मनाचं संतुलन

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 10 जानेवारी 2019

ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिसनं २४०० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘नो दाय सेल्फ’ हे शब्द आजही तितकेच खरे आहेत.  आयुष्यात प्रगती करायची असेल, प्रत्येक प्रसंगात योग्य निर्णय घ्यायचा असेल, तर आधी स्वत:ला ओळखणं- ‘नो दाय सेल्फ’ आवश्‍यक आहे. ज्याला जग समजून घ्यायचं आहे, सभोवताली घडणाऱ्या घडामोडींचे अचूक अर्थ लावायचे आहेत, त्यानं आधी स्वत:ला ओळखायला शिकलं पाहिजे. त्याला आपले विचार आणि भावना नेमकेपणानं समजल्या पाहिजेत. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. काम करताना अनेकदा आपण कौशल्य पणाला लावतो. पण अशा परिस्थितीत किती लोक मन शांत ठेवू शकतात? मनातील भावनिक गोंधळ, विचार व निर्णयक्षमता यावर नियंत्रण ठेवू शकतात?

ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिसनं २४०० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘नो दाय सेल्फ’ हे शब्द आजही तितकेच खरे आहेत.  आयुष्यात प्रगती करायची असेल, प्रत्येक प्रसंगात योग्य निर्णय घ्यायचा असेल, तर आधी स्वत:ला ओळखणं- ‘नो दाय सेल्फ’ आवश्‍यक आहे. ज्याला जग समजून घ्यायचं आहे, सभोवताली घडणाऱ्या घडामोडींचे अचूक अर्थ लावायचे आहेत, त्यानं आधी स्वत:ला ओळखायला शिकलं पाहिजे. त्याला आपले विचार आणि भावना नेमकेपणानं समजल्या पाहिजेत. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. काम करताना अनेकदा आपण कौशल्य पणाला लावतो. पण अशा परिस्थितीत किती लोक मन शांत ठेवू शकतात? मनातील भावनिक गोंधळ, विचार व निर्णयक्षमता यावर नियंत्रण ठेवू शकतात? कित्येकांना असं वाटत राहतं की ‘मी असं वागायला नको होतं, मी असं बोलून चूक केली.’ दैनंदिन जीवनात तणावयुक्‍त प्रसंगात आपण काहीतरी चुकीचं बोलतो व एखाद्या व्यक्‍तीबरोबरील वर्षानुवर्षांचे सबंध एका क्षणात तोडून टाकतो. नंतर मात्र ‘असं बोलायला नको होतं’ असं आपल्याला वाटतं. आपण समोरच्याची माफी मागतो; पण एकदा तुटलेलं मन मात्र आपल्याला पुन्हा जोडता येत नाही.

मनातील तीव्र भावना उदा. राग, हेवा, मत्सर, लाज यांचा प्रभाव इतरांकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर पडतो. त्यामुळे ‘काय बोलायचं’ याचं मेंदूकडून योग्य विश्‍लेषण होण्यापूर्वीच भावनेच्या भरात आपल्या तोंडून शब्द निघून जातात. त्यामुळे बऱ्याचदा वागण्यावर आपल्या मेंदूचा ताबा राहात नाही. अशा गोष्टी टाळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वत:च्या भावनिक स्वास्थाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं. मानसशास्त्रात या क्षमतेला ‘सेल्फ रिफ्लेक्‍शन’ म्हणतात. भावनांची तीव्रता वाढलेली असतानाही वागणं व दृष्टिकोन संतुलित ठेवण्याची क्षमता म्हणजे ‘सेल्फ रिफ्लेक्‍शन’. उदा. खूप राग येऊनही विचारांवरचं व वागण्यावरचं संतुलन कायम राहाणं.

 वेळोवेळी मनातील भावनांची जाणीव असेल तर वागण्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. राग आल्याची जाणीव असेल तर रागाची भावना व बाह्यवर्तन या गोष्टी वेगळ्या ठेवता येतात व स्वत:चं संतुलन कायम राखता येतं. मनातल्या भावनांची स्पष्ट कल्पना असणं, त्या ओळखता येणं व त्यांचा उद्रेक टाळणं या गोष्टी जन्मजात नसतात. त्या अनुभवातून शिकाव्या लागतात. ज्यांच्या जीवनात असंख्य अडचणी येतात व जे त्यातून तावून सुलाखून वर येतात, त्यांच्यात ‘सेल्फ रिफ्लेक्‍शन’ जास्त असतं. संकटांना हसत सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात येते. त्यांचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. फक्‍त यासाठी ठेवावी लागते ती जिद्द. निराश न होता पुढे जाण्याची हिंमत व जवळच्या लोकांचा आधार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof raja aakash wirte aricle in editorial