आवतण! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

सदू : (दार ठोठावत) दादू...दादू, दार उघड! मी आलोय! 
दादू : (दाराच्या फटीतून) तू? अरे, बाप रे!! एवढ्या अवेळी का आलायस? 
सदू : (कंटाळून) अवेळ कसली? दिवसाढवळ्या आलोय! 
दादू : (अर्धे दार उघडत) विश्‍वास बसत नाहीए!! 
सदू : (नोस्टाल्जिक होत) ह्याच घरात मी लहानाचा मोठा झालो ना दादूराया? 

सदू : (दार ठोठावत) दादू...दादू, दार उघड! मी आलोय! 
दादू : (दाराच्या फटीतून) तू? अरे, बाप रे!! एवढ्या अवेळी का आलायस? 
सदू : (कंटाळून) अवेळ कसली? दिवसाढवळ्या आलोय! 
दादू : (अर्धे दार उघडत) विश्‍वास बसत नाहीए!! 
सदू : (नोस्टाल्जिक होत) ह्याच घरात मी लहानाचा मोठा झालो ना दादूराया? 

दादू : (भावविवश होत) सद्या...सद्या किती आठवण येते रे तुझी!! 
सदू : (किंचित हसून) घरात तरी घेणार आहेस का? की असंच दारात उभं राहून बोलायचंय? 
दादू : (दुर्लक्ष करत) काय काम काढलंस? टाळीबिळी देणार नाही हं!! आधीच सांगून ठेवतोय! 
सदू : (आनंदी सुरात) द्यावी लागणार! का विचार? 
दादू : (टेन्शनमध्ये) का? 
सदू : (डोक्‍यावर टोपी ठेवत) यंदा घरात कार्य काढलंय!! 
दादू : (फुस्स सुरात) त्यात काय... आमच्याही घरी यंदा कार्य आहे!! इलेक्‍शन आहे ना!! 

सदू : (तिडकून) मरू दे रे तुझं इलेक्‍शन! ते काय कार्य आहे? मी तुझ्या लाडक्‍या पुतण्याचं लग्न काढलंय!! 
दादू : (हर्षभराने) काय म्हणतोस? खरंच? तुझं अभिनंदन!! आता तू सासरा होणार! जरा जबाबदारीनं वाग हं! उशिरा उठणं बंद केलं आहेस ना? 
सदू : (ओशाळून) हो! 

दादू : (खांद्यावर हात ठेवत) मग लौकर उठणं आता बंद कर ! उशिरा उठलास, तर घरात कमी त्रास होईल तुझा!! काय? 
सदू : (चमकून भानावर येत) ही...ही पत्रिका... 
दादू : (स्वप्नवत डोळ्यांनी)...आमचा अमित एवढा मोठा झाला...अं? 

सदू : (थंडपणाने) त्याची दाढी बघितलीस ना? 
दादू : (हळुवार होत) मागे बघितलं तेव्हा केवढा लहान होता! 
सदू : (सदगदित सुरात) मला म्हणाला, बाबा, लग्नाचं पहिलं निमंत्रण काकांना गेलं पाहिजे!! 
दादू : (भारावून जात) बघ, नाही तर तू..! शेवटी माझा पुतण्याच माझं नाव राखणार!! 

सदू : (थंडपणाने) आपल्या राजकारणात पुतणेच काकांचं नाव राखतात ना? 
दादू : (अतिशय आनंदात) राजकारण गेलं चुलीत!!...मला तुला कडकडून भेटू दे! एकप्रकारे तुझं हे नवनिर्माणच नाही का? ये, असा आत ये!! 
सदू : (बंधुभावानं) तुझ्याही घरात आता लौकरच सून येईल की!! घोडामैदान फार दूर नाही बरं!! 
दादू : (चलाखीने विषय बदलत) हुंडाबिंडा घेतला नाहीस ना? 
सदू : (रागावून) हुंडा घेणाऱ्यांची गालफडं लाल करतो आम्ही! 
दादू : (पाठ थोपटत) अभिमान वाटतो तुझा!! शाब्बास! 
सदू : (डोक्‍यावरची टोपी सावरत अधिकृत स्वरात) आमचे येथे श्रीकृपेकरून 27 जानेवारी रोजी चि. अमित ह्याचा शुभविवाह करण्याचे योजिले आहे. ह्या शुभकार्यास सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसमवेत उपस्थित राहून वधुवरांस आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती! 

दादू : (कडवटपणाने) इष्टमित्रांसमवेत? आम्हाला कुणीही इष्टमित्र नाहीत, सद्या...कुणीही नाही!! 
सदू : (कोरडेपणानं) असं म्हणायची पद्धत असते दादूराया! उगीच फाटे फोडू नकोस! तुझे मित्र इष्टमित्र नाहीत, हे मी आधीच सांगितलं होतं!! 
दादू : (विषय झटकत) बरं, ते जाऊ दे! केळवणाला कधी येताय? तुझं विवाहकार्याचं निमंत्रण, तर माझं केळवणाचं! 
सदू : (उत्साहात) तू बोलावलंस की लग्गेच! खूप दिवसांत तुझ्या घरी जेवलेलो नाही!! 

दादू : (आश्‍वासन देत) ठीक ठीक! मग केळवणाची तारीख पक्‍की करू आधी! तुझ्यासाठी खास तुझ्या आवडीचे तेलकट बटाटे वडे करू की फुळकुणी सूप? तूच सांग! तुझ्या मनासारखा करू बेत! दे टाळी!! 

- ब्रिटिश नंदी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Dhing Tang