स्वमग्न मुलांसोबत शिक्षणातून विकास

प्रियम मोहन गुंजाळ
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

एकत्रित शिक्षणाचा स्वमग्न मुलांना जसा फायदा होतो, तेवढाच तो सर्वसामान्य मुलांनाही होतो. अशा एकत्रित शिक्षणामुळे त्यांच्यात शांतता, संयम, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती विकसित होते.

‘एकत्रित शिक्षण’ हा शब्द अनेक पालक आणि शिक्षकांनी ऐकला असेल. एकत्रित शिक्षणाचा नेमका अर्थ काय? एकत्रित शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये स्व-आदर आणि स्वातंत्र्याला प्राधान्य असलेल्या विशिष्ट वातावरणात मुलांना खऱ्या अर्थाने ‘शिक्षित’ केले जाते. एकीकडे, स्वत:विषयी आदर ठेवतानाच दुसऱ्याचा आदर ठेवण्यालाही तिथे प्रोत्साहन दिले जाते. विविध धर्म, संस्कृती, लिंग, क्षमता, तसेच भिन्न सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्यांचा त्यात समावेश व्हावा, यावर भर दिला जातो. खरे तर अशा प्रकारचे एकत्रित शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये खुल्या मनाचा दृष्टिकोन विकसित करण्याला प्रोत्साहित तर करतेच; शिवाय त्यांच्यामधील आत्मविश्वासही वाढवते. प्रश्न विचारण्याची, ऐकण्याची क्षमता वृद्धिंगत करते. त्याचप्रमाणे, माहितीवर आधारित निर्णय घेण्यासही प्रवृत्त करते. 

पालकांच्या सहभागालाही एकत्रित शिक्षणात महत्त्व आहे. शालेय जीवनातील सर्व गोष्टींमध्ये पालकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जाते, ते त्यामुळेच. एकत्रित शिक्षणाच्या संकल्पनेबद्दल काही पालकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता दिसते. मात्र, तुम्ही एक सर्वसामान्य आणि दुसऱ्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलाला जन्म दिला असेल, तर पालक म्हणून तुम्ही या भावंडांना वेगळे करणार आहात काय? शैक्षणिक प्रगतीबरोबरच जागरूकताही वाढत असताना आपण समाजात बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, की डोळे बंद करून सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष करीत केवळ स्वार्थ साधत आहोत? याचाही विचार केला पाहिजे.

प्रयत्नांतून स्वमग्न मुलांमध्ये प्रगती 
स्वमग्न मुले ही सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळल्यावर त्यांच्यात लक्षणीय प्रगती झाल्याचे आमच्या लक्षात आले. स्वमग्न मुले स्पर्धात्मक असतात. समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हाती घेतलेली गोष्ट ती आश्‍चर्यकारकरीत्या साध्य करून दाखवितात. स्वमग्नता हा आजार नव्हे. बरेच लोक ‘स्वमग्न’ या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावतात. इंग्रजीत स्वमग्नतेला ‘ऑटिझम’ किंवा ‘ऑटिझम स्पेक्‍ट्रम डिसऑर्डर’ (एएसडी) असे म्हणतात. ही संकल्पना सामाजिक कौशल्ये, वर्तन पुनरावृत्ती, वाचिक, बिगरशाब्दिक संवादाच्या आव्हानांचा समावेश असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीचा उल्लेख करते. सामान्यत: ‘ऑटिझम’ किंवा ‘टेन्शन डिफिशिएन्सी हायपर ॲक्‍टिव्हिटी डिसऑर्डर’ (एडीएचडी)च्या सीमारेषेवरील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश देतात. शाळांमध्ये इतर सर्वसामान्य मुलांच्या मदतीने स्वमग्न मुलांसाठी परिपूर्ण संतुलित वातावरण उपलब्ध करून दिले जाते. स्वमग्न मुलांना अशा प्रकारच्या मदतीची आवश्‍यकता असते. त्यांना विचार करता येईल, तसेच शिकता येईल अशा अनोख्या पद्धती समजून घेणे, स्वमग्नतेला अशा मुलांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा आणि चैतन्यपूर्ण भाग म्हणून स्वीकारणे, त्यानंतर त्यांच्यासाठी मध्यस्थीचा मार्ग चोखाळणे, त्यांना कौशल्ये शिकवणे, वर्तनात सुयोग्य बदल घडवून आणणे, ही यशस्वी मध्यस्थीची गुरुकिल्ली म्हणावी लागेल. स्वमग्नतेचा स्वीकार आणि ती समजून घेण्याच्या परिप्रेक्ष्यात हे घडायला हवे. ऑटिझम असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक गरज कशाची असेल, तर ती ऑटिझम व्यवस्थित समजून घेऊन केलेल्या यशस्वी मध्यस्थीची. ती त्यांना भविष्य देईल. सक्षम व्यावसायिक तज्ज्ञाच्या कार्यात्मक मूल्यांकनाच्या आधारे स्वमग्न मुलांच्या मध्यस्थीचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक स्वमग्न मुलाची वैयक्तिक क्षमता आणि गरजा या आराखड्यात लक्षात घेतलेल्या आहेत. या आराखड्यात वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या एक किंवा अधिक परिणामकारक तंत्रांचा वापर करता येऊ शकतो.

एकत्रित शिक्षणाचे सर्वसामान्य मुलांना होणारे फायदे 
१) सर्वप्रकारच्या मुलांना हाताळण्यासाठीचा संयम आणि सहनशीलता शिक्षकांमध्ये विकसित होते. 

२) शैक्षणिकदृष्ट्या अक्षम असणारे विद्यार्थी हे सर्वांना शिक्षण देण्याची अधिक चांगली पद्धत विकसित करण्याचे आपल्यापुढे आव्हान निर्माण करतात. सर्वसमावेशक परिणामकारक वर्गांसाठी शिक्षणकर्त्यांनी अध्ययनाचे पर्यावरण विकसित करण्याची गरज आहे. ते अध्ययनाचे सादरीकरण, विद्यार्थ्यांना व्यग्र ठेवण्याचे, तसेच मूल्यमापनाचेही विविध मार्ग पुरवेल. सर्वच मुलांमध्ये शिकण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. त्यामुळे या नव्या प्रक्रियेचा केवळ शैक्षणिक अक्षमता असणाऱ्याच नव्हे, तर सर्वच मुलांना फायदा होईल. 

३) दृक्‌श्राव्य माध्यम, फ्लॅश कार्डस्‌, संकल्पना सविस्तर स्पष्ट करणे, यामुळे शिकविणे अधिक परिणामकारक होईल, त्याचा फायदा सर्वसामान्य मुलांनाही होईल. अतिचंचल मुलांची सर्वसामान्य मुलांसोबत एकत्र राहण्याची तयारी केल्याशिवाय ती त्यांच्यामध्ये मिसळणार नाहीत. त्यांची अशी तयारी होण्यासाठी स्वतंत्र वर्गामध्ये प्रत्येक मुलासाठी नेमलेल्या शिक्षकासह त्यांना ठेवले जाते. अशा मुलांसाठी शैक्षणिक उद्दिष्टांशिवाय विविध उपचारपद्धतींवरही लक्ष केंद्रित केले जाते. ती सर्वसामान्य मुलांचा स्वीकार करून त्यांच्यामध्ये मिसळू शकतील अशा विशिष्ट पातळीपर्यंत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
४) आजच्या जगात सर्वच गोष्टींबद्दलची मानवी संवेदना हरवते आहे. सर्वसामान्य मुलांना स्वमग्न मुलांबरोबर एकत्रितरीत्या वाढविल्यास ती विनयशील होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे वास्तवाची जाणीव झाल्याने त्यांचे पायही जमिनीवर राहतील. 

५) सध्या सर्वसामान्य मुले इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट आणि भौतिक गोष्टींमध्ये गुंतलेली आहेत. मात्र, सर्वसमावेशक शिक्षणानंतर इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटऐवजी माणूस होण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित होईल. त्याचप्रमाणे ती आपल्या दैनंदिन जीवनातही ‘विशेष’ मुलांना मदत करतील, त्यांच्याशी संवाद साधतील.

६) स्वमग्न मुलांसोबतच्या एकत्रित शिक्षणामुळे सर्वसामान्य मुले शांत आणि संयमी होतील. आजच्या गतिमान युगातील आव्हानांचा सामना करण्याचे प्रशिक्षण त्यांना त्यातून मिळेल. 

७) सर्वसामान्य मुलांना योग्य वेळी, योग्य वाव मिळेल. त्यामुळे ती आयुष्यातील प्रत्येक आव्हान स्वीकारून, त्याचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने गतिमान होतील. भावी आयुष्यात खऱ्या जगाच्या स्पर्धेतही या एकत्रित शिक्षणाचा त्यांना नक्कीच उपयोग होईल. 

८) एकत्रित शिक्षण सर्वसामान्य मुलांमध्येही जबाबदारीची जाणीव विकसित करेल. 

 आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक शाळेत शिक्षणाच्या अशा एकत्रित पद्धतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वोत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळायला हवी. 

(लेखिका शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
(अनुवाद - मयूर जितकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyam gunjal article  on autistic  children education development

टॅग्स