आपत्ती व्यवस्थापनेतून जनसेवा!

मंदिरं, देवालयं, शक्तीस्थळ आणि धार्मिकस्थळी भाविकांची दिवसागणिक वाढणारी गर्दी यावर नियंत्रण ठेवत असताना मंदिर आस्थापना व व्यवस्थापनांसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीसह मानवी आपत्तीस सामोरे जावे लागते.
आपत्ती व्यवस्थापनेतून जनसेवा!
आपत्ती व्यवस्थापनेतून जनसेवा!sakal
Updated on

मंदिरं, देवालयं, शक्तीस्थळ आणि धार्मिकस्थळी भाविकांची दिवसागणिक वाढणारी गर्दी यावर नियंत्रण ठेवत असताना मंदिर आस्थापना व व्यवस्थापनांसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीसह मानवी आपत्तीस सामोरे जावे लागते. त्या दृष्टीने प्रभावी नियोजन करण्यासाठी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टने चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले. आपत्ती निवारण व बचाव पथकाची व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या उपक्रमशील संकल्पनेतून साकारली आहे.

- योगेश सोनवणे, पिंपळगाव (वा.) जि. नाशिक

सह्याद्री पर्वतरांगेत नाशिक जिल्ह्याच्या उत्तर बाजूस वसलेले श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड हे तीर्थक्षेत्र. वर्षभरात ४० लाखांहून अधिक दर्शनार्थी भाविकांची मांदियाळी या तीर्थक्षेत्रावर पाहायला मिळते. सप्तश्रृंगगडावर येण्याचे विविध मार्ग व या मार्गांवरील आव्हाने अतिवृष्टी, धुक्याने झाकोळलेला परिसर ठिकठिकाणचे धबधबे व उंच उंच शिखरे तर काही ठिकाणी खोलखोल दऱ्या. अशा विविधांगी परिस्थितीत श्रद्धेने येणाऱ्या भाविकांची प्रभावी गर्दीचे व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण, संभाव्य आपत्ती सदृश्य परिस्थितीचे अवलोकन करून ती उद्भवू नये तसेच उद्भवल्यास शीघ्र गतीने शोध व बचावकार्य आनुषंगिक प्रक्रिया करता याव्यात या दृष्टीने २४ × ७ प्रकारात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव पथक कार्यान्वित करून विश्वस्त संस्थेने या तीर्थक्षेत्राला सुरक्षित ठेवण्याचा २०२४ पासून प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी केंद्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती गरजेप्रमाणे नाशिक महानगरपालिका, अग्निशमन पथक, विविध शासकीय रुग्णालय, महाराष्ट्र राज्य पोलिस, होमगार्ड तसेच अनिरुद्ध डिझास्टर ॲकॅडमी, रेजिलेंट इंडिया आदींसारख्या अनुभवी तज्ञ सेवाभावी संस्थांच्या सहभाग घेऊन श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज आहे.

२०१८ मध्ये हतगड (ता. कळवण) येथील परिसरात गुजरात येथील लक्झरी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती बस ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली होती. त्यात बचाव पथकाने ५० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षितस्थळी पोचवत मदतकार्य केले. २०२० मध्ये मालेगाव येथून कळवणकडे जात असलेल्या एसटी बसचा आणि प्रवाशी रिक्षाचा तालुक्यातील मेशी येथे अपघात झाला. अन् रिक्षासह बस विहिरीत गेली. त्यावेळी या आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करत प्रवाशांना बाहेर काढले. जुलै २०२२ मध्ये सप्तश्रृंगगड येथे अतिवृष्टी झाली. त्यामुळे मंदिराच्या परतीच्या मार्गावर दरड कोसळली. या घटनेत दोन महिला तीन पुरुष यांचा समावेश होता. त्या जखमी भाविकांना आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने सुरक्षित रुग्णालयात दाखल केले. २०२४ मध्ये आंध्रप्रदेश येथील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलने घाट परिसरात अचानक पेट घेतला या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शिवालय परिसरात आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकातील जीवरक्षक महिला व पुरुष २४ तास कार्यरत असतात. मंकी बाईट, चक्कर येणे, इतर आरोग्य संदर्भात भाविकांना काही अडचणी आल्यास अशा प्रसंगी प्रथमोपचार करून तत्काळ रुग्णालयात पोचवणे. खोल दरीत अडकलेल्या भाविकांना मदतीचा हात देत सुखरूप बाहेर काढणे.असे आपत्ती संदर्भातील प्रभावी व्यवस्थापन श्री सप्तश्रृंग निवासिनी ट्रस्टच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथक पार पाडत आहे. आपत्ती बचाव पथकात मास्टर ट्रेनर मंगेश केदारे, फायर फायटर संकेत नेवकर, प्रथमोपचार व फायर फायटर पराग कुलकर्णी, लहानू गायकवाड व त्यांचे सहकारी या बचाव पथकात सक्रिय सहभागी आहेत. त्यांना जिल्हा आपत्ती अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांचेही मार्गदर्शन मिळत आहे.

‘एनडीआरएफ’कडून कौतुक

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) यांच्या मार्गदर्शनानुसार रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात आली. यात संस्थेने सक्रिय सहभाग नोंदवला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संतोष बहादूर सिंग यांनी विश्वस्त संस्थेची माहिती जाणून घेत आपत्ती निवारण प्रकियेतील विश्वस्त संस्थेचे सूक्ष्म नियोजन पाहून कौतुक केले. यापूर्वी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यापुढेही सातत्याने अशा कार्यशाळा राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com