आइन्स्टाइन जेव्हा तुमच्यात अवतरतो...

प्रदीपकुमार माने
शनिवार, 1 डिसेंबर 2018

आभासी वास्तव तंत्रज्ञानामुळे ठराविक उपकरणांच्या साह्यानं आपण कुठल्याही व्यक्तीचं आभासी शरीर धारण करू शकतो. त्यामुळे आपल्यात आश्‍चर्यकारक बदल होतात आणि आतापर्यंत मेंदूनं न वापरलेल्या बौद्धिकक्षमता विकसित होऊ लागतात, असं प्रयोगांतून दिसून आलं आहे.  

आभासी वास्तव तंत्रज्ञानामुळे ठराविक उपकरणांच्या साह्यानं आपण कुठल्याही व्यक्तीचं आभासी शरीर धारण करू शकतो. त्यामुळे आपल्यात आश्‍चर्यकारक बदल होतात आणि आतापर्यंत मेंदूनं न वापरलेल्या बौद्धिकक्षमता विकसित होऊ लागतात, असं प्रयोगांतून दिसून आलं आहे.  

अ ल्बर्ट आइन्स्टाइन हे नाव ऐकताच आपल्यासमोर येतं ते एक अद्‌भुत व्यक्तिमत्त्व. असं व्यक्तिमत्त्व ज्यानं जगाकडे पाहायची आपली दृष्टीच बदलून टाकली, एवढंच नव्हे तर तो आपल्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे जिवंत दंतकथा बनला. त्यामुळेच तर आइन्स्टाइन म्हटलं की, आजही आपल्यासमोर ‘सुपरमॅन’ची प्रतिमा येते. असा हा ‘सुपरमॅन’ आइन्स्टाइन आपल्या अंगात आला तर? किंवा आपणच त्याच्या अंगात गेलो तर? आता कुणी म्हणेल हे कसं शक्‍य आहे? सुरवातीला ही गोष्ट अतर्क्‍य, अवैज्ञानिक वाटते, पण अशी गोष्ट विज्ञानानंच शक्‍य करून दाखविली आहे.
‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ म्हणजेच आभासी वास्तव तंत्रज्ञानानं ठराविक उपकरणांच्या साह्यानं आपण कुठल्याही व्यक्तीचं आभासी शरीर धारण करू शकतो आणि आपल्या शरीराला जोडलेल्या संवेदकांद्वारे आपण त्या आभासी शरीराला जोडले जाऊ शकतो. हे इतक्‍या कार्यक्षमतेनं होऊ शकतं, की आपलं शरीर आणि आभासी शरीर एकच होऊन जातं. संगणकीय प्रणालीच्या साह्यानं निर्माण केलेलं हे आभासी शरीर आपल्या शरीराशी जोडलं गेल्यामुळे आपण हालचाल करू, तसं ते हालचाल करू लागतं. ते आभासी शरीर आपल्या शरीरापेक्षा वेगळं असलं तरी आपल्या आणि त्याच्या सारख्या होणाऱ्या हालचालींमुळे आपल्याला ते शरीर आपलंच आहे असं वाटू लागतं. डोक्‍यावर परिधान केलेल्या हेल्मेटमधून (हेड माऊंटेड डिस्प्ले) आपण स्वतःकडे पाहू लागतो, तेव्हा आपल्याला स्वतःचं शरीर न दिसता आभासी शरीर दिसू लागतं. प्रयोगशाळेतील विशेष आरशात आपण पाहतो, तेव्हा तिथंही आपल्याला तेच आभासी शरीर दिसू लागतं. एका अर्थानं आपलं शरीर त्या आभासी शरीराचा अवतार धारण करतं असं म्हणायला हरकत नाही आणि असं धारण केलेलं शरीर जगातील सर्वांत बुद्धिमान अशा आइन्स्टाइनचं असेल तर? तात्पुरतं का होईना असं शरीर धारण केल्यानं आपल्यात काय फरक पडेल? हे शोधण्याचा प्रयत्न बार्सिलोना विद्यापीठातील डॉम्ना बानबाऊ, समीर किशोर आणि मेल स्लॅटर या संशोधकांनी केला. त्यांना असं दिसून आलं की थोडा वेळ का होईना आइन्स्टाइनचं आभासी शरीर धारण केल्यामुळे आपल्यात आश्‍चर्यकारक बदल होऊ लागतात. आजपर्यंत मेंदूनं न वापरलेल्या बौद्धिक क्षमता विकसित होऊ लागतात. एका अर्थानं आपण आइन्स्टाइन आहोत, ही कल्पनाच मेंदूला आपल्या क्षमता चांगल्या रीतीनं वापर करण्याची प्रेरणा देऊ लागते. आपण आपल्याला काय समजतो याचा आपल्या बौद्धिक क्षमतांवर परिणाम होतो. हा निष्कर्ष क्रांतिकारी आहे. मानवी मेंदू, त्याची शरीराची धारणा आणि त्यानुसार त्याच्या वर्तणुकीत होणारे बदल समजून घेण्यासाठी हा निष्कर्ष महत्त्वपूर्ण आहे. ‘फ्रंटिअर्स इन सायकॉलॉजिया’ या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

