भाष्य : परग्रहावरील ‘संदेशा’चा संदेह!   

भाष्य : परग्रहावरील ‘संदेशा’चा संदेह!   

परग्रहावरील सजीवसृष्टीचा शोध घेणे, ही मानवाची महत्त्वाकांक्षा व एक स्वप्नही आहे. येत्या काही वर्षांत परग्रहावरील सजीवसृष्टीचा शोध घेता येईल, अशी शास्त्रज्ञांना आशा वाटते. ‘मित्र’ ताऱ्याच्या प्रदेशातून अलीकडेच आलेल्या एका रेडिओ संदेशामुळे, तो परग्रहावरील सजीवसृष्टीकडून आला आहे काय अशी चर्चा सध्या सुरू आहे.

आपल्या सूर्यापासून ४.२ प्रकाशवर्षे (एका वर्षात प्रकाश कापतो ते अंतर ) अंतरावर ‘प्रॉक्‍झिमा सेंटॉरी’ नावाचा तारा असून, तो तांबडा खुजा ( रेड ड्‌वार्फ) प्रकारातील आहे. त्याला मराठीत ‘मित्र’ म्हटले जाते. दक्षिण आकाशात नरतुरंग ( सेंटॉरस ) तारकासमूहात हा तारा आहे. तो आपल्याला सर्वात जवळचा तारा असल्यामुळे या ता-याभोवती फिरणा-या एखाद्या ग्रहावर सजीवसृष्टीच्या शक्‍यतेची चापचणी करण्यासाठी या ता-याची २०००पासून  निरीक्षणे घेण्यात आली. तेव्हा या ताऱ्याभोवती एक ग्रह फिरत असल्याचे आढळले. या ग्रहाच्या अस्तित्वाची खात्री करण्यासाठी २०१६ मध्ये अनेक निरीक्षणे घेण्यात आली. त्यानुसार तेथे ग्रह असल्याचे मान्य झाले, शिवाय आणखी एक ग्रह या ताऱ्याभोवती फिरत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. त्यापैकी ‘प्रॉक्‍झिमा - बी’ हा ग्रह पृथ्वीपेक्षा १.३ पट जड असून, त्याच्या ता-याभोवती पृथ्वीवरील ११.२ दिवसांत तो एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून ७५ कोटी कि.मी. अंतरावरून प्रदक्षिणा घालतो. हा ग्रह व त्याचा तारा यांमधील अंतर या ग्रहावर सजीवसृष्टीची शक्‍यता सूचित करते. कारण या अंतरावर ग्रह असेल तर तो अतिउष्ण किंवा अतिथंड असणार नाही व वाहते पाणी असण्यासाठी आवश्‍यक तापमान असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.  मात्र सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी एवढे पुरेसे नाही.

 आता हा तारा पुन्हा एकदा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण या ताऱ्याच्या दिशेने रेडिओलहरी पृथ्वीवर आल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी केल्याचे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे हा रेडिओ संदेश या प्रदेशातील एखाद्या ग्रहावरील सजीवसृष्टीकडून आला असावा, असे लंडनच्या ‘गार्डियन’ या वर्तमानपत्राने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. त्यानंतर ‘सायंटिफिक अमेरिकन’सारख्या विविध विज्ञान नियतकालिकांनी याविषयी चर्चा चालू केली आहे. एप्रिल, मे २०१९ मध्ये ‘पार्क्‍स ऑब्झर्व्हेटरी’ या ऑस्ट्रेलियातील वेधशाळेतील प्रचंड मोठ्या दुर्बिणीतून या संदेशाचे ग्रहण करण्यात आले. रशियन उद्योगपती युरी मिल्नर यांच्या निधीतून उभारलेल्या ‘ब्रेकथ्रू लिस्टन’ या कार्यक्रमांतर्गत परग्रहावरील सजीवसृष्टीचा वेध घेतला जात आहे. दहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये व विज्ञान - तंत्रज्ञानाशी निगडित विविध उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक असलेल्या मिल्नर यांनी विख्यात भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्यासमवेत ‘ब्रेकथ्रू लिस्टन’ या दहा कोटी डॉलरच्या प्रकल्पाची घोषणा केली व २०१५ पासून हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्यावेळी हॉकिंग म्हणाले होते, ‘‘मानवजातीला प्रकर्षाने गरज आहे ती शोधण्याची, शिकण्याची व जाणण्याची. या विश्वातील अंधारात आपण एकटेच आहोत काय हे जाणून घेणे आपणासाठी महत्त्वाचे आहे’’. 

