भरडधान्यांची ‘गुड मॉम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरडधान्यांची ‘गुड मॉम’

भरडधान्यांची ‘गुड मॉम’

- प्रसाद माळी

पारंपरिक नोकरी-व्यवसायाच्या पलीकडचा विचार करत अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. पुण्याच्या शर्मिला ओसवाल या त्यापैकीच एक. कोकणात राहिलेल्या शर्मिला यांना लहानपणापासून कृषिक्षेत्राची प्रचंड आवड. अलीबागजवळचे पोयनाड हे त्यांचे गाव. हीच आवड करिअरमध्ये बदलवत त्यांनी भरडधान्याला जागतिक ब्रॅण्ड बनवला आहे. आपल्या मुलासह सुरू केलेल्या स्टार्टअपची आंतरराष्ट्रीय पोषक अन्नधान्य वर्ष २०२३ निमित्त केंद्र सरकारकडून भरडधान्याच्या प्रचारासाठी निवड झाली.

कोकणात बालपण गेलेल्या शर्मिला यांनी शिक्षणात चांगली प्रगती करीत हार्वर्ड विद्यापीठातून उच्चशिक्षण पूर्ण केले. काही काळ त्या कॅनडा, ब्रिटनमध्ये वास्तव्यास होत्या. पुढे लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या; मात्र लहानपणापासून कृषी क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने त्यांनी मुलगा शुभमसोबत ‘बॅसिलिया ऑरगॅनिक्स’ ही स्टार्टअप कंपनी सुरू केली.

या कंपनीद्वारे भरडधान्याच्या बियाण्यांची गुणवत्ता, पेरणी तंत्रज्ञान, सिंचन, काढणीपश्चात मार्केटिंग, पौष्टिक धान्यापासून सकस आणि चविष्ट अन्नपदार्थ निर्मिती आदी विविध टप्प्यांवर त्या शेतकरी आणि महिला बचत गटांसोबत काम करत आहेत, त्यांना प्रशिक्षणही देत आहेत. तसेच त्यांच्या कंपनीकडून ‘गुड मॉम’ या ब्रॅण्डच्या भरड धान्यासह ज्वारी, बाजरी, नाचणी आदी सेंद्रिय धान्याचे उत्पादन आणि विक्रीही केली जाते. दर्जेदार आणि गुणात्मक उत्पादनांमुळे अल्पावधीतच शर्मिला यांच्या स्टार्टअपने देश-विदेशात नावलौकिक मिळवला.

शर्मिला यांच्या दर्जेदार उत्पादनांची कृषी मंत्रालयानेही दखल घेतली आणि ‘आयआयएमआर-आयसीएआर न्यूट्रिहब’च्या वतीने सर्वोत्तम स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर मागील वर्षी दिल्लीत झालेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ‘पीएम किसान सन्मान संमेलना’त या स्टार्टअपची निवड झाली होती.

संमेलनात सहभागी निवडक पाच स्टार्टअप कंपन्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संवाद साधत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यात शर्मिला यांच्या स्टार्टअपचाही समावेश होता. मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांच्या कामाचा उल्लेख केला.

जागतिक पातळीवर पोषक अन्नधान्याच्या प्रचारासाठी केंद्र सरकारतर्फे या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पोषक अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे.

त्यानिमित्त जागतिक स्तरावर पोषक धान्य असलेल्या भरड धान्याचा प्रचार करण्याची संधी शर्मिला यांना मिळाली आहे. सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य जगभरातील नागरिकांना मिळणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्यामुळे या स्टार्टअपच्या माध्यमातून भरडधान्यांच्या क्षेत्रातील कामाची व्याप्ती आणखी वाढवली जाणार आहे. ग्राहकांसोबतच उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा, हाच आमचा उद्देश असल्याचे शर्मिला सांगतात. औषधविरहित आयुष्य जगायचे असेल तर भरडधान्याचे सेवन हा जीवनशैलीचा भाग बनवला पाहिजे, असे त्या सांगतात.

‘सर्व प्रकारचे फायबर, मॅग्नेशियम,पोटॅशियम,लोह हे पोषकद्रव्ये भरडधान्यांत असतात.जीवनसत्त्वांसाठी औषधांचा वापर करण्याऐवजी या धान्याचा आहारात समावेश केल्यास चांगला लाभ होतो. महिलांसाठी तर हे विशेष लाभाचे आहे आणि भरडधान्याधारित खाद्यापदार्थांची निर्मिती, पॅकेजिंग आदी कामांतही महिलांना चांगल्या संधी आहेत’, हे शर्मिला यांचे सांगणे आहे. त्यासाठी जागृती व प्रशिक्षणावर त्यांचा भर आहे.