नवे वर्ष, नवे संकल्प ! (ढिंग टांग!)

नवे वर्ष, नवे संकल्प ! (ढिंग टांग!)

सर्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ज्या अर्थी आपण हा मजकूर सक्‍काळी सक्‍काळी वाचत आहा, त्याअर्थी काल रात्री बारा वाजता आपण शांतपणे झोपी गेला होता. उर्वरितांनी (लिंबूसरबताचे घुटके घेत) आमच्या (नम्र) शुभेच्छा उदारपणे यथावकाश स्वीकाराव्यात. येते नवे वर्ष आपणां सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्याचे जावो! नव्या वर्षात नवे संकल्प करण्याचा एक परिपाठ आहे. किंबहुना, नववर्षाला एखादा संकल्प आयुष्यात एकदाही केला नाही, असा मनुष्यमात्रच विरळा. मिसरुड फुटण्याच्या वयात आम्ही डायरी लिहिण्याचा संकल्प सोडला होता.

तथापि, सात जानेवारी ह्या तारखेच्या पानावर आम्ही कु. बेबी (आमच्या शेजारील बिऱ्हाड) हिच्यासंबंधी काही मनमोकळा मजकूर लिहून ठेवलेला तीर्थरूपांच्या वाचनात आल्याने पुढील काही दिवस आम्ही कुठल्याच हाताने कुठलेच काम करण्याच्या लायकीचे राहिलो नव्हता. परिणामी, डायरी लिहिण्याच्या संकल्पाची आपापत: वासलात लागली. तसे पाहू गेल्यास गेली कैक वर्षे आम्ही मॉर्निंग वॉकचा संकल्प सोडून एक जानेवारी ते तीन जानेवारी ह्या तीन दिवसात रोज चालावयास जातो. चौथ्या दिवशी जागच येत नाही!! परिणामी, हाही संकल्प पुरा होण्याची शक्‍यता धूसर होत चालली आहे.

मावा अथवा खर्रा अथवा तत्सम गाय छापी व्यसनांपासून दूर जाण्याचाही संकल्प आम्ही अनेकदा सोडून पाहिला आहे. परंतु...जाऊ दे, झाले! आमचे तूर्त राहू द्या. वाचकहो, येते वर्ष हे इलेक्‍शनचे वर्ष आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी इलेक्‍शन वर्षात कोठले संकल्प सोडले, ह्याचा धांडोळा आम्ही (हळूचकन) घेतला. त्यातून आम्हाला अनेक नवे संकल्प कळून आले.

ते येणेप्रमाणे : 

उधोजीसाहेब : एकदा तरी "युती संपली, संपली, संपली!' असे ठणकावून जाहीर करून खरेच तसे "करून दाखवण्या'चा संकल्प यंदाही केला आहे! माय मराठीच्या आशीर्वादाने आमचा संकल्प तडीस जाईल ह्याची खात्री आहे. राममंदिर काय, कधीही बांधू!! ह्या कमळवाल्यांना ज्या गोष्टी जमल्या नाहीत, त्या सगळ्या ह्या एका वर्षात करून दाखवू! युतीची भानगड हाच सगळ्यात मोठा च्यालेंज आहे! हर हर हर हर महादेव..! 

राजभैय्या : कसला संकल्प? आज कुठली तारीख आहे? मी सगळ्यांच्या आधीच सांगितलं होतं नं की यंदा इलेक्‍शन घेणार हे लोक म्हणून...आणखी काय पाहिजे? निघा...! 
पृथ्वीबाबाजी चव्हाणसाहेब : दिल्लीच्या रस्त्यात उजळमाथ्याने पुन्हा एकदा हिंडायचे आहे. पुन्हा एकदा दिल्लीत बॅडमिंटन, टेनिस वगैरे खेळून घ्यायचे आहे. राजधानीतून आम्ही निघालो, आणि तिथले प्रदूषण वाढले. ते पुन्हा घालवायचे आहे...असे बरेच संकल्प आहेत! 

दादाजी बारामतीकर (धाकले धनी) : मी कुठ्‌ठलाच संकल्प बोलणार न्नाही! काहीही झालं तरी तुम्ही तुम्हाला पाह्यजेल तेच लिहिणार! 

नितीनभौ गडकरीसाहेब : संकल्प वगैरे आम्ही करत नसतो. कारण संकल्प आला की पूर्ती आलीच! पूर्ती म्हटलं की आम्ही तिथून गायब!! काय कळलं? 
सुधीर्जी मुनगंटीवार्जी : यंदा वाघांची संख्या दुप्पट करून साडेतेरा कोटी झाडे लावणार आहे! पण जाहीर करणार नाही, गेल्या खेपेला असेच जाहीर केले होते, वाघ साडेतेरा कोटी व्हायला निघाले! 

नानासाहेब फडणवीस : सांगावयास आनंद वाटतो की नमो नम:..ह्या सिद्धमंत्राचा एक कोटी जप करण्याचा संकल्प तडीस गेला. आता पुढल्या पाच वर्षांत दहा कोटी जप करण्याचा संकल्प आहे. होय, प्रगती करतोय महाराष्ट्र माझा! 

-ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com