कार्बनमुक्तीसाठी उचलूया खारीचा वाटा

प्रियदर्शिनी कर्वे, "पर्यावरणपूरक जीवनशैली'च्या प्रसारक
शनिवार, 13 जानेवारी 2018

आपला खनिज इंधनांचा वापर हे जागतिक हवामानबदलाचे कारण आहे. खनिज इंधनांच्या ज्वलनामुळे आपल्या वातावरणात कार्बन डायॉक्‍साइडचे प्रमाण वाढत चालले आहे. नैसर्गिक कर्बचक्रात हवेत असलेला कार्बन डायॉक्‍साइड वनस्पती प्रकाशसंश्‍लेषणाने पृथ्वीतलावर आणतात. वनस्पती आणि प्राणिसृष्टीतून फिरून हा कार्बन डायॉक्‍साइड पुन्हा हवेत जातो. आपण खनिज इंधनांचा वापर शक्‍य तितका कमी करायला हवा, हे खरे; पण आपल्या जीवनशैलीशी तडजोड न करता तो शून्यावर आणणे अशक्‍य आहे. मग निसर्गचक्राद्वारे हवेतला अधिक कार्बन डायॉक्‍साइड काढून घेता येईल का? "झाडे लावा, झाडे जगवा' हा एक पर्याय आहे; पण तो तात्कालिक आहे.

आपला खनिज इंधनांचा वापर हे जागतिक हवामानबदलाचे कारण आहे. खनिज इंधनांच्या ज्वलनामुळे आपल्या वातावरणात कार्बन डायॉक्‍साइडचे प्रमाण वाढत चालले आहे. नैसर्गिक कर्बचक्रात हवेत असलेला कार्बन डायॉक्‍साइड वनस्पती प्रकाशसंश्‍लेषणाने पृथ्वीतलावर आणतात. वनस्पती आणि प्राणिसृष्टीतून फिरून हा कार्बन डायॉक्‍साइड पुन्हा हवेत जातो. आपण खनिज इंधनांचा वापर शक्‍य तितका कमी करायला हवा, हे खरे; पण आपल्या जीवनशैलीशी तडजोड न करता तो शून्यावर आणणे अशक्‍य आहे. मग निसर्गचक्राद्वारे हवेतला अधिक कार्बन डायॉक्‍साइड काढून घेता येईल का? "झाडे लावा, झाडे जगवा' हा एक पर्याय आहे; पण तो तात्कालिक आहे. झाडांनी निर्माण केलेला जैवभार जाळण्यातून किंवा कुजण्यातून त्यात साठवलेला सगळा कार्बन डायॉक्‍साइड हवेत परत जातो. जागतिक हवामानबदलावर मात करण्याचा उपाय म्हणजे जैविक कचऱ्याचा कोळसा करणे. यामध्ये कचऱ्यात असलेल्या एकूण कार्बनपैकी तीस टक्के कार्बन कोळसा या स्वरूपात हवेत न जाता मागे राहतो. जर तुम्ही या कोळशाला अजिबात हात लावला नाही, तर तो हजारो वर्षे याच स्वरूपात राहणार आहे. थोडक्‍यात म्हणजे तुमच्या परिसरात चालू असलेल्या नैसर्गिक कर्बचक्रातला तीस टक्के कार्बन तुम्ही चक्राच्या परतीच्या मार्गातून कायमस्वरूपी बाहेर काढू शकता आणि तुमचा नैसर्गिक परिसर "कार्बन निगेटिव्ह' करू शकता!

या कोळशाचे करायचे काय? ज्या वनस्पतींनी हा जैविक कचरा निर्माण केला आहे, त्यांच्याच बुंध्याशी हा कोळसा टाकून द्या. कोळसा ओलावा धरून ठेवतो, मातीतील जिवाणूंना निवासासाठी अधिक जागा उपलब्ध करून देतो आणि अशा रीतीने मातीची सुपीकता वाढवतो. म्हणजेच कंपोस्टचे कामही होते आणि शिवाय हवामानबदलाला शह दिला जातो, असा यात दुहेरी फायदा आहे. कोळसा करणे आणि उघड्यावर जाळणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. योग्य रीतीने रचना केलेल्या भट्टीत कोरडा किंवा तपकिरी जैविक कचरा (यात स्वयंपाकघरातला हिरवा जैविक कचरा मिसळून चालणार नाही) शास्त्रशुद्ध पद्धतीने जाळला, की धूर किंवा इतर प्रदूषक निर्माण न होता कोळसा तयार होतो. यासाठी अनेक छोटी-मोठी उपकरणे संशोधकांनी तयार केलेली आहेत, आणि ती कोणालाही सहज वापरता येतील अशी आहेत. तेव्हा एक सामाजिक व पर्यावरणीय कार्य म्हणून आपल्या फावल्या वेळात आपल्या आजूबाजूच्या पालापाचोळा, काडीकचरा अशा कचऱ्यातून कोळसा तयार करून "जागतिक हवामानबदला'च्या विरोधात आपणही आपला खारीचा वाटा उचलू शकतो. आपल्या राहत्या ठिकाणाच्या आजूबाजूला वर्षभर जैविक कचरा निर्माण होत असतो. बाल्कनीत किंवा परसात आपणच भाज्या, फुलझाडे, इ. लावलेली असतात. आपल्या घराभोवती, शाळेभोवती, कामाच्या जागेभोवती किंवा जवळपास बाग असते, रस्त्याच्या कडेने सावली देणारी किंवा शोभिवंत झाडे असतात. वर्षभर आपल्या परिसरातल्या वनस्पती पालापाचोळा, काटक्‍याकुटक्‍या या स्वरूपात जैव कचरा निर्माण करत असतात.

मुळात हे जैविक पदार्थ म्हणजे कचरा नाहीच. आपण इतस्ततः टाकत असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, निकामी दिवे, गुटख्याची पाकिटे, विड्यांची आणि सिगारेटची थोटके, कागदाच्या किंवा कापडाच्या चिंध्या हा कचरा आहे. निसर्गात निर्माण होणारे आणि मातीवर पडल्यावर काही तासांत विघटन होऊन जाणार आहे, असे जैविक पदार्थ मातीतील जिवाणूंना खाद्य पुरवतात, आणि मातीची सुपीकता वाढवतात; पण आपण आता आपल्या वस्त्यांमध्ये उघडी मातीच राहू दिलेली नाही, त्यामुळे या पदार्थांचा कचरा झालेला दिसतो! असो.

परिसरात निर्माण होणाऱ्या अशा कोरड्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या आपण दोन पर्यायांचा वापर करतो. सगळा कचरा झाडून एकत्र करायचा आणि जाळून टाकायचा किंवा जैविक खत करायचे. उघड्यावर कचरा जाळणे हा सर्वात वाईट पर्याय आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रदूषण होते. त्याउलट जैविक खत बनवणे वेळखाऊ आहे, त्यासाठी जागा लागते, रोज लक्ष द्यावे लागते. अर्थात ज्या वनस्पतींनी कचरा बनवलेला आहे, त्यांच्यासाठी खत म्हणून त्याचा उपयोग होतो. मात्र या दोन्ही प्रक्रिया जागतिक हवामानबदलाच्या दृष्टीने उदासीन आहेत.

संपर्कः pkarve@samuchit.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priydarshini karve write carbon emissions article in editorial page