आठवणीतील गाणी! (ढिंग टांग!)

आठवणीतील गाणी! (ढिंग टांग!)

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. (बुद्रुक) 
(सौभाग्यवती कमळाबाई (त्यातल्या त्यात) लगबगीने हालचाली करत आवराआवर करत आहेत. दासदासींना सूचना देत आहेत. "चला,चला, तयारीला लागा!', बाई, बाई कित्ती उशीर झाला...आवरायला नको का?' वगैरे बडबड एकीकडे चालू आहे. दुसरीकडे सारखं दरवाजाकडे टुकून पाहात आहेत. अब आगे...) 
कमळाबाई : (मोठ्यांदा गुणगुणत) इंतहा हो गई इंतजार कीऽऽ..आई ना, कुछ खबर मेरे यार कीऽऽ...(अचानक आठवून दासीला विचारत) कुणाचा फोन आला होता का गं इतक्‍यात? नाही ना? वाटलंच होतं मला!

भल्या माणसानं मेली वाट पाहायची तरी किती? आपलं माणूस परत यावं म्हणून दाराशी चप्पल उलटी करून ठेवलीन! देवापुढे दिवा लावलान!! खिडकीपर्यंत आमच्या पंधराशे तरी खेपा झाल्या असतील! पण स्वारीची चाहूल नाही ती नाहीच! मला वाटतं आता नाद सोडलेला बरा!! (तेवढ्यात दासी फुलदाणी फोडते) काय फोडलंस गं भवाने? 

उधोजीराजे : (अवचित प्रवेश करत त्वेषानं) लढाईला तोंड फुटलंय असं समजा!! 
कमळाबाई : (चमकून दरवाजाकडे पाहात) तुम्ही होय!! लढाईला तोंड फुटलं की नाही ते अजून ठरायचंय! त्याआधी आमचे डोळे मात्र फुटले तुमची वाट पाहून!! (गाणे गात) डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचेऽऽ... 
उधोजीराजे : (हाताची घडी घालून पाठ करून उभे राहात) पुरे! आमची वाट पाहण्याचं कारण नाही, असं आम्ही आधीच सांगितलं होतं!! 
कमळाबाई : (पदर तोंडाला लावत) वाट पाहू नकोस, असं सांगितलं तरी कुणी आपल्या माणसाची वाट पाहाणं थांबवतं का? 

उधोजीराजे : (गडबडून) अहो, अहो! रडताय कशाला?...वाट पाहू नका म्हंजे जरा कमी पाहा, एवढंच म्हटलं होतं आम्ही!! 
कमळाबाई : (नाक शिंकरत) कमी वाट पाहाणं कसं असतं ते तरी कळू दे!! इंतजार की कोई हद्‌द नहीं होती... 
उधोजीराजे : (चमकून पलंगावरील ब्यागांकडे बघत) हे काय? तुम्ही कुठे बाहेरगावी निघालात की काय? ही कसली तयारी? 
कमळाबाई : (दाराच्या चौकटीला डोके टेकवून फिल्मी पोज घेत...) दुखी मन मेरेऽऽ, सुन मेराऽऽ केहना, जहां नहीं चैनाऽऽ, वहां नहीं रहनाऽऽऽआऽऽआऽऽ... 

उधोजीराजे : (भांबावून) अहो, शुक शुक!! कुठे निघालात, सांगाल का जरा? 
कमळाबाई : (सुस्कारा टाकत गाणे बदलत) थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता, वाट तुझी पाहता रेऽऽ...रात्रंदिन जागताऽऽआऽऽआऽऽ आऽऽऽ...!! 
उधोजीराजे : (कासावीस होत) अहो, वेळ कसली, तुम्ही गाणी काय म्हणताय? तुम्ही अशी गाणी म्हणणार असाल तर...तर...त्यापेक्षा तुम्ही जाच! 

कमळाबाई : (स्फुंदत स्फुंदत) आमचं बोलणं नको, गाणं नको! राहाणं नको, जागणं नको!! ज्या माणसासाठी आयुष्याची पंचवीस वर्ष खस्ता खाल्ल्या, त्यानंच तोंड फिरवलं तर आम्ही तरी काय करायचं? आम्ही निघालो! तुम्ही आणि तुमचं स्वबळ...घाला काय घालायचा तो गोंधळ!! (पुन्हा गाणे) चलते चलतेऽऽ मेरे ये गीत याद रखनाऽऽ कभी अलविदा ना कहनाऽऽ... 

उधोजीराजे : (किंचाळून) अहो, कुठे निघालात? मग आपल्या युतीच्या बोलणीचं काय? पंचेचाळीस जागा कसल्या जिंकताय? तेही आमच्याशिवाय? आम्ही एकट्यानं काय करायचं इथं? तुम्ही निघून गेलात तर आम्ही ओरडायचं तरी कोणाच्या नावानं?...सांगा, सांगा ना! 

कमळाबाई : (ब्याग बंद करत) बरं, नाही जात कुठे!...तुमची गंमत करत होते! स्बबळाचं नाटक आम्हालाही करता येतं म्हटलं!! कळलं ना? ऐका आता...(गाणे म्हणत) ही वाट दूर जाऽऽते...स्वप्नामधील गावाऽऽ... 

- ब्रिटिश नंदी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com