esakal | मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चंदेरी पर्व’
sakal

बोलून बातमी शोधा

Annasaheb-Deulgaonkar

अष्टपैलू कामगिरीने मराठी चित्रपटसृष्टीवर आपली लखलखीत नाममुद्रा उमटवणाऱ्या अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या  जन्मशताब्दीची आज (२२ ऑगस्ट) सांगता. त्यानिमित्त कन्येने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा. 

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चंदेरी पर्व’

sakal_logo
By
प्रीती वडनेरकर

मराठी चित्रपटसृष्टीतलं एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णासाहेब देऊळगावकर. कथा, पटकथा, संवादलेखक, गीतकार, निर्माता, वितरक ह्या सर्वात उत्तम यश मिळवून, त्यांनी जवळपास २५ चित्रपटांचं लेखन केलं. १९४८ ते १९९८ हा पन्नास वर्षांचा काळ त्यांनी गाजवला. प्रथम ‘माणिक चित्र‘साठी पटकथा लेखन, निर्मिती, वितरण, त्यानंतर पुढे स्वतंत्र लेखन, गीतलेखन. ‘माणिक चित्र’चे बहुतांश चित्रपट पौराणिक होते. काही सामाजिक होते. ते सर्वच्या सर्व रौप्य महोत्सवी झाले. 

त्यांचे गाजलेले स्वतंत्र चित्रपट म्हणजे ‘सुभद्रा हरण’,‘थापाड्या’, ‘सतीचं वाण’, ‘भक्त पुंडलिक’, ‘सासुरवाशीण’, ‘सतीची पुण्याई’, ‘लेक चालली सासरला’, ‘धूमधडाका’, ‘दे दणादण‘, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरा बायको’, ‘नशीबवान’, ‘माहेरची साडी’, ‘कुंकू’ आणि ‘साखरपुडा’. त्यांना मानाचे व्ही. शांताराम पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार मिळाले.  लक्ष्मीकांत बेर्डे, नितीश भारद्वाज, मोहन जोशी, अलका कुबल, सविता प्रभुणे, चंदू पारखी या कलाकारांना, अण्णांनी त्यांच्या चित्रपटातून, रजतपटावर प्रथमच चमकवले. पुढे सारे सुपर स्टार झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘अ कम्प्लीट फिल्ममेकर’
चित्रपट कलावंत, पत्रकार, दिग्दर्शक, संगीतकार, संकलक, सर्वांशी अण्णांची विशेष जवळीक. ‘‘अण्णासाहेब, अतिशय दर्जेदार लेखक, गीतकार, निर्माता, वितरक होते. ही वॉज रिअली अ कम्प्लीट फिल्ममेकर, त्यांच्यासारखी विनोदबुद्धी तर दूर्मिळच. कौटुंबिक चित्रपटातून त्यांनी अख्ख्या महिला वर्गाला रडवलं, आणि विनोदी चित्रपटातून अख्ख्या कुटुंबाला दिलखुलास हसवलं. मी त्यांना गुरुस्थानी मानतो,’’ असे महेश कोठारे कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. ‘लेक चालली सासरला’च्या निमित्ताने प्रथम रजतपटावर चमकलेली अभिनेत्री अलका कुबल म्हणते,‘ त्यावेळी मी अगदी नवखी होते. अण्णांनी सांभाळून घेतले. प्रत्येक वाक्‍य कसं म्हणायचं याच्या सूचना देत. मी त्याप्रमाणे करीत असे. चित्रपट सुपर डुपर हिट झाल्यावर अण्णांनी मला शाबासकी देऊन म्हटलं, ‘कलाकारानं यशानं कधीच हुरळून जायचं नसतं... नेहमी जमिनीवर रहायचं असतं. त्यांचा सल्ला आजही मला उपयोगी पडतो.’ 

आशाताई काळे यांनी सांगितलेले अण्णांचे वैशिष्ट्यही नोंद घ्यावी असे. त्या सांगतात, अण्णांनी लिहिलेले संवाद कधीच कृत्रीम नसायचे. ते इतके सहज असायचे, की त्यासाठी अभिनय करावा लागायचा नाही. ते भाव आपसूक चेहऱ्यावर उमटायचे. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले अण्णासाहेबांच्या सत्त्वशीलतेचा आणि संवेदनशीलतेचा उल्लेख आवर्जून करीत, तर समाजवादी विचारवंत ग.प्र.प्रधान अण्णांच्या मराठी, इंग्रजी भाषेवरील  प्रेमाचा  उल्लेख करीत. प्रधानसर त्यांचे शाळा-कॉलेजातील सोबती होते. मॉडर्न कॉलेजातील शिक्षकांनी हा नावाजलेला लेखक होणार, असे भाकीतच केले होते, अशी आठवणही ते सांगत. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ चित्रपटाच्या सेटवर अण्णांनी लिहिलेले संवाद म्हणताना कसं हसू यायचं, यांची माहिती दिली. अर्थातच चित्रपट पाहताना प्रेक्षकांचीही हसून हसून पुरेवाट व्हायची, हे सांगायला नकोच.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चित्रपट लेखनाबरोबरच अण्णांचं गीतलेखनही चालू होतं. ‘थापाड्या’, ‘भक्त पुंडलिक’, ‘सासुरवाशीण’, आदी अनेक  चित्रपटांसाठी लिहिलेली गीतं अर्थपूर्ण, सुमधूर अशी होती. ती लोकप्रिय झाली होती. २२ऑगस्ट २०२० या दिवशी, त्यांची जन्मशताब्दी संपन्न होत आहे. योगायोगानं, त्यांचा एकुलता एक मुलगा, जो अवघ्या सोळाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला, त्या शिरीषची जयंती तिथीनं त्याच दिवशी येते. त्या दोघांनाही आदरांजली.

प्रेमळ गुरू
‘‘अण्णांना मी नेहमीच माझे गुरू मानलं. ते मुंबईला असताना गुरुपोर्णिमेला भर पावसात, मी त्यांना प्रभादेवीहून माझ्या घरी गोरेगावला घेऊन गेलो. त्यांची पूजा केली, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वहात होत्या. पुण्याला मी त्यांना भेटायला गेलो की मी त्यांच्याकडे मन मोकळं करत असे. ‘खट्याळ सासू नाठाळ सून’,‘नशीबवान’ आणि ‘नवरा बायको’ ह्या तीनही चित्रपटात मी काम केलं. त्यांच्याबरोबर लिखाणातही मी भाग घेत असे. उत्कृष्ट संवाद कसे असावेत, याचे धडे मी त्यांच्याकडून घेतले. ’’ हे प्रसिद्ध अभिनेता नितीश भारद्वाजचं मनोगत अण्णांच्या व्यक्तिमत्वाविषयी बरेच काही सांगून जाते.

loading image
go to top