चर्चा कोविडोत्तर जागतिक रचनेची

चर्चा कोविडोत्तर जागतिक रचनेची

"कोविड-19'मुळे जागतिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत कायमस्वरूपी बदल होणार असून, अशा अनिश्‍चित जागतिक व्यवस्थेत "ग्लोबल गव्हर्नन्स'ची मागणी अधिक जोरकसपणे होईल, यात शंका नाही. अशावेळी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. 

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील सत्तासंतुलन आणि राजकीय स्वातंत्र्यानंतरदेखील वसाहतींवरील पकड घट्ट ठेवण्यासाठीच अनुकूल जागतिक व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली. पाश्‍चात्य, विशेषत: अमेरिकाप्रणित सांप्रतची जागतिक व्यवस्था खिळखिळी आणि कालबाह्य झाली आहे. "कोविड-19'मुळे जागतिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत कायमस्वरूपी बदल होणार यात शंका नाही. "कोविड-19' च्या पार्श्वभूमीवर राष्ट्र-राज्यसंस्था अधिक बळकट होत आहेत आणि जागतिक सत्तेचा लोलक पूर्वेकडे सरकत आहे. अशावेळी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. 

ब्रिटन आणि अमेरिका यांनी त्यांच्या संस्कृतीतील विचारांच्या आधारे जगभर सत्ता राबवली आहे. "पॅक्‍स ब्रिटानिका', "पॅक्‍स अमेरिका'नंतर "पॅक्‍स सिनिका'ची पुनरावृत्ती करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीनने त्यांचे "तियांगझिया' तत्त्वज्ञान अथवा कन्फ्युशिअस विचारांच्या मार्गाने आक्रमकपणे हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आजतागायत पाश्‍चात्य जगाने मैकियावेली यांच्या "द प्रिन्स', होमर यांच्या "इलियाद'च्या दृष्टीने जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. तसेच चीन "थ्री किंग्डम'च्या दृष्टीने जगाकडे पाहण्याचा आग्रह धरत असताना, महाभारतातील विचार वर्तमान जागतिक परिस्थितीच्या कसोटीवर जोखणे इष्ट ठरेल. 

गेल्या आठवड्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे "द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनसर्टन वर्ल्ड' हे पुस्तक प्रकाशित झाले.त्यातील "कृष्णाज चॉइस- द स्ट्रॅटेजिक कल्चर ऑफ रायझिंग पॉवर' या प्रकरणात भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भूमिकेचे विश्‍लेषण "महाभारता'च्या 

माध्यमातून न केल्याने अभ्यासकांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळेच आज अनेक राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संघटना, कॉर्पोरेटस आणि विचारप्रणाली नव्याने उदयाला येऊ शकणाऱ्या व्यवस्थेला वळण देण्याच्या प्रयत्नांत असताना महाभारत आणि विशेषत: "धर्म' या संकल्पनेच्या आधारे जागतिक व्यवस्थेचा विचार करणे सयुक्तिक ठरेल. "धर्म' भारतीय विचारातील मूलाधार आहे. महाभारतातील धर्म ही संकल्पना बृहत असून, आंतर-संबंधांचे सार्वत्रिक अधिष्ठान या अर्थाने त्यांचा विचार करावा लागतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सहजीवन आणि सहअस्तित्व 
महाभारतामध्ये विश्वनिर्मितीची चर्चा कमळाच्या चार पाकळ्यांच्या आधारे केली आहे. त्यात भारताचे स्थान दक्षिणेला आहे. थोडक्‍यात भारत जगातील इतर देशांपैकी एक आहे आणि इतरांना त्यांच्या भौगोलिक रचना, तसेच सर्व गुणदोषांसकट स्वीकारण्याची भूमिका भारतीय सांस्कृतिक विचारात मांडली आहे. चीनचा "मिडल किंग्डम कॉम्प्लेक्‍स' - केवळ हानवंशीयच जगात सर्वश्रेष्ठ आहेत - हा विचार अथवा उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत अनेक देश असले तरी केवळ "युनायटेड स्टेट ऑफ अमेरिके'तील नागरिकांना "अमेरिकन्स' म्हणण्याची प्रवृत्ती भारतापेक्षा वेगळी आहे. सहजीवन आणि सहअस्तित्व हा भारतीय विचारांचा पाया आहे आणि त्याचेच प्रतिबिंब पंडित नेहरूंच्या वसाहतवादविरोधी धोरणात, तसेच मोदी सरकारने गेल्या काही महिन्यांत "एचसीक्‍यू' आणि इतर औषधांच्या माध्यमातून जगभर केलेल्या मदतीत दिसून येते. "कोरोना'वरील लसीच्या निमित्ताने राष्ट्रवादाला मिळालेली बळकटी पाहता, या सर्व देशांना माफक दरात औषधनिर्मितीचे केंद्र असलेल्या भारतावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे, भारताची सहजीवन आणि सहअस्तित्व या तत्त्वांवर आधारित भूमिका जागतिक "हेल्थ गव्हर्नन्स'ला दिशा देण्यासाठी महत्त्वाची ठरेल. 