बानबाऊ, किशोर आणि स्लॅटर या शास्त्रज्ञत्रयीनं बार्सिलोना विद्यापीठातील तीस विद्यार्थ्यांवर हा प्रयोग केला. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी तरुण म्हणजे १८ ते ३० वयोगटातील होते. हे तरुण निवडण्यामागं आणखी एक उद्देश होता, तो म्हणजे तरुणांचा ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो, हेही या संशोधकांना पाहायचं होतं. आइन्स्टाइनचं आभासी शरीर एका बुद्धिमान व्यक्तीचंच नव्हे, तर ज्येष्ठाचंही शरीर होतं. या प्रयोगातून असं दिसून आलं, की आइन्स्टाइनचं शरीर धारण केल्यामुळे बौद्धिक क्षमता तर सुधारतेच; पण तरुणांचा ज्येष्ठांकडं पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो आणि तो पहिल्यापेक्षा सकारात्मक बनतो. पण हा दृष्टिकोन तपासणं ही प्रयोगातील महत्त्वपूर्ण बाब नव्हती. प्राधान्याची बाब होती ती आइन्स्टाइनच्या शरीराचा बौद्धिक क्षमतेवर होणारा परिणाम तपासणे. ज्या तीस विद्यार्थ्यांवर हे प्रयोग केले, त्यांचे दोन गट करण्यात आले. पंधरा-पंधरा जणांचे. एका गटाला आइन्स्टाइनचं आभासी शरीर धारण करावयास दिलं, तर दुसऱ्या गटाला त्यांच्याच वयोगटातील सामान्य क्षमता आहेत, असं वाटणाऱ्या व्यक्तीचं शरीर धारण करावयास दिलं. प्रयोगापूर्वी आणि प्रयोगानंतर त्यांच्यात झालेले बदल पाहण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी, ज्येष्ठांकडे पाहावयाची दृष्टी आणि स्वतःच स्वतःचं मूल्यमापन करणारी आत्मप्रतिष्ठा चाचणी, अशा तीन चाचण्या घेण्यात आल्या. या दोन्ही चाचण्यांमधील फरकांमध्ये आमूलाग्र बदल दिसून आला. मात्र, ज्या पंधरा जणांच्या गटाला सामान्य व्यक्तीचेच शरीर धारण करावयास दिले, त्यांच्यात असा बदल दिसला नाही. फरक झालेल्या विद्यार्थ्यांतही एक विशेष गोष्ट दिसून आली. जे विद्यार्थी आपण स्वतः कुणी नाही असे समजतात, त्यांच्यात जास्त बौद्धिक बदल दिसला. याचाच अर्थ ज्यांची स्वतःबाबत आत्मप्रतिष्ठा कमी आहे, त्यांच्यात हा बदल जास्त दिसला. ज्या विद्यार्थ्यांची आत्मप्रतिष्ठा चांगली आहे, त्यांच्यात असा विशेष बदल दिसला नाही. कमी आत्मप्रतिष्ठा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आइन्स्टाइनचं शरीर धारण केलं, तेव्हा ‘आपण कोणातरी विशेष आहोत’ ही जाण वाढल्यामुळे त्यांच्या बौद्धिक क्षमता वाढलेल्या दिसल्या. या प्रयोगावरून असं लक्षात येतं, की मानवी बौद्धिक क्षमतांचा (इतरही