संवाद अंतर्मनाशी

prof raja aakash
prof raja aakash

ती व्र नकारात्मक भावना, उदा. राग, चिंता, आसक्‍ती, मनाचा गोंधळ आपण अनुभवत असतो, तेव्हा सारासार विचार करण्याची शक्‍ती संपते व आपण चुकीचं वागू लागतो. चुकीचं बोलणं, इतरांना दुखावणं व कायमचं दुरावणं, कामात चुका होणं असं आपण वागू लागतो व संकटं ओढवून घेतो. इतर वेळी आपण नीट वागतो, सारासार विचार करतो, योग्य निर्णय घेऊ शकतो, स्वत:चं वागणं तपासतो व योग्य वेळी निर्णय घेतो. असं वागण्याकरिता आपल्या मनातील आंतरिक शक्‍ती आपल्याला मार्ग दाखवत असते. त्यालाच मानसशास्त्राच्या परिभाषेत ‘इनर ॲडव्हायझर’ म्हणतात. जी परिस्थिती आपण कधीच अनुभवली नाही अशी परिस्थिती ओढवली तर ती यशस्वीपणे हाताळण्यासाठी हीच आंतरिक शक्‍ती मार्ग दाखवत असते. सिग्मंड फ्राइड या शास्त्रज्ञाने या शक्‍तीला अंतर्मन असं नाव दिलंय. रुग्णाच्या मानसिक आजाराचं मूळ शोधून काढण्यासाठी फ्राइड त्याच्या अंतर्मनात दडलेल्या भावभावना, विचार, कल्पना, रुग्णांना पडणारी स्वप्नं यांचं विश्‍लेषण करायचा व त्या आधारे उपचार करायचा. या प्रक्रियेला त्याने मनोविश्‍लेषण हे नाव दिलं.

स्वत:च स्वत:च्या मनाचा वैचारिक व भावनिक गुंता सोडवण्याची उत्तम पद्धत म्हणजे स्वत:च्या अंतर्मनाशी म्हणजेच ‘इनर ॲडव्हायझर’शी संवाद. हे करताना स्वत:ला प्रश्‍न विचारा व अंतर्मन आपल्याला काय सांगतं ते पाहा. उदा. ‘माझे सहकारी माझ्याशी नीट का वागत नाहीत? मोठ्यांशी बोलताना मी का बावरतो? मला इतरांचा हेवा का वाटतो? माझ्या नेमक्‍या क्षमता कोणत्या? माझ्यातील दुर्गुण कोणते? अपयशी न होण्यासाठी काय केलं पाहिजे?’ स्वत:ला असे प्रश्‍न विचारता, तेव्हा तुमचा ‘इनर ॲडव्हायझर’ योग्य सल्ला देतो व समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदत करतो. ‘इनर ॲडव्हायझर’शी संवाद साधायला थोडासा सराव करावा लागेल. डोळे मिटा. संपूर्ण शरीर रिलॅक्‍स करा. आता अशी कल्पना करा की तुम्ही एका बागेत गेला आहात. तेथे झाडाखाली पांढरेशुभ्र कपडे घातलेली, प्रसन्न व्यक्‍तिमत्त्वाची, साधूसारखी दिसणारी व्यक्‍ती भेटते. (हाच आपला ‘इनर ॲडॅव्हायझर’) ती तुमच्या चेहऱ्यावरून ओळखते की तुम्हाला काय होतंय. मग ती बोलू लागते. समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करते. आपण तिला प्रश्‍न विचारतो, ती आपल्याला मार्गदर्शन करते. त्यामुळे आपली हिंमत वाढते, नैराश्‍य निघून जातं. आपण प्रसन्न, आनंदी होतो. जीवनातील समस्येशी मुकाबला करण्याचा आपला आत्मविश्‍वास वाढतो. हा आत्मविश्‍वास घेऊन आपण तेथून बाहेर पडतो, रोजच्या जीवनात परत येतो व डोळे उघडतो. ही प्रक्रिया करून बघा. यातून तुम्हाला भावनिक सामर्थ्य वाढवता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com