...प्रॉमिस लो, प्रॉमिस! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

मम्मामॅडम : (मटकन खुर्चीत बसून) प्रत्येक भाषणात आश्‍वासन देण्याची गरज आहे का, बेटा? नुसतं भाषण नाही का देता येणार? 

बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण! मम्मा, आयॅम बॅक! 
मम्मामॅडम : (पेपर चाळण्यात मग्न) हं! 
बेटा : (घाईघाईने) नुकताच केरळ आणि तामिळनाडूत जाऊन आलोय, म्हटलं!! 
मम्मामॅडम : (पेपरवाचन सुरूच) हं हं!! 
बेटा : (वैतागून) लुक ऍट मी! मेरी तरफ देखो! माझ्याकडे बघ तरी!! 

मम्मामॅडम : (मागे वळून पाहात) ओह! कपड्यांची बॅग विसरलास की काय! 
बेटा : (गोंधळून) छे...नाही! 
मम्मामॅडम : (अंदाज बांधत) मग विमानप्रवासात बॅग बदलली की काय तुझी? 
बेटा : (दुप्पट गोंधळून) छे, छे...हे माझेच कपडे आहेत! 
मम्मामॅडम : (जावळ कुर्वाळत) छान दिसतोयस की टीशर्ट आणि जीन्समध्ये! मी नेहमी तुला सांगत असते, आपल्याला शोभतं ते घालावं!! उगीच ते पांढरे कुर्ते-पायजमे घालून हिंडत असतोस! 

बेटा : (रुबाबात आरशासमोर उभे राहात) तामिळनाडूत कॉलेजच्या मुलामुलींचा कार्यक्रम करून थेट इथेच आलो! तिथं मी हा असा गेलो होतो! एका मुलीला मी "कॉल मी राहुल' असं म्हटल्यावर तिनं हातभर जीभ काढली! मम्मा, मुलींची जीभ एवढी लांब असते? 
मम्मामॅडम : (गडबडून विषय बदलत) ते जाऊ दे! आता घोडामैदान दूर नाही! आत्तापासून चांगला जोर लावलास तर येत्या मे महिन्याच्या अखेरीला तू पीएम होशील! 
बेटा : (दिलासा देत) तू काळजीच करू नकोस मम्मा! मी पीएम झालो की सगळ्यांना थोडाफार पगार सुरू करणार आहे! कुणीही बिनपैशाचं राहणार नाही! "गरीबी हटाव' ही घोषणा मी खऱ्या अर्थानं वास्तवात आणणार आहे! 

मम्मामॅडम : (चिंताग्रस्त सुरात) तसं तू आश्‍वासन दिलं आहेस खरं! पण ते कसं प्रत्यक्षात येणार आहे, देवच जाणे! 
बेटा : (त्वेषाने घोषणा देत) हमारे देश में कोई बेरोजगार नही होगा! मीसुद्धा नाही!! हाहा!! 
मम्मामॅडम :: (समजूत घालत) पूर्ण करता येणार नाहीत, अशी आश्‍वासनं आपण द्यायचीच कशाला बेटा? 
बेटा : (रागारागाने) वा रे व्वा! हे मी ऐकून नाही घेणार! मी काही त्या नमोजींसारखा फेकूगिरी करत नाही! मी जेव्हा आश्‍वासन देतो, तेव्हा मी त्याचा नीट अभ्यास करून निर्णयच घेतलेला असतो! आपलं कामच आहे तसं!! क्‍यों? 
मम्मामॅडम : : (समजून-उमजून) आश्‍वासनं देताना जरा जपून, एवढंच म्हणायचं होतं मला!! 

बेटा : (दुर्लक्ष करत) पीएम झालो की देशातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज धडाधड माफ करून टाकणार आहे मी! तुम देखते रहना!! 
मम्मामॅडम : : (खचलेल्या सुरात) तेही आश्‍वासन देऊन झालंय की तुझं! बेरोजगार झाले, किसान झाले...आता आणखी काय? 
बेटा : (बोटं मोडत) केरळातल्या मच्छीमारांना मी कालच आणखी एक प्रॉमिस देऊन आलो! तुमच्यासाठी माझ्या सरकारमध्ये स्वतंत्र मंत्रालय असेल, आणि मंत्रीही तुमचाच असेल!! 

मम्मामॅडम : (मटकन खुर्चीत बसून) प्रत्येक भाषणात आश्‍वासन देण्याची गरज आहे का, बेटा? नुसतं भाषण नाही का देता येणार? 
बेटा : (युक्‍तिवाद करत) मग मतं कशी मिळणार? सांग! त्या नमोजींनी गेल्या वेळी दुसरं काय केलं? 

मम्मामॅडम : (दुबळा वाद घालत) हो, पण त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे की नाही? निवडून आल्यावर हेच लोक तुला फेकू म्हणतील! चालणार आहे का? 
बेटा : (स्वत:च्याच विचारात) मम्मा, ते प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख टाकण्याचं प्रॉमिस देऊन टाकू का मीच? बघ, हंड्रेड पर्सेंट विजय मिळेल!! देऊ? 

- ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Dhing Tang