काँग्रेसचे हुकमाचे पान प्रियंका
ज्येष्ठांना त्यांचा योग्य तेवढा मान देत दुसऱ्या बाजूने "यंग ब्रिगेड' तयार करण्याची सुरवात कॉंग्रेसने केली आहे, असे या निकालांवरून दिसून येते. राजीव सातव, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी गेल्या काही वर्षांत कॉंग्रेससाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
"प्रियंका लाओ, कॉंग्रेस बचाओ' अशा घोषणा पक्षाचे कार्यकर्ते गेल्या कित्येक वर्षांपासून देत आहेत. आता ही घोषणा प्रत्यक्षात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला दोन- अडीच महिने राहिलेले असताना कॉंग्रेसने त्यांचा हुकमी एक्का बाहेर काढला आहे. गेल्या दीड- दोन वर्षांमध्ये राहुल गांधी आपली प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत असतानाच आता प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळ मिळेल.
दहा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची पूर्ण वाताहत झाली. नरेंद्र मोदी यांचा झंझावात इतका होता, की कॉंग्रेस पुन्हा उभारी घेईल की नाही, असे प्रश्न उपस्थित झाले होते. "कॉंग्रेसमुक्त भारता'चा संकल्प सोडत देशभरात प्रचाराचा धडाका उडाल्यानंतर कॉंग्रेसला बदलणे भागच होते. भाजपच्या धडाक्यासमोर कॉंग्रेस काही वर्षे "बॅकफूट'वर गेली होती. गुजरात निवडणुकीनंतर हळूहळू कॉंग्रेसमध्ये बदल सुरू झाले. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडले आणि राहुल यांच्याकडे अधिकृतरीत्या पक्षाची धुरा आली.
गुजरातमध्ये कॉंग्रेसने मोदी- अमित शहा यांच्या "होम ग्राउंड'वरच विजयासाठी झगडायला लावले. त्यानंतर एरवीची ढिसाळ राजकीय निर्णयप्रक्रिया बदलून कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या साथीत सरकार स्थापन केले आणि अगदी अलीकडे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या "हिंदी बेल्ट'मध्ये कॉंग्रेसला पुन्हा स्थान मिळाले. ज्येष्ठांना त्यांचा योग्य तेवढा मान देत दुसऱ्या बाजूने "यंग ब्रिगेड' तयार करण्याची सुरवात कॉंग्रेसने केली आहे, असे या निकालांवरून दिसून येते. राजीव सातव, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी गेल्या काही वर्षांत कॉंग्रेससाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. आता याच पंक्तीत प्रवेश केला आहे प्रियंका गांधी यांनी!
उत्तर प्रदेशमधील विजयाची गणिते देशाची समीकरणे ठरवितात. गेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळविला. आता प्रियंका यांना राजकारणात आणून कॉंग्रेसने भाजप, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष या सर्वांनाच खुले आव्हान दिले आहे. सप आणि बसपने आघाडी करताना कॉंग्रेसला दूर ठेवले होते. याला प्रत्युत्तर म्हणून प्रियंका यांना सरचिटणीसपद देत उत्तर प्रदेशचे प्रभारी केले आहे.
प्रियंका यांच्या अधिकृत नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर लगेचच विरोधकांकडून उमटलेल्या प्रतिक्रिया यावरून त्यांच्या वाढत्या प्रभावाची प्रचिती येते. प्रियंका यांचे आव्हानच नाकारणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांनाही यावर खुलासे द्यावे लागले. पण, राजकारणात फक्त प्रतिमाच उपयुक्त ठरत नाही, त्याला कार्यकर्त्यांचे पाठबळ, संघटनेचे जाळे आणि प्रचंड मेहनतीचीही जोड असावी लागते. "आयर्न लेडी' इंदिरा गांधी यांची प्रतिमा प्रियंका यांच्यात पाहणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. मोदी- शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी झुंज द्यायची असेल, तर कॉंग्रेसला एक "प्रतिमा' हवी होती, ती आता त्यांना मिळाली आहे.. आता सगळे सज्ज होत आलेय.. प्रतीक्षा आहे प्रत्यक्ष "लढाई'ला तोंड फुटण्याची..!