महाभारतात मत्स्यन्यायाची चर्चा केलेली आहे. मत्स्यन्याय म्हणजे मोठा मासा छोट्या माशाला मारतो. मात्र मत्स्यन्यायाचा अतिरेक होऊन अराजक पसरू नये, यासाठी धर्म महत्त्वाची भूमिका बजावतो. समाज आणि मत्स्यन्याय यांच्यामध्ये धर्म असून, तो शांतता आणि स्थिरता राखतो असे शांतिपर्वात सांगितले आहे. थोडक्‍यात, धर्माचा अभाव म्हणजे अनागोंदी आणि अराजकाला आमंत्रण. पाश्‍चात्य विचारांत जागतिक व्यवस्था ही अराजकतेच्या पायावर उभी आहे. यामध्ये राष्ट्रहिताच्या गोंडस नावाखाली नफा-नुकसान आधारित स्वहित राखण्याला महत्त्वाचे स्थान आहे. अत्यंत विषम जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी गट, दहशतवादी संघटना, निरंकुशवादी विचार हे आजच्या काळातील मत्स्यन्यायाचेच रूप आहे. आजच्या जागतिक स्थितीत "धर्म' संकल्पनेचा विचार म्हणजे नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची निर्मिती आणि त्याचे पालन होय. नवीन व्यवस्था कशी असावी याबाबत जागतिक स्तरावर एकवाक्‍यता नसली, तरी पाश्‍चात्यप्रणित उदारमतवादी व्यवस्था नको याविषयी बव्हंशी एकमत आहे. किंबहुना, डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ, "ब्रेक्‍झिट' आणि अतिकडव्या उजव्या विचारांचे युरोपातील वाढते वलय त्याचाच प्रत्यय देतात. त्याशिवाय, "कोरोना'मुळे चीनविषयी संशयाचे धुके निर्माण झाले आहे. जगातील अर्थव्यवस्थेच्या उत्पादन-वितरण साखळीतील चीनचे वर्चस्व सर्वांसाठीच अवघड जागेचे दुखणे झाले आहे. चीनचे अर्थसाह्य घेणे म्हणजे राजकीय स्वातंत्र्याचा बळी देणे होय याची जाणीव सर्वांनाच होऊ लागली आहे. याउलट भारताच्या विकासात्मक सहकार्याचे प्रारूप इतर देशांना सक्षम करण्याचे आहे. अर्थात प्रकल्पांच्या कालबद्ध अंमलबजावणीवर भारताला भर द्यावा लागेल. तसेच, पाश्‍चात्यांच्या लोकशाहीपेक्षा भारतीय लोकशाहीतील वैविध्य अनेकांना भावते. लोकशाहीच्या समान बंधाने समविचारी देशांची मोट जुळविता येऊ शकते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताची जबाबदारी 
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजनयात अणुप्रसार, जागतिक व्यापार आणि हवामानबदल यांच्याबाबतीत नैतिक मूल्यांशी असलेली बांधिलकी उठून दिसते. त्यामुळेच भारताला "स्पॉइलर' म्हणून ओळखले जाते. परंतु भारताला विकसनशील देशांचा "मसीहा' या मर्यादित मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. कारण, जगातील सर्वच बहुपक्षीय व्यवस्थेत भारताचे हितसंबंध गुंतलेले आहेत. किंबहुना भारताचे स्वहित जागतिक घडामोडींपासून वेगळे पाहता येणारच नाही. शिवाय, "लीडिंग पॉवर' होण्याच्या आकांक्षा भारताच्या व्यापारविषयक आणि आर्थिक वाटाघाटीमध्ये प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने "जी-20'मधील भारताचे प्रतिनिधित्व किंवा नुकतेच "जी- 7' च्या बैठकीसाठी आलेले आमंत्रण याकडे सकारात्मकतेने पाहावे लागेल. तसेच, जागतिक मुद्द्यांवर प्रभाव टाकण्यासाठी निराकरणाचा मार्ग दाखवावा लागतो. पॅरिस हवामान कराराच्या निमित्ताने, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केल्याने हवामानबदलांच्या वाटाघाटीसंदर्भात भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. सध्या जागतिक व्यवस्थेत बहुढंगी, बहुविध आणि एकमेकांना प्रभावित करणारे परस्परविरोधी घटक एकत्र नांदत आहेत. धार्मिक, जातीय, भाषिक अशा अनेक परस्परविरोधी घटकांना सामावून घेणारी भारतीय संस्कृती यामुळेच जागतिक व्यवस्थेला मार्गदर्शक ठरू शकते. तसेच, युद्ध आणि रणनीती यांचे विविधांगी कंगोरे समजून घेण्यासाठी महाभारतासारखे दुसरे महाकाव्य नसावे. राजकारणात नैतिकता आणि व्यावहारिकता यांची योग्य गुंफण करावी लागेल. सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीनही पांडवाना न देणारा सुयोधन (दुर्योधनाचे खरे नाव) या स्वहित आधारित व्यावहारिक विचारांचे प्रतिनिधित्व करतो. मुख्य म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वत:चा विचार आहे आणि त्याचे यथायोग्य समर्थनदेखील आहे. महाभारतातील धर्मात योग्य अथवा अयोग्य यांची गृहितके मांडलेली नाहीत. धर्माच्या बृहत चौकटीत परिस्थितीचे मूल्यमापन करून योग्य अथवा अयोग्यतेचा निर्णय करायचा असतो. भारतीय विचारातील विवेकवाद केवळ धर्माच्या आधारे समजता येतो. "कोविड-19'नंतरच्या अनिश्‍चित जागतिक व्यवस्थेत "ग्लोबल गव्हर्नन्स'ची मागणी अधिक जोरकसपणे होणार आहे. त्यामुळे मानवी मूल्ये आणि व्यावहारिकता यांचा योग्य मिलाफ करणारे धर्म संकल्पनेचे अधिष्ठान हे भारतीय राष्ट्रहित आणि "ग्लोबल गव्हर्नन्स'साठी मार्गदर्शक ठरावे, यासाठी सक्रिय प्रयत्न करावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com