विवेकाचा आवाज

रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये ज्या मुलांना झळ बसली आहे, जे विस्थापित झाले आहेत, अशा मुलांना पुन्हा उभे करण्यासाठी हे पदक विक्रीस काढल्याचे त्यांनी थेटपणे जाहीर केले आहे.
Prasad Inamdar writes Dmitry Muratov senior Russian journalist sells nobel peace prize for ukrainian children
Prasad Inamdar writes Dmitry Muratov senior Russian journalist sells nobel peace prize for ukrainian childrensakal
Summary

रशियन दैनिक ‘नोव्हाया गॅझेटा’चे मुख्य संपादक असलेले मुरातोव्ह यांनी हेच नोबेल विक्रीस काढल्यामुळे जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये ज्या मुलांना झळ बसली आहे, जे विस्थापित झाले आहेत, अशा मुलांना पुन्हा उभे करण्यासाठी हे पदक विक्रीस काढल्याचे त्यांनी थेटपणे जाहीर केले आहे.

भूमिका घेणं आणि घेतलेल्या भूमिकेप्रमाणे वागणं हे अलीकडील सर्वात दुर्मिळ बाब. तसेच विवेक शाबूत ठेवून वाटचाल करणं, विवेक जपणं हेही मोठं कसरतीचं. पण काही व्यक्तिमत्व बोलतात तशीच वागतात आणि प्रसंगी त्यासाठी मोलही देतात. रशियातील ज्येष्ठ पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांनी नुकत्याच केलेल्या एका कृतीमुळे ते जगाच्या पटलावर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. संपूर्ण जगाने वर्षभरापूर्वीच त्यांच्या कामगिरीची दखल घेत ‘नोबेल’च्या रुपाने त्यांचा सन्मान केला होता. ‘लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सातत्याने उठविलेल्या आवाजाबद्दल आणखी एक पत्रकार मारिया रेसा यांच्यासोबत संयुक्तपणे २०२१ चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला होता. रशियन दैनिक ‘नोव्हाया गॅझेटा’चे मुख्य संपादक असलेले मुरातोव्ह यांनी हेच नोबेल विक्रीस काढल्यामुळे जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये ज्या मुलांना झळ बसली आहे, जे विस्थापित झाले आहेत, अशा मुलांना पुन्हा उभे करण्यासाठी हे पदक विक्रीस काढल्याचे त्यांनी थेटपणे जाहीर केले आहे. या पदकाच्या लिलावातून उभी राहणारी रक्कम युनिसेफकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

मूलतः अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची वृत्ती असलेलेल दिमित्री आंद्रेयेविच मुरातोव्ह यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९६१ मध्ये कुयबिशेव्ह येथे एका रशियन कुटुंबात झाला. कुयबिशेव्ह स्टेट विद्यापीठातून शिक्षण घेत असताना त्यांना पत्रकारितेत रस निर्माण झाला. शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रांतून अर्धवेळ नोकरीही केली. १९८५मध्ये पदवी प्राप्त झाल्यानंतर सोव्हिएत सैन्यात दळणवळण उपकरण सुरक्षा तज्ज्ञ म्हणून काम पाहिले. १९८७ मध्ये ते तेथून बाहेर पडले आणि एका वृत्तपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम करू लागले. त्यांच्या वर्षभरातील कामाने प्रभावित होऊन त्यांना ‘वृत्तलेखांचे संपादक’ म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर ते स्वतंत्रपणे काम करू लागले. बेधडक पत्रकार म्हणून त्यांची ओळख होऊ लागली. तेथून ते दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम सादर करू लागले. १९९३ मध्ये त्यांनी लोकशाही समर्थक पत्रकारांना एकत्र केले आणि ‘नोवाया गॅझेटा’ वर्तमानपत्राची स्थापना केली. १९९५ ते २०१७ तसेच २०१९ नंतर मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. या कालावधीत सरकारमधील गैरव्यवहार, सरकारकडून होत असलेले मानवी हक्कांचे उल्लंघन, निवडणुकांतील गैरव्यवहार, पोलिसांकडून होत असलेले हिंसाचार बाहेर काढून त्यावर त्यांनी कडाडून प्रहार केला. पुतिन यांच्या एकूण कारभारावर सातत्याने बोट ठेवले. सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे एक संवेदनशील वृत्तपत्र अशी ओळख दृढ करण्यात ते यशस्वी ठरले त्यामुळेच रशियाच्या एकूण पत्रकारितेवर या वृत्तपत्राचा मोठा प्रभाव आहे.

युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर सर्वात प्रथम मुरातोव्हा यांनी सरकारच्याविरोधात भूमिका घेत टीका केली होती. दोन दशकांपूर्वी पुतीन सत्तेत आल्यापासून मुरातोव्हा यांच्या वृत्तपत्रासाठी काम केलेल्या चार जणांसह २४ वर पत्रकार मारले गेले आहेत. यातूनच रशियात व्यक्तिस्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी स्पष्ट होते. मुरातोव्ह यांच्यावरही अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.पण विवेकाचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याला भीक न घालता वाटचाल करतच राहू असेच त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे आणि साऱ्या जगाने त्यांच्या या कृतीला जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com