क्षमतांचा) व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेशी संबंध आहे. व्यक्तीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन जितका सकारात्मक, जितकी त्याची प्रेरणाशक्ती जास्त, तितका त्याचा फायदा त्याच्या बौद्धिक विकासासाठी होतो. २०१५ मध्ये ओशिमो या संशोधकानं असाच प्रयोग केला होता. या प्रयोगात सिग्मंड फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाचं आभासी शरीर धारण करावयास दिलं होतं. या प्रयोगातही संशोधकांना असेच निष्कर्ष मिळाले होते. आपण फ्रॉईड आहोत, या कल्पनेचा सहभागकर्त्यांवर चांगला परिणाम दिसला. त्यांना आढळून आलं की सहभागकर्त्यांनी त्यांच्यासमोर उपस्थित केलेल्या मानसिक समस्यांवर प्रभावी उत्तरं शोधली होती. एकंदरीत कुठल्याही व्यक्तीला आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी आपण कुणीतरी आहोत, ही जाणीव प्रेरणास्थानी असते. शिक्षण क्षेत्र, व्यक्तिमत्त्व विकास, मानवी वर्तणूक या सर्व ठिकाणी मिळालेले निष्कर्ष दिशादर्शक आहेत. यातून असं लक्षात येतं, की कुठल्याही व्यक्तीच्या क्षमता विकसित करणं जितकं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं आहे त्याची स्वतःकडे पाहण्याची आत्मप्रतिष्ठा घडविणं. कारण शेवटी क्षमता विकसित करण्याची प्रेरणा तिच्यातूनच मिळत असते. चांगले विद्यार्थी घडविणं, व्यक्तिमत्त्व विकास करणं याचा पाया तोच आहे. क्षमताकेंद्री शिक्षण देणं जितकं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं आहे क्षमतांना प्रेरणा देणारी आत्मप्रतिष्ठाकेंद्री शिक्षणव्यवस्था. याबरोबरच आणखी एका क्षेत्रात या आभासी वास्तव तंत्रज्ञानाच्या शक्‍यता निर्माण होतात, त्या म्हणजे मानसोपचार क्षेत्रात. या तंत्रज्ञानाच्या साह्यानं व्यक्तीमधील अहंगंड, न्यूनगंड यांनी दिशा देण्याचं काम होऊ शकतं. मानसोपचार क्षेत्रात प्रोग्रॅमिंग करण्यासाठी हे तंत्रज्ञान मोलाचं ठरू शकतं. कुठलंही तंत्रज्ञान मानवी बदल करण्यासाठी सकारात्मक रीतीनं उपयोगी पडतं तेव्हा त्याचं सार्थक होतं, असं म्हणायला हरकत नाही. अंडर्स इरिक्‍सन हा शास्त्रज्ञ  ‘पिक - सिक्रेटस फ्रॉम द न्यू सायन्स ऑफ इक्‍सपर्टीज’ या पुस्तकात म्हणतो ते मानव आणि तंत्रज्ञान दोघांनाही तितकंच लागू पडतं- ‘‘क्षमता शोधण्यापेक्षा त्या विकसित करणं हे मानवी प्रयासाचं उद्दिष्ट असावयास हवं.’’

Web Title: pradeepkumar mane write aainstine article in editorial