हम सब चौकीदार! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

भारतातील प्रत्येक नागरिकाने चौकीदार बनावे, ही माझी इच्छा आहे. कुणी म्हणेल, सगळ्यांनी चौकीदार बनण्याची काय गरज? इतक्‍या चोऱ्या करण्यासारखे तुमच्या देशात आहे तरी काय? लुटावयाचे ते सारे इंग्रज साहेबाने लुटून नेले. उरलेले भ्रष्ट कॉंग्रेसवाल्यांनी घरी नेले! आता काय उरले आहे? पण असे म्हणणाऱ्यांना माझे सांगणे आहे की बंद एटीएमसमोरसुद्धा एक सिक्‍युरिटीवाला असतोच.

"मित्रों, मी एक साधासुधा चौकीदार आहे. सारे चौकीदार माझे बांधव आहेत. चौकीदार बनून आल्यागेल्यावर नजर ठेवणे हे माझे परम कर्तव्य आहे. रात्री अपरात्री काठी हापटत शिट्ट्या वाजवणे हे प्रत्येक चौकीदाराचे काम असते. ते मी चांगले निभावतो. अधून मधून खुर्चीत बसून डुलक्‍या काढणे हेदेखील माझे काम आहे व तेही मला खूप आवडते. खुर्चीत बसून झोपण्याची कला ही प्रत्येक चौकीदाराला आलीच पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे. खुर्चीत बसून झोपी जाणे एकवेळ सोपे आहे. पण जागे राहण्याचे सोंग करून झोपी जाणे खरोखर अवघड काम आहे. ते मला चांगले जमते. मला माझ्या कामाचा अतिशय अभिमान वाटतो. 

भारतातील प्रत्येक नागरिकाने चौकीदार बनावे, ही माझी इच्छा आहे. कुणी म्हणेल, सगळ्यांनी चौकीदार बनण्याची काय गरज? इतक्‍या चोऱ्या करण्यासारखे तुमच्या देशात आहे तरी काय? लुटावयाचे ते सारे इंग्रज साहेबाने लुटून नेले. उरलेले भ्रष्ट कॉंग्रेसवाल्यांनी घरी नेले! आता काय उरले आहे? पण असे म्हणणाऱ्यांना माझे सांगणे आहे की बंद एटीएमसमोरसुद्धा एक सिक्‍युरिटीवाला असतोच. ""बंद है साहब, पैसा नहीं निकल रहा... कार्ड अटक जायेगा तो बाद में मत बोलना,'' असे सावध करणाऱ्या सिक्‍युरिटीवाल्याचे आपल्यावर नकळत उपकार होत नाहीत काय? बेसावधपणे बंद एटीएम यंत्रात कार्ड घालून ते अडकले तर ते आपल्याला किती महाग जाईल? तात्पर्य एवढेच, एटीम रिकामे असले तरी चौकीदाराची गरज लागतेच. 
कुणी म्हणेल की चौकीदार झोपा काढतात, त्यामुळे चोरांचे फावते. ते राजरोस चोऱ्या करून (परदेशात) पळून जातात, आणि जागे झाल्यावर चौकीदार म्हणतो, ""छे कहां चोरी हुआ साहब? मैं तो यहां जाग रहा हूं ना!'' मुदलात चौकीदाराने चोरांना पकडावे ही अपेक्षाच सर्वस्वी चूक आहे. चोरांचा आणि चौकीदाराचा संबंधच काय? चौकीदाराचे काम काठ्या हापटत, शिट्ट्या मारत अधून मधून गल्लीबोळात हिंडून झोपलेल्यांची झोपमोड करणे, हे असते. चोरांना पकडण्याचे किर्कोळ काम चौकीदारांना सांगू नये. चौकीदार बांधवांचा तो अपमान आहे. 

खरे तर आपल्यासाठी गल्लीबोळात रात्रीअपरात्री एखादा मनुष्य इमानेइतबारे हिंडतो आहे, ही बाब किती दिलासादायक आहे! पण काही लोक कृतघ्न असतात. ते प्राय: कांग्रेसवालेच असतात. त्यांना चौकीदार काठी घेऊन हिंडतो आहे, आणि "जागते रहो' असे पुकारतो आहे, हे चित्र चीड आणते. ते ओरडतात की ""जागते रहो काय, जागते रहो? रात्री जागरण झाले तर सकाळी आम्हाला ऍसिडिटी झाल्यास कोण जबाबदार? चौकीदारही चोर है!!,'' हे काही ठीक नाही. ज्या लोकांनी कायम चोराच्या उशाशी तिजोरीच्या चाव्या ठेवल्या, त्यांना चौकीदाराचे महत्त्व कसे पटणार? बिचाऱ्या चौकीदाराचा हा "थॅंकलेस जॉब' आहे. त्याच्याबद्‌दल सहानुभूती वाटायला हवी. पण हे कॉंग्रेसवाले चोर सोडून चौकीदारालाच फाशी द्यायला निघाले आहेत. 

म्हणून सांगतो, मित्रों, आता आपण सर्वांनी चौकीदार व्हायला हवे! डोळ्यात तेल घालून देशाच्या तिजोरीचे रक्षण करायला हवे. चोर चोऱ्या करून जावोत, दरोडेखोर दरोडे टाकून पळून जावोत, काहीही होवो, पण चौकीदार जिंकला पाहिजे. एकाच चौकीदाराने रोज रोज डब्बल शिफ्ट काय म्हणून करावी? तेव्हा हरेकाने आता "मीसुद्धा चौकीदार!' अशी अक्षरे असलेला बिल्ला सदऱ्यावर डकवावा, आणि शिट्‌टी व काठी आणून कामास लागावे. आता आपण सारेच चौकीदार आहोत हं का! तेव्हा म्हणा, अब की बार... सब चौकीदार! 

- ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Dhing Tang