 संदेशाच्या छाननीनंतरच निष्कर्ष
या कार्यक्रमात परग्रहावरून येणारे विविध संदेश ग्रहण करून त्यांचा अभ्यास केला जातो. या कार्यक्रमांतर्गत काम करणा-या शेन स्मिथ या विद्यार्थ्यास ९८२ मेगाहर्टझ वारंवारितेचा संदेश प्राप्त झाला. या वारंवारितेच्या प्रांतातून येणारा संदेश सजीवसृष्टीची शक्‍यता वर्तवतो असे समजले जाते. कारण तेथे मानवनिर्मित साधनांचा अभाव असतो. परंतु सर्व संदेशांचा अभ्यास करावा लागतो. असे संदेश पृथ्वीवरील एखाद्या यंत्रणेमार्फत, पृथ्वीवरील मानवाने अंतराळात सोडलेल्या उपग्रहावरून किंवा तत्सम स्रोतांपासून किंवा नैसर्गिक स्रोतांपासून आलेला नाही ना याचा शोध घेतला जातो. या संदेशाबाबतच्या अन्य शंका दूर केल्यानंतर म्हणजे हा संदेश केवळ त्याच ताऱ्याकडील भागातून प्राप्त झाला आहे व कोणत्याही मानवनिर्मित साधनांपासून ( ह्युमन इंटरफरन्स) आलेला नाही, या निष्कर्षास पोहोचल्यानंतरच त्याविषयी भाकीत करता येईल. शेन स्मिथ व त्यांच्या सहका-यांनी उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या रेडिओ संदेशाचे ‘बीएलसी १’ (ब्रेकथ्रू लिस्टन कॅंडिडेट १) असे नामकरण केले आहे. ‘कॅंडिडेट’ म्हणजे उमेदवार! उमेदवारास काही कसोट्या, परीक्षा पार कराव्या लागतात. तशाच या संदेशाला काही कसोट्या पार कराव्या लागणार आहेत. त्यात उत्तीर्ण झाल्यास हा संदेश परग्रहावरील सजीवसृष्टी पृथ्वीवरील मानवाशी संवाद साधू पहात आहे असे म्हणता येते. हे कितीही रोमांचक वाटत असले तरी आजपर्यंत एकही असा संदेश प्राप्त झालेला नाही. या संदेशाला ‘वॉव’ संदेश असेही म्हटले जात आहे. कारण परग्रहावरील सजीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी ‘सर्च फॉर एक्‍स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स’ नावाचा ‘ब्रेकथ्रू लिस्टन’पेक्षा जुना उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत सुदूर अवकाशातून आलेल्या एका वेगळ्या संदेशाचे ‘बिग इयर रेडिओ ऑब्झर्व्हेटरी’ या ओहियो येथील वेधशाळेने १९७७ मध्ये ग्रहण केले होते. या वेगळ्या संदेशाची माहिती नोंदवून खगोलशास्त्रज्ञ जेरी इहमॅन यांनी त्या माहितीनंतर, इंग्रजीत अत्यानंद व्यक्त करण्यासाठी उच्चारला जाणारा ‘वॉव’ हा शब्द लिहिला. तेच नाव या संदेशाला देण्यात आले आहे. 

वेगळ्या सजीवसृष्टीचे अस्तित्व? 
हा रेडिओ संदेश ‘मित्र’ ता-याच्या भागातून आल्याचे सिद्ध झाले, तरी तो तिकडील सजीवांमुळेच किंवा सजीवांनीच पाठविला या निष्कर्षाप्रत येणे कितीही आनंददायी वाटत असले, तरी तेवढीच शक्‍यता असेल असे नाही. तिकडील अन्य कारणांमुळेही असे होऊ शकते असेही समजले जात आहे. याला कारण म्हणजे त्या ग्रहाचे स्थान सजीवसृष्टीची शक्‍यता वर्तवित असले तरी प्रत्यक्ष तशी परिस्थिती त्या ग्रहावर आहे काय याचा विचार केला जात आहे. हा ग्रह त्याच्या ता-याभोवती फिरताना त्याची एकाच बाजू त्या ता-याकडे असते व दुसरी बाजू विरुद्ध असते. त्यामुळे अर्ध्या भागात वेगळे तापमान व दुस-या अर्ध्या भागात वेगळे तापमान, म्हणजेच अर्धा भाग कायम अंधारात व अर्धा भाग कायम उन्हात किंवा त्या ता-याच्या प्रकाशात. शिवाय हा तारा तांबडा खुजा ( रेड ड्‌वार्फ ) प्रकारातील असून त्याच्यापासून उत्सर्जित केल्या जाणा-या ज्वाळांमुळे तेथील वातावरण उडून गेले असावे. चार अब्ज वर्ष आयुष्य असलेल्या ताऱ्याने उत्सर्जित केलेल्या ज्वाळांमुळे किंवा त्या ताऱ्याच्या वाऱ्यामुळे दहा कोटी वर्षांत तेथील वातावरण नष्ट झाले असावे, असा कयास करता येतो. अशा परिस्थितीत सजीवसृष्टीचे अस्तित्व पृथ्वीवरील मानवाच्या दृष्टिकोनातून असंभव वाटते. परंतु वेगळ्या स्वरूपाच्या सजीवसृष्टीचे अस्तित्व असूही शकते. या ग्रहावर आपल्याकडे जसा पिवळसर प्रकाश असतो त्याऐवजी तांबूस प्रकाश असतो. त्यामुळे तेथे सजीवसृष्टी असलीच तर तिचे स्वरूप निश्‍चित वेगळे असू शकेल. ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील खगोलजीवशास्त्रज्ञ लेविस डार्टनेल म्हणतात, ‘‘या ग्रहावर स्थिर वातावरणाची कल्पना करणे आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्म अप्रगत प्राण्यांपासून ते बुद्धिमान प्राणी सापडणे खूप कठीण आहे असे वाटते, परंतु मी चुकीचा ठरलो तर मला आवडेल.’’

 परग्रहावरील सजीवसृष्टीचा शोध घेणे ही फार महत्त्वाकांक्षी बाब आहे व मानवजातीचे एक स्वप्नही आहे. अजून त्यात यश आले नसले तरी येत्या काही वर्षांत परग्रहावरील सजीवसृष्टीचा शोध घेता येईल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. आजपर्यंत या विषयावर अनेक विज्ञान काल्पनिक कथा लिहिल्या गेल्या आहेत, अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. एकदा का परग्रहावरील सजीवसृष्टीचा शोध लागला की या सर्वांना पुन्हा उधाण येईल. कारण तो विषय सर्वांसाठी तितकाच मनोरंजक व वेधक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com