फक्‍त "मम' म्हणा !  (ढिंग टांग !)

फक्‍त "मम' म्हणा !  (ढिंग टांग !)

मातोश्रीगडावरील वातावरण तसे थंड होते. हल्ली मुंबईत थंडी पडू लागली आहे, ह्या कल्पनेने महाराजांनी फॅनची नियंत्रण कळ फिरवून "ऑन'वरून "तीन'वर आणली. गडावर सामसूम होती. अयोध्येचा उत्तर दिग्विजय साजरा करून काही दिवस लोटले. प्रवासाचा शिणवटा जवळपास गेला होता. नवी मसलत कोठली हाती घ्यावी? ह्या विचारात महाराज गढले असतानाच फर्जंदाने वर्दी दिली. 

"कमळाबाईसाहेबांकडोन कुणी दूत आला आहे. अर्जंट भेटावयाचे आहे, ऐसे म्हणताती! काय करावे?'' फर्जंद अदबीने म्हणाला. महाराज चांगल्या मूडमध्ये असावेत. त्यांनी खूण करोन "पाठवा आत...' ऐसे फर्मावले. कमळाबाईने दिवाळीत पाठवलेला फराळाचा पुडा "फराळ खवट आहे' असे कारण सांगून महाराजांनी परत धाडला होता. आता पुन्हा काय असेल? महाराजांना नवल वाटले. 

"मुजरा साहेब!,'' दारातून एक ओणवे गृहस्थ प्रविष्ट झाले. परंतु ते दक्षिणेकडील भिंतीकडे बघून मुजरा करीत होते, हे बघोन महाराजांना भारी आश्‍चर्य वाटले. दक्षिणेकडील भिंतीवर वाघाचा फोटो आहे! 

"आम्ही इथे उभे आहोत!,'' किंचित खाकरोन महाराजांनी जाणीव करोन दिली. ओणवे गृहस्थ ऊर्फ कमळाबाईचे दूत त्याच अवस्थेत गर्रकन मागे वळले, आणि हातपंप ऊर्फ हापशीचा हात हलवावा, तसा त्यांनी पुन्हा एकवार मुजरा केला. 
""काय काम काढले?,'' महाराजांना गप्पा झाडण्यात काहीच रस नव्हता. सबब त्यांनी थेट विषयालाच हात घातला. 
""आधी पाणी तरी विचाराल की नाही, साहेब!,'' सोफ्यावर ऐसपैस कोल्हापुरी थाटात बसत कमळाबाईच्या दूताने फर्मावले. दूत आगाऊ असावा! थेट महाराजांना पाणी आणून द्या, असे सांगतो म्हंजे काय? 
""तुम्ही कोल्हापूरकर का?'' महाराज त्यांच्याकडे रोखून बघत म्हणाले. 

"होय, आम्हीच ते कोल्हापूरकर...,'' पाण्याचा घोट घटाघटा घेत दूत म्हणाला. 
""पुढल्या वेळेस बाटलीतून आणत जा!,'' असे संतापून महाराज पुटपुटले. 
""आमच्या मोठ्या मसलतीस तुमचे पाठबळ हवे, असा वरिष्ठांचा सांगावा आहे!,'' पाण्याचा गिलास मेजावर दाणकन ठेवून (कोल्हापूर हो...) दूत म्हणाला. 
""कोण वरिष्ठ? आम्हाला कोणी वरिष्ठबिरिष्ठ नाहीत...,'' महाराज गुरगुरले. त्यांच्या गुरगुरण्याने दचकून दूताने दक्षिणेकडील भिंतीवरल्या वाघाच्या फोटोकडे पाहिले. 
""कमळाबाईसाहेबांचा निरोप आहे की सारं काही तुमच्या मनासारखं केलं आहे!,'' दूत म्हणाला. 

" हो तर...फारच मनासारखं केलंत म्हणावं! इथं चार वर्ष जीव जाळला आमचा! मोठ्या मनानं आम्ही तुमच्या बाईसाहेबांच्या हाती कारभार सोपवला, त्याचे चांगले पांग फेडलेत म्हणावं!,'' महाराज घुश्‍शात म्हणाले. त्यांना संतापच आला होता. आपल्या रयतेला नाडणाऱ्या ह्या उपटसुंभ कारभाऱ्यांना काय बोलणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ...महाराज चिडचिडत पाठ फिरवोन उभे राहिले. 

" तुमच्या मनासारखं केलं नाही, असं का म्हणता साहेब?,'' कोल्हापूरचे कमळाबाईचे दूत पोक्‍तपणे म्हणाले. त्यांच्या चष्म्यावर वाफ धरल्यासारखे झाले होते. 
""का म्हणता म्हंजे? इथे रयतेला आम्ही बांधील आहोत, तुम्ही नव्हंत!!,'' महाराज कडाडले. 
"" अहो, असे रागेजूं नका!! महामंडळांच्या नियुक्‍त्यांपासून नाणारच्या स्थगितीपरेंत साऽऽरं काही तुमच्यासाठीच केलं!! आता तरी मनातून राग काढून टाका आणि आमच्या मसलतीला पाठबळ द्या!! आमच्या हाताला हात लावून "मम' म्हटलंत तरी पुरे...बाकी आम्ही आमचं बघून घेऊ!..,'' दूताने कानाशी येऊन सांगितले. महाराजांना तो युक्‍तिवाद मनोमन पटला, पण एकदम राजी कसे होणार? बराच वेळ कोणी काही बोलले नाही. अखेर ते घडले 

"बरं...मम तर मम!,'' महाराज खचून म्हणाले. तेवढ्यात कुठून तरी म्यांव असा आवाज आला. कमळाबाईच्या दूताने चमकून वाघाच्या फोटोकडे पाहिले, आणि गालातल्या गालात हसत गड सोडला!! 

-ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com