मनावरचा ताण असह्य झालायं? मग हे वाचा

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 20 जून 2019

आयुष्यात न आवडणाऱ्या गोष्टीही बऱ्याचदा स्वीकाराव्या लागतात. समस्येपासून पळ न काढता, त्याचा मुकाबला करायला आपण शिकलो तर आत्मविश्‍वास वाढेल आणि आयुष्य अधिक समृद्ध होईल.

एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनावरचा ताण असह्य होतो. त्या परिस्थितीपासून बचाव करण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होते. ‘मी हे करीत नाही’, ‘मला याची भीती वाटते’ असं सांगितलं तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, आपलं हसं होईल, अशा कोंडीत माणूस सापडला की आपल्याला काहीतरी आजार झाला पाहिजे, तरच आपली या परिस्थितीतून सुटका होऊ शकते, असं त्याला वाटू लागतं. 

असं झालं तर परिस्थितीही टळते व शिवाय लोकांची सहानुभूतीही मिळू लागते. आधी होऊन गेलेल्या आजारांची लक्षणं, दुसऱ्याला झालेल्या आजारांची पाहिलेली लक्षणं, किंवा कुठेतरी वाचलेली लक्षणं त्या व्यक्‍तीमध्ये दिसू लागतात. असं झाल्यावर त्या परिस्थितीतून त्याची सुटका होते. परीक्षा जवळ आली, पण अभ्यास झालेला नाही, कमी मार्क्‍स मिळतील, आपण नापास होऊ, आई-बाबा चिडतील, नातेवाईक, मित्र हसतील. त्यापेक्षा आपण आजारी पडलो, ताप आला तर बरं होईल, हा विचार मनात इतका तीव्र होत जातो की तो विद्यार्थी नेमका परीक्षेच्या दिवशी आजारी पडतो.

परीक्षेतून व सगळ्यांच्या टोमण्यांमधून त्याची सुटका होते व मनावरचा ताणही कमी होतो. शाळेत वर्गशिक्षक शिक्षा करतात. त्यामुळं शाळेत जायची मुळीच इच्छा होत नाही; पण असं सांगितलं तरी घरचे शाळेत पाठवतातच. तेव्हा आपल्याला काहीतरी झालं पाहिजे, म्हणून मुलं शाळेत जाण्याच्या वेळी आजारी पडतात.

बऱ्याचदा आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येतात जे आपल्याला टाळायचे असतात. ‘मला हे मुळीच आवडलेलं नाही.’ ‘मला हे करावसंच वाटत नाही’, असं आपण स्पष्टपणे सांगतो व त्या प्रसंगातून सुटका करून घेतो. पण सर्वच जण असं स्पष्टपणे सांगायला धजावत नाहीत. ‘मला काहीतरी आजार झाला पाहिजे, मगच यातून सुटका होईल’, असं त्यांना वाटू लागतं. हे वाक्‍य त्यांच्या अंतर्मनाचा भाग बनतं व आजाराच्या रूपाने तशी परिस्थिती निर्माण होते. असे लोक जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकत नाहीत. त्यांना सतत इतरांची सहानुभूती व मदत हवी असते. ते खूप उत्तेजित होतात. त्यांच्या भावनांमध्ये उथळपणा असतो. त्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात, नाकारतात किंवा त्या विचारांचं दमन करतात. आयुष्यात न आवडणाऱ्या गोष्टीही बऱ्याचदा स्वीकाराव्या लागतात. समस्येपासून पळ न काढता, त्याचा मुकाबला करायला आपण शिकलो तर आत्मविश्‍वास वाढेल आणि आयुष्य अधिक समृद्ध होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof raja aakash wirte pahatpawal aricle in editorial

टॅग्स