निष्ठावान, लढवय्या नेता

व्यक्ती ही त्याच्या कर्तृत्वाने मोठी होते. आयुष्याच्या चढ-उतारातून नाराज न होता जो माणूस म्हणून पुढे जातो, तो इतरांपेक्षा वेगळा असतो.
PN Patil
PN Patilsakal

व्यक्ती ही त्याच्या कर्तृत्वाने मोठी होते. आयुष्याच्या चढ-उतारातून नाराज न होता जो माणूस म्हणून पुढे जातो, तो इतरांपेक्षा वेगळा असतो. जीवनात खचून न जाता ज्यांनी निष्ठेने आजपर्यंत आपले समाजकार्य अविरत सुरू ठेवले, असे नेतृत्व म्हणजे आमदार पी. एन. पाटील.

राजकारणात एखाद्या नेतृत्वावर विश्वास ठेवला की, त्यात अजिबातही कमतरता राहणार नाही, याची काळजी आमदार पी. एन. पाटील नेहमीच घेत असत. (स्व.) विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याची खात्री कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य माणसालाही होती. मात्र त्यांना त्यावेळी संधी मिळाली नाही, पण म्हणून ते कधीही नेतृत्वावर नाराज झाले नाहीत.

उलट त्यांनी अधिक निष्ठेने व ताकदीने पक्षवाढीचे काम केले. अनेक वर्षे ते सांगरूळ व करवीर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये वाढतच गेली. त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये जीवाभावाचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. ते सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करत.

सामान्य कार्यकर्त्याला सत्तेची पदे मिळाली पाहिजेत, यासाठी त्यांचा कायम आग्रह असे. त्यामुळेच त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार होती. कोणतीही निवडणूक असो, त्यांची तयारी असायचीच. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर पी.एन. पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण केला.

पी. एन. पाटील १९९० मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने पीक कर्ज दिले. एवढ्या कमी व्याजाने पीक कर्ज देणारी कोल्हापूर जिल्हा बॅँक ही देशातील पहिली बॅँक होती. त्यांच्या या निर्णयाचे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी पत्र पाठवून कौतुक केले.

त्यावेळीच त्यांच्या सहकार क्षेत्रातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर जिल्हा बॅँकेच्या राजकारणात ते सतत कार्यरत राहिले. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे अनेक आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे नेतृत्व म्हणजे आमदार पी.एन. पाटील.

बांधिलकी जपणारा राजकारणी

आमदार पाटील यांची प्रतिमा आणि ओळख ही प्रखर काँग्रेस नेता अशी आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी अनुभवले; मात्र कार्यकर्त्यांना सातत्याने बळ दिले. त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ कायम राहिले. १९८० पासून चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ विरोधकांना थोपवून धरत, प्रसंगी त्यांच्यावर मात करत त्यांनी काँग्रेस पक्ष बळकट केला. समाजकारण आणि राजकारणातील चारित्र्यसंपन्न नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.

त्यांनी तालुका संघ, सूतगिरणी, सहकारी बॅँक अशा संस्था उभारून शेतकऱ्यांना आणि तरुणांना आर्थिक पाठबळ मिळवून दिले. सहकारी संस्था कशा असाव्यात, याचे आदर्श उदाहरण म्हणून या संस्थांचा उल्लेख होतो. सहकार क्षेत्रात इतरत्र घोटाळे, भ्रष्टाचार होत असताना त्यांनी मात्र कोणताही डाग नसणारी सहकार चळवळ उभी केली.

पक्षावरील निष्ठा आणि राजीव गांधींबद्दल आदरामुळे पी. एन. पाटील अविरतपणे राजीव गांधी यांची जयंती अनेक वर्षे साजरी करत. सत्तेचे पाठबळ असो अगर नसो, आपल्या विचार व कृतीवर ठामपणे उभे राहणाऱ्या या नेत्याने राजकारणातील साधनशुचितेला प्राधान्य दिले. कधीही विचारांशी तडजोड केली नाही.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वैशिष्ट्य त्यांना इतर राजकारण्यांपासून वेगळे ठरविते. काहीही राजकीय फायदे-तोटे झाले तरी, राजकारणातील जपलेली मूल्ये अबाधित ठेवण्याची त्यांची सातत्यपूर्ण पराकाष्ठा असे. आपल्या विचारांशी अशी बांधिलकी जपणारा राजकारणी आजच्या राजकारणात क्वचितच आढळेल.

विकासकामांवर भर

मी केंद्रात मंत्री असताना पी. एन. पाटील यांचा त्यांच्या मतदारसंघातील कामानिमित्त संपर्क असायचा. त्यानंतर २०११मध्ये मला राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांचा आणि माझा नियमित संपर्क राहिला. पी. एन. मंत्री नसले तरी नाराज न होता मतदारसंघातील व जिल्ह्यातील विकासकामे नियमित घेऊन येत. त्यांचा दरारा एखाद्या मंत्र्यासारखाच असायचा. ते गेली २५ वर्षे अखंडपणे कोल्हापुरात राजीव गांधी सद्‌भावना दौड घेत. मलाही अनेकदा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पी.एन. यांची अगदी थोड्या मताने विजयाची संधी हुकली तरीही खिलाडूवृत्तीने जनतेचा कौल मान्य केला आणि जनसेवेचे काम अखंड सुरू ठेवले. त्याचीच प्रचिती म्हणजे ते २०१९च्या निवडणुकीत मोठ्या मतांनी निवडून आले. त्यांच्या शब्दाचे काय वजन आहे, याची प्रचिती त्यांच्या कार्यकर्त्यांना सतत यायची.

आयुष्यभर सामान्य माणसाला उभे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या कणखर नेतृत्वाला परमेश्वराने आपल्यापासून अचानक हिरावून घेतले, याचे दुःख जिल्ह्यातीलच नव्हे; तर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्याला झाले आहे. त्यांच्यासारखा निष्ठावान व लढवय्या नेता हरपला. काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

(लेखक माजी मुख्यमंत्री आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com