दुर्बलतेवर मात

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 11 एप्रिल 2019

एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनावरचा ताण असह्य होतो. त्या परिस्थितीपासून बचाव करण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होते. ‘मी हे करत नाही’, ‘मला याची भीती वाटते,’ असं सांगितलं तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, आपलं हसं होईल, अशा कोंडीत सापडल्यावर आपल्याला काहीतरी आजार झाला, तर या परिस्थितीतून सुटका होऊ शकते ही भावना मनात तीव्र होऊ लागते. आजाराची लक्षणं शरीरात दिसू लागतात. असं झालं तर परिस्थितीही टाळली जाते, शिवाय लोकांची सहानुभूतीही मिळते. आधी होऊन गेलेल्या आजाराची लक्षणं, दुसऱ्या व्यक्‍तीच्या आजाराची पाहिलेली लक्षणं, टीव्हीवर पाहिलेली किंवा कुठेतरी वाचलेली लक्षणं त्या व्यक्‍तीमध्ये दिसू लागतात.

एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनावरचा ताण असह्य होतो. त्या परिस्थितीपासून बचाव करण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होते. ‘मी हे करत नाही’, ‘मला याची भीती वाटते,’ असं सांगितलं तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, आपलं हसं होईल, अशा कोंडीत सापडल्यावर आपल्याला काहीतरी आजार झाला, तर या परिस्थितीतून सुटका होऊ शकते ही भावना मनात तीव्र होऊ लागते. आजाराची लक्षणं शरीरात दिसू लागतात. असं झालं तर परिस्थितीही टाळली जाते, शिवाय लोकांची सहानुभूतीही मिळते. आधी होऊन गेलेल्या आजाराची लक्षणं, दुसऱ्या व्यक्‍तीच्या आजाराची पाहिलेली लक्षणं, टीव्हीवर पाहिलेली किंवा कुठेतरी वाचलेली लक्षणं त्या व्यक्‍तीमध्ये दिसू लागतात. असं झाल्यावर त्या परिस्थितीतून त्या माणसाची सुटका होते.
‘परीक्षा जवळ आली, पण अभ्यास झालेला नाही, तेव्हा कमी मार्क मिळतील, आपण नापास होऊ, आई-बाबा चिडतील, नातेवाईक, मित्र हसतील. त्यापेक्षा आपण आजारी पडलो बरं होईल,’ हा विचार मनात इतका तीव्र होत जातो, की तो विद्यार्थी खरंच पेपरच्या दिवशी आजारी पडतो. परीक्षेतून व सर्वांच्या टोमण्यांमधून त्याची सुटका होते व मनावरचा ताणही कमी होतो.बऱ्याचदा आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येतात, जे आपल्याला टाळायचे असतात. ‘मला हे मुळीच आवडलेलं नाही.’ ‘मला हे करावसंच वाटत नाही’, असं आपण स्पष्टपणे सांगतो व त्या प्रसंगातून सुटका करून घेतो; पण काही लोकांना मात्र असं स्पष्टपणे सांगायला जमत नाही. ही वाक्‍यं त्यांच्या अंतर्मनाचा भाग बनतात व आजाराच्या रूपानं तशी परिस्थिती निर्माण करतात. असे लोक कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकत नाहीत. त्यांना सतत इतरांची सहानुभूती व मदत हवी असते. ते खूप एक्‍साइट होतात. ज्यामुळे त्रास होतो, अशा गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात. नाकारतात किंवा त्या विचारांचं दमन करतात.

आजारी राहण्यामुळे आपल्याला फायदा होतो, असं लक्षात आलं की तो आजार बरा झाल्यावरही त्याची लक्षणं कायम राहतात व ती व्यक्‍ती त्याचे फायदे घेत राहते. कविताला खूप काम केल्यामुळे एकदा चक्‍कर आली. तिची खाष्ट सासू धावत आली व तिला उचलून बिछान्यावर नेलं, पाणी पाजलं, जेवायला वाढलं. दोन दिवस ती सुनेशी भांडली नाही, शिवाय तिचे लाड केले. एका छोट्या आजारातून सासूच्या वर्तनात परिवर्तन झालं. आजारी असलं की असा फायदा होतो, म्हणून कविताला नियमित ‘चक्‍कर’ यायला लागली व सासू तिची सेवा करू लागली. हा मानसिक कमकुवतपणा आहे. हा घालवण्यासाठी परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता वाढवायला हवी. ठरवलं तर हे करता येतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof raja aakash wirte pahatpawal aricle in editorial