हा भाग निष्क्रिय होऊन विश्रांत होऊ लागतो. त्याचा फायदा असा होतो, की मेंदूचा सतत विचारमग्न असणारा भाग आसपासच्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष देणारा भाग तणावपूर्ण स्थितीतून बाहेर येऊ लागतो. या सर्वांमुळे मेंदूला अन्‌ सर्व शरीराला विश्रांती मिळते. ही विश्रांती झोपल्यावर मिळते तशी नसून, उत्साह देणारी विश्रांती असते. ही मनाला आनंद देणारी असते. स्ट्रेअर यांनी हे सिद्ध करण्यासाठी एक प्रयोग केला. ते मानसशास्त्राच्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन ट्रिपला गेले. ही ट्रीप जंगलातील ट्रिप होती, या तीन दिवसांच्या ट्रिपहून परत आल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले आणि त्यांच्या मेंदूत काय बदल झालाय हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना असे आढळून आले, की शहरात राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जंगलातून फिरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या मेंदूत चांगलेच बदल दिसत होते. मेंदूचा सतत क्रियाशील असणारा भाग ‘प्रिफंट्रल कॉट्रेक्‍स’ हा शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिथिल झाला होता. इतकेच नव्हे तर कॉर्टीसॉल या तणाव निर्माण करणाऱ्या संप्रेरकाचे प्रमाणही त्यांच्या शरीरात कमी झालं होतं. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब यावरही आरोग्यदायी परिणाम दिसून येत होते. या संशोधनावरून आपल्या लक्षात येतं की जंगलात फिरणं, निसर्गरम्य स्थळांना भेटी देणं, आसपासच्या पार्कमध्ये फिरून येणं आपणाला उत्साही का बनवितं. जपानमधील शिबा विद्यापीठातील संशोधक योशुफुमी मियाझाकी म्हणतात त्याप्रमाणे मेंदू आणि शरीराचे इतर सर्व अवयव पाने, फुले, निसर्ग यावर प्रक्रिया करण्यासाठी उत्क्रांत झालेत. वाहनांचं ट्रॅफीक आणि शहरातल्या इमारतींशी ते रुळलेले नाही. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील ग्रेग ब्रॅटमन यांनी ३८ लोकांचा एक गट बनविला. या गटातील सर्व सदस्यांचा मेंदू सुखातील स्कॅन केला. या गटातील काहींना ९० मिनिटांसाठी वॉक घ्यायला सांगितले. काही जणांना शहरातील पार्कमध्ये तर काहींना ट्रॅफीकच्या रस्त्यावरून ९० मिनिटे वॉक घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा या सर्वांच्या मेंदूचे स्कॅन केले. त्यांना आढळून आलं, की जे लोक ट्रॅफीकमधून वॉक घेऊन आलेत त्यांच्या मेंदूतला प्रिफंट्रल कॉट्रेक्‍स प्रमाणापेक्षा जास्त सक्रिय दिसला, तर पार्कमधून आलेल्या लोकांच्या मेंदूतला प्रिफंट्रल कॉट्रेक्‍स सामान्य पातळीपेक्षा कमी सक्रिय झालेला दिसला. या अशा पद्धतीचे बरेचसे प्रयोग जगभरात विविध ठिकाणी होत आहेत. या प्रयोगातून संशोधकांच्या हे लक्षात येतंय, की निसर्गात राहणं मानवप्राण्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खूपच फायदेशीर आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ इक्‍सटर मेडिकल स्कूल यांना आढळून आलंय, की शहराच्या हिरवळ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य इमारतींनी गजबजलेल्या भागात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. जे लोक हिरवळीच्या भागात राहताहेत त्यांना कमी मानसिक तणाव दिसून आला. जरी या लोकांचे आर्थिक उत्पन्न कमी असले किंवा करिअर इतके उच्च पातळीचे नसले तरी. वैशिष्ट्य म्हणजे हे संशोधन या टीमने १० हजार लोकांचे सलग अठरा वर्षांसाठी केले. या इतक्‍या प्रदीर्घ कालावधीच्या संशोधनानंतर संशोधकांना असे निष्कर्ष प्राप्त झाले. या अशा प्रकारच्या संशोधनाबरोबर माटिल्डा बॉश्‍च या स्विडनमधील संशोधकानेही एक अनोखा प्रयोग केला. या संशोधकाने एका व्हर्च्युअल रूममध्ये विविध विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या टेस्ट घेतल्या आणि मुलाखतीही घेतल्या. जेव्हा या टेस्ट साध्या रूममध्ये घेतल्या तेव्हा विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला हे पाहिले आणि याच व्हर्च्युअल रूममध्ये त्यांनी कृत्रिम जंगलांचे वातावरण आणि त्याचा आवाज निर्माण केला आणि या वातावरणात या टेस्ट घेतल्या. या दोन्ही प्रकारे प्रयोग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की कृत्रिम जंगलाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे हृदयाचे ठोके संतुलित होते, मेंदू जास्त एकाग्र झाला होता आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मेंदूची विचारक्षमता आणि सृजनशीलता वाढलेली दिसली. निसर्गात राहणं आपल्याला फक्त शांतच बनवीत नाही तर एकाग्रही बनवितं, आपलं मानसिक अन्‌ शारीरिक स्वास्थ्य वाढवतं आणि आपल्याला तितकंच आनंदीत बनवीतं. बालकवींच्या ‘हिरवे हिरवे गार गालीचे’ या कवितेला वैज्ञानिक संदर्भ आहे म्हणावयाचा.

Web Title: pradeepkumar article