मोदींचीच बाजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारत व पाकिस्तान यांचे लक्ष लागलेल्या फ्रान्समधील ‘जी-७’ परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत काश्‍मीरबाबत भारताची भूमिका ठामपणे मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली आहे.

संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारत व पाकिस्तान यांचे लक्ष लागलेल्या फ्रान्समधील ‘जी-७’ परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत काश्‍मीरबाबत भारताची भूमिका ठामपणे मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली आहे. भारत ‘जी-७’चा सदस्य नसतानाही फ्रान्सने मोदी यांना विशेष आमंत्रण दिले होते. त्यामुळे तेथील मोदी-ट्रम्प भेटीकडे साऱ्यांचे लक्ष होते आणि त्याला पार्श्‍वभूमी होती ती जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुरू केलेल्या आक्रस्ताळी वक्‍तव्यांची. त्यात अलीकडेच ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्या उपस्थितीत या दोन शेजारी देशांमध्ये सुरू असलेल्या वादासंबंधात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवून वादळ उठवले होते. मात्र, ट्रम्प यांच्या या भेटीत, ‘काश्‍मीरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे आणि हा या दोन देशांमधलाच प्रश्‍न असून, तो आम्ही सोडवू शकतो!’ असे मोदी यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले. एवढेच नव्हे तर भारत व पाकिस्तान या दोन देशांदरम्यान अनेक प्रश्‍न असले, तरी त्या संदर्भात आम्ही कोणत्याही तिसऱ्या देशाला त्रास देऊ इच्छित नाही, असेही मोदी यांनी सांगितल्यामुळे अखेर ट्रम्प यांना नरमाईची भूमिका घेत मोदी यांचे म्हणणे मान्य करावे लागल्याचे दिसते. 

खरे तर ट्रम्प मध्यस्थी करण्यासाठी कमालीचे उतावीळ झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत निर्माण झाले होते. मात्र, ‘आमचे प्रश्‍न आम्हीच सोडवू शकतो!’ असे मोदी यांनी आपणास सांगितल्याचे ट्रम्प यांना या भेटीनंतर जाहीर करणे भाग पडले. अर्थात, यामुळे इम्रान यांचे पित्त अधिकच खवळले असून, त्यांनी थेट अणुयुद्धाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळेच पुढील महिन्यांत होणाऱ्या संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेतही इम्रान हे काश्‍मीरप्रश्‍न पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. हा सारा घटनाक्रम बघता या विषयावरून पाकिस्तान जागतिक स्तरावर एकाकी पडल्याचे पुन्हा दिसून आले आहे. ट्रम्प यांच्या भेटीआधी मोदी यांनी बहारीन व संयुक्‍त अरब अमिराती या देशांना दिलेल्या भेटीमुळेही इम्रान यांच्या नाकाला मिरच्या तर झोंबल्या आहेतच; शिवाय जागतिक मुस्लिम समुदायही पाकच्या पाठीशी नसल्याचे दिसत आहे. अर्थात, आपली ‘मतपेढी’ शाबूत राखण्यासाठी इम्रान यांना भारतविरोधी वक्‍तव्ये करत राहावेच लागणार. अर्थात, त्यांचे स्वरूप ‘शब्द बापुडे केवळ वारा...’ एवढेच आहे, हे उघड आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi has bet on India role in Kashmir