सेवा- शुश्रुषेची मुंग्यांमध्येही संस्कृती

प्रदीपकुमार माने
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

इवल्याशा मुंग्या लढाईत जखमी झालेल्या आपल्या सहकारी मुंग्यांची काळजी घेतात, त्यांची सेवा-शुश्रुषा करतात अन्‌ तीही एखाद्या नर्सिंग होमसारखी! ही गोष्ट खरोखरच चकित करणारी आहे. त्यामुळं ‘मुंगी’ आणि ‘अद्‌भुतता’ हे शब्द समानार्थी आहेत असं म्हणावं लागेल.

इवल्याशा मुंग्या लढाईत जखमी झालेल्या आपल्या सहकारी मुंग्यांची काळजी घेतात, त्यांची सेवा-शुश्रुषा करतात अन्‌ तीही एखाद्या नर्सिंग होमसारखी! ही गोष्ट खरोखरच चकित करणारी आहे. त्यामुळं ‘मुंगी’ आणि ‘अद्‌भुतता’ हे शब्द समानार्थी आहेत असं म्हणावं लागेल.

‘मुंगी’ आणि ‘अद्‌भुतता’ हे दोन शब्द समानार्थी आहेत, असं म्हणायला पाहिजे. याचं कारण म्हणजे मुंग्यांच्या जगातील अद्‌भूत गोष्टी. मानवाप्रमाणेच त्यांच्यात वैयक्तिक ‘कोचिंग क्‍लासेस’ असतात, आत्मबलिदान करणाऱ्या ‘मुंगीबॉम्ब’ असतात, एवढेच नव्हे तर त्यांच्यात ‘नर्सिंग होमही’ असतं. आपल्या जखमी सहकाऱ्यांची शुश्रुषा करणं माणसाचा स्थायीभाव आहे, पण असे करणारा मानव हा एकच जीव नाही. मुंग्याही आपल्या जखमी सहकाऱ्यांची सुश्रुषा करतात, ही गोष्ट इरिक फ्रॅंक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनामुळं समजू शकली. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटी’ या लंडनस्थित आंतरराष्ट्रीय पत्रिकेत हे संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झालंय. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही गोष्ट समोर आली. आफ्रिकेतील सहारा वाळवंटातील ‘मेटॅबिली’ (शास्त्रीय नाव मेगापोनेरा ॲनॅलिस) या प्रजातीत त्यांना ही गोष्ट आढळून आली.

मेटॅबिली ही मुंग्यांची प्रजाती आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. आफ्रिकेमधील मेटॅबिली या आक्रमकतेने शिकार करणाऱ्या आदिवासींवरून त्यांना हे नाव दिले गेले आहे. समोर येईल त्याचा फडशा पाडणं ही या मुंग्यांची नीती असली, तरी वाळवी तिला खूपच आवडते. त्यामुळे तर मेटॅबिलीच्या वारुळातील गुप्तचर मुंग्या वाळवीच्या शोधात असतात. वाळवीचं वारूळ सापडायचा अवकाश, की लगेच गुप्तचर मुंग्या वारुळात येऊन निरोप देतात. एक ठराविक पद्धतीचं रसायन सोडून हा संदेश दिला जातो. हा संदेश मिळताक्षणीच वाळवीवर हल्ला करणाऱ्या सैनिक मुंग्या गोळा होतात. या सैनिकांना गुप्तचर मुंग्या वाळवीच्या वारुळाकडे घेऊन जायला लागतात. सैनिक मुंग्यांची फौजही मोठी असते. एकावेळी या फौजेमध्ये दोनशे ते सहाशेपर्यंत सैनिक असू शकतात. हे सैनिक वाळवीच्या वारुळाजवळ पोचताच सैनिक मुंग्यांतील मोठ्या सैनिक मुंग्या वारुळाची प्रवेशद्वारे फोडायला सुरवात करतात. वाळवीचं वारूळ फोडणं सोपी गोष्ट नाही. कारण काहीवेळा ही वारुळं सिमेंटइतकी टणक असतात. आपल्या ताकदीच्या जोरावर मोठ्या सैनिक मुंग्या ती फोडतात. आता पुढचं काम असतं, वारुळात आत हल्ला करणे.

वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे मोठे सैनिक आत हल्ला करत नाहीत, तर लहान आणि मध्यम आकाराच्या मुंग्या हल्ला करतात. मेटॅबिली मुंगी आक्रमक असली, तरी वारुळातली वाळवी तिच्यावर तुटून पडते. मुंगी आणि वाळवी यांच्यात घनघोर लढाई सुरू होते. तासाभराच्या या लढाईत वाळवीतील सैनिक ताकदवान असूनही त्यांचा मुंग्यांपुढे टिकाव लागत नाही. मग मारलेल्या आणि जखमी वाळवीला वारुळाबाहेर आणून टाकले जाते. मुंग्यातले मोठे सैनिक याचीच वाट पाहत असतात. वाळवीच्या वारुळातून सैनिक वाळवीच नव्हे, तर अंडी, डिंभ हेही बाहेर आणलं जातं. प्रथिनांनी समृद्ध असलेलं वाळवीचं शरीर मेटॅबिली मुंग्यांना खाद्य म्हणून आवडतं. तेव्हा गोळा केलेली ही वाळवी मोठे सैनिक आपल्या वारुळाकडे न्यायला सुरवात करतात. पण असं करण्याआधी ते एक गोष्ट करायला  विसरत नाहीत, ती म्हणजे वारुळात लढणाऱ्या योद्‌ध्यांची ठिकाणं पाहणं. घनघोर लढाईमुळं काही योद्‌ध्यांचे पाय तुटलेले असतात, काहींचं पोट फाटलेलं असतं, तर काहींचं मुंडकं तुटलेलं असतं. काही योद्‌ध्या मुंग्यांच्या शरीरांना अजूनही सैनिक वाळवीनं पकडून ठेवलेलं असतं. या सगळ्या जखमी योद्‌ध्यांना मोठ्या सैनिक मुंग्या उचलून घेतात आणि वारुळाकडे जातात.
या लढाईत जास्त गंभीर जखमी झालेल्या मुंग्यांचं काय होत असेल? आश्‍चर्य वाटेल, की ज्या मुंग्या घरी नेऊनसुद्धा जगण्याची शक्‍यता नसते, त्यांच्याकडं मोठ्या सैनिक मुंग्या दुर्लक्ष करतात. नेण्याचा प्रयत्न झाला, तरी गंभीर जखमी मुंग्या त्यांना अजिबात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुंग्या नेणं आपोआपच टाळलं जातं. कमी जखमी झालेल्या मुंग्यांबाबतीत असे घडत नाही, याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे या मुंग्यांची संदेशवहन प्रणाली. जखमी झालेल्या मुंग्या त्या जिथं असतील तिथूनच ‘आम्ही इकडे आहोत, आम्हाला मदत करा,’ असा संदेश देणारे फेरोमेन म्हणजे रसायन सोडतात. या रसायनांच्या वासावरच मोठ्या सैनिक मुंग्या त्यांना शोधतात. मुंग्यांच्या या कुशल संदेशवहनामुळे वाळवीच्या वारुळात अडकलेल्या मुंग्यांनाही सोडविले जाते. दुसरे म्हणजे कमी जखमी मुंग्या की ज्यांचे एक-दोन पाय तुटलेले असतात, त्या मुंग्या मोठ्या सैनिक मुंग्या दिसताक्षणीच आहे त्यापेक्षा जास्तच लडबडून दाखवितात. असं केल्यामुळं मोठ्या सैनिक मुंग्यांचं त्यांच्याकडं लगेच लक्ष जाते. तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या सैनिक मुंग्या जखमी मुंग्यांना उचलून घेतात, तेव्हा जखमी मुंग्या त्यांना सहकार्य करतात. आपलं शरीर त्या आखडून घेतात, जेणेकरून त्यांना उचलून नेणं सोपं होईल. या सर्वांमुळे सर्व जखमी झालेल्या मुंग्यांना मोठ्या सैनिक मुंग्या वारुळाकडे नेऊ लागतात. पुन्हा एकदा कुणी राहिलेय काय याचीही खात्री केली जाते. सर्व मुंग्या पकडलेल्या वाळवीसह आपल्या वारुळाकडे परत जायला लागतात. एखाद्या लष्कराप्रमाणं हे सर्व चित्र वाटतं.
या जखमी मुंग्या वारुळात नेऊन त्यांचं काय केलं जातं, याही प्रश्‍नाचा इरिक फ्रॅंक यांनी पाठलाग करायचा ठरविला. सलग तीन वर्षांच्या प्रयत्नांतून याचं उत्तर त्यांना मिळालं. त्यांना दिसून आलं, की नेल्यानेल्या वारुळातल्या नर्स मुंग्या त्यांची देखभाल करू लागतात. त्यांच्या जखमा साफ केल्या जातात. त्यानंतर जखमेची जागा थोड्याथोड्या वेळाने चाटत राहतात. मुंग्या असं बरं का करत असतील, याचा संशोधकांनी शोध घेतल्यावर त्यांना समजलं, की या चाटण्यामुंळं जखमेत संसर्ग होत नाही. जखमी मुंग्यापैकी बऱ्याचशा मुंग्या चोवीस तासांच्या आतच पुन्हा काम करू लागतात. ज्या मुंग्यांना वाळवीनं पकडलेलं असते, ती वाळवीही तिच्या शरीरापासून वेगळी केली जाते. संशोधकांनी जखमी मुंग्यांना नर्स मुंग्यांनी चाटले नाही तर काय होते हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांना दिसले, की चाटलेल्या मुंग्यांतील नव्वद टक्के जखमी मुंग्या बऱ्या होतात, तर ज्यांना चाटले जात नाही त्यातल्या ऐंशी टक्के मुंग्या संसर्ग होऊन मरतात. याचाच अर्थ चाटण्यातून नर्स मुंग्या प्रतिजिवाणू किंवा प्रतिकवक औषध देत असाव्यात. या गोष्टीचा अभ्यास अजून सुरू आहे. असे असेल तर मुंग्यांचे होम फक्त नर्सिंग होमच नाही, तर एक प्रकारचं हॉस्पिटलच म्हणावे लागेल. मुंग्या आपल्या सहकाऱ्यांची शुश्रुषा करतात ही गोष्ट खरोखरच चकित करणारी आहे. मानव सोडला तर मुंगी हा दुसरा जीव आहे, ज्याच्यामध्ये जखमी सहकाऱ्यांची काळजी घेतली जाते अन्‌ तीही नर्सिंग होमसारखी! म्हणून तर ‘मुंगी’ आणि ‘अद्‌भुतता’ हे शब्द समानार्थी आहेत असं म्हणावं लागेल.

Web Title: pradipkumar mane write article in editorial