ढिंग टांग! : स्नेहभोजन!

ढिंग टांग! : स्नेहभोजन!

प्रिय सहकारी पक्षप्रमुख, सतप्रतिसत प्रणाम. सर्वप्रथम एग्झिट पोलमधील नेत्रदीपक यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आपल्या सहकार्याशिवाय हे यश मिळवणे कमळ पार्टीला थोडे कठीण गेले असते, हे मान्य करायला हवे. (तरीही बहुतेक एग्झिट पोलमध्ये कमळ पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्याचे दिसत आहे, ह्याचीही संबंधितांनी नोंद घेतली पाहिजे.) तसे पाहता हा विजय आपण सहज प्राप्त करु, असा आत्मविश्‍वास आम्हाला आधीपासूनच होता आणि हे आम्ही वेळोवेळी तुमच्या निदर्शनासही आणून दिले होते. परंतु, काही सहयोगी पक्षांना तो (आमचा) अप्पलपोटेपणा वाटला.

"कमळ पार्टी त्रणसो नी उप्पर सीट मिळवणार' हे माझे भाकित अनेक महिन्यांपूर्वीचे आहे, हे ध्यानी घ्यावे. आमचा पक्ष हा कडक शिस्तीचा पक्ष असून येथे सारे काही योजनेनुसारच घडत असते. पण ते असो. झाले गेले, (वाराणसीच्या) गंगेला मिळाले.

एग्झिट पोलमध्ये आपली आघाडी निर्विवाद जिंकली आहे, हे आपण गेले दोन दिवस (टीव्हीवर) पाहताच आहा! हा लोकशाहीचा डिजिटल विजय आहे. पुन्हा एकदा केंद्रात आपले सरकार येणार असून आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमान नमोजी ह्यांचा ठरलेल्या वेळी शपथविधी होईल. (अर्थात हेही आधीपासूनच ठरलेले आहे.) शपथविधीपूर्वी प्रत्यक्ष मतमोजणीचा एक किरकोळ उपचार पार पाडावा लागणार आहे. खरे तर त्याची काहीही आवश्‍यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. परंतु, मी लोकशाही मानणारा मनुष्य असल्याने हा उपचार करण्यास माझा विरोधदेखील नाही. 

माझ्या प्रिय साथीदारांनो, एग्झिट पोलमधील दिग्विजय साजरा करण्यासाठी मंगळवारी रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम आखण्यात आला असून आपण त्यास उपस्थित राहून नानाविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही विनