कल्पनाचित्रांतील आनंद

प्रा. राजा आकाश
Thursday, 21 February 2019

तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत बागेत भटकता आहात. त्या व्यक्तीच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण, त्या व्यक्‍तीची प्रत्येक कृती, हालचाल, हावभाव, शब्द, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आनंद देते. आता तुम्ही केवळ अशा घडून गेलेल्या घटनेची आठवण करीत आहात. या आठवणीतून, कल्पनेतूनदेखील तुम्हाला तितकाच आनंद मिळेल जितका ती घटना प्रत्यक्ष घडताना मिळाला होता.

तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत बागेत भटकता आहात. त्या व्यक्तीच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण, त्या व्यक्‍तीची प्रत्येक कृती, हालचाल, हावभाव, शब्द, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आनंद देते. आता तुम्ही केवळ अशा घडून गेलेल्या घटनेची आठवण करीत आहात. या आठवणीतून, कल्पनेतूनदेखील तुम्हाला तितकाच आनंद मिळेल जितका ती घटना प्रत्यक्ष घडताना मिळाला होता. घटना घडलीच नसेल, केवळ तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्‍तीच्या सहवासात आहात, त्या व्यक्‍तीशी बोलत आहात, तिला स्पर्श करता आहात, ती व्यक्‍ती तुम्हाला प्रतिसाद देत आहे, असे काल्पनिक चित्र जरी स्वतःच्या मनात रंगवले तरी तुम्हाला तितकाच आनंद मिळेल, जितका ती घटना प्रत्यक्ष घडताना मिळतो. कारण काल्पनिक अनुभव हा खऱ्या अनुभवाइतकाच ताकदीचा असतो.

एखादी घटना घडत असताना जी जैव-रासायनिक प्रक्रिया मेंदूत घडते, तीच तशीच प्रक्रिया केवळ त्या घटनेची कल्पना केली तरी मेंदूत घडत असते. एखादा अनुभव आपण वारंवार घेत गेलो, एखादी कृती आपण वारंवार करीत गेलो, तर तो अनुभव आपल्या मेंदूत कायम कोरला जातो. ती कृती सवयीची होते व दरवेळी तशा विशिष्ट प्रसंगांमध्ये आपल्या हातून तीच कृती घडते, जी मेंदूत कोरली गेली आहे. यालाच मानसशास्त्राच्या भाषेत उद्दिपक - प्रतिसाद संबंध (स्टिम्युलस-रिस्पॉन्स रिलेशनशिप) असं म्हटलं आहे. आपल्या स्वभावामध्ये, वर्तनामध्ये, कृतीमध्ये व्यक्तिमत्त्वामध्ये ठरवून आपल्याला बदल घडवायचे असतील तर आपण ती पद्धत वापरतो.

जो बदल आपल्याला स्वतःमध्ये घडवायचा आहे, त्या बदलाचं व्हिज्युअलायझेशन (कल्पना) आपण करीत गेलो, तर तो बदल आपल्यामध्ये घडून येतो. उदा. समजा तुम्हाला स्वतःच्या बोलण्यातला आत्मविश्‍वास वाढवायचा असेल, तर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीशी आत्मविश्‍वासाने बोलता आहात, असं व्हिज्युअलायझेशन रोज रात्री झोपताना अथवा सकाळी अंथरुणातून उठण्यापूर्वी डोळे बंद ठेवून केलंत, तर तुमचा इतरांशी बोलण्यातला आत्मविश्‍वास वाढेल. असं व्हिज्युअलायझेशन जितकं अधिक वेळा तुम्ही करीत जाल, तितकं ते मनात अधिक पक्‍कं नोंदवलं जाईल व जेव्हा तसा प्रसंग येईल तेव्हा तीच प्रक्रिया घडेल. अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी, उत्साह, आत्मविश्‍वास, कार्यक्षमता, सर्जनशीलता इत्यादी अनेक गोष्टीसाठी हे तंत्र उपयोगात येऊ शकतं. चिंता, भीती, झोप, आळस, थकवा, ताणतणाव इत्यादी घालविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof raja aakash wirte pahatpawal aricle in editorial