राजकारणातील बदसूर

‘निवडणूक हे लढण्याचे साधन न होता त्याला खेळाचे स्वरूप प्राप्त व्हावे’, असे विनोबा भावे यांनी म्हटले होते. आज त्या संदेशाची कधी नव्हे एवढी तीव्रतेने आठवण होत आहे.
 Politics
Politicssakal
Summary

‘निवडणूक हे लढण्याचे साधन न होता त्याला खेळाचे स्वरूप प्राप्त व्हावे’, असे विनोबा भावे यांनी म्हटले होते. आज त्या संदेशाची कधी नव्हे एवढी तीव्रतेने आठवण होत आहे.

‘निवडणूक हे लढण्याचे साधन न होता त्याला खेळाचे स्वरूप प्राप्त व्हावे’, असे विनोबा भावे यांनी म्हटले होते. आज त्या संदेशाची कधी नव्हे एवढी तीव्रतेने आठवण होत आहे. संसदीय लोकशाहीत ‘विरोधक’ असतात, ‘प्रतिस्पर्धी’ असतात, पण ‘शत्रू’ कोणीच कोणाचा नसतो. पण हे भान अलीकडे विसरले जाऊ लागले आहे की काय, असे राजकीय चर्चाविश्वाच्या घसरत्या दर्जावरून वाटते. निवडणुका येतात अन् जातात. एकदा का निकाल लागले, की सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या खुर्चीवर बसतात. कारभाऱ्यांवरील एक अंकुश म्हणून विरोधकांना या व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. पण त्यामागचा हेतू निर्णयप्रक्रिया अधिकाधिक लोकाभिमुख राहावी हा आहे. पण अलीकडे मात्र विरोधासाठी विरोध हा प्रकार वाढतो आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत तसे चित्र पाहायला मिळते. या सगळ्यातून नुकसान होते, ते जनतेचेच. राजकारणातील खिलाडूवृत्ती लोप पावते आहे.

सत्ताधाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतला, की त्यातील दोष विरोधकांनी दाखवायलाच हवेत. पण विरोधासाठी विरोध न करता, या निर्णयात कशी दुरुस्ती करता येईल, हे सांगायला हवे. पण ते सांगितले जात नाही. या सगळ्याचा परिणाम सार्वजनिक चर्चांमध्ये आणि अगदी विधिमंडळाच्या कामकाजावरही झालेला दिसतो.

सध्या व्यक्तिद्वेषाचे राजकारणच अधिक होताना दिसत आहे. ही प्रवृत्ती बहुतेक सगळे पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यात दिसते. जाहीर सभांमधून विरोधकांचा सभ्य भाषेत समाचार घेण्याऐवजी ‘अरे-तुरे’ची भाषा वापरून, आपण किती महान नेते आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी एका माजी मुख्यमंत्र्यांनी अशी अरे-तुरेची भाषा वापरली. ती लोकांना मान्य झाली नाही. दुसऱ्या बाजूला शिवसेनचे काही जणही त्याच पद्धतीच्या भाषेचा अवलंब करताना दिसतात. त्याची कितीतरी उदाहरणं देता येतील. वाचाळवीरांची सध्या काही कमी नाही. तुलनेने जे मवाळ नेते असतात, जे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडून भाषा किंवा शब्द सांभाळून उच्चारले जातात. उचलली जीभ लावली टाळ्याला, असे होत नाही. पण काहींना लवकर प्रसिद्धीसाठी सनसनाटी आणि खळबळजनक वक्तव्ये करण्याचा मोह होतो.

महाराष्ट्राने अनेक उत्तुंग नेते पाहिले आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख, रामभाऊ म्हाळगी, हशू अडवानी किंवा राम कापसे या नेतेमंडळींनी बोलताना लक्ष्मणरेषा त्यांनी कधी ओलांडली नाही. ते विरोधकांची खिल्ली उडवत, त्यांना कोंडीत पकडत, आक्रमक होत; पण शब्द जपून वापरत. अनवधानाने शब्द गेला तर दिलगिरी व्यक्त करीत. राजकारणाला खेळाचे स्वरूप येण्याऐवजी दिवसेंदिवस द्वेषाच्या राजकारणाला अधिक प्रतिष्ठा मिळत आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी एक आठवण सांगितली. एकदा साखर संघाच्या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काही नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख काहीसे उशिरा आले. ते जेव्हा व्यासपीठाकडे आले, तेव्हा सर्वप्रथम शरद पवार त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. कोण मोठा- कोण लहान, हा मुद्दा येथे नव्हता, तर मुख्यमंत्रिपदाला मान होता. या पदाचा आदर त्यांनी केला होता. पण अशा घटनांतून काही शिकावे, याची फारशी कोणाला जाणीव असल्याचे दिसत नाही. नरेंद्र मोदींविषयी कितीही मतभेद असले तरी ते पंतप्रधान आहेत. त्या पदावर असलेल्या व्यक्तीविषयी बोलताना जपूनच बोलले पाहिजे. टीका करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे; पण शब्द कोणते वापरावे, हे तरी कळायला हवे की नको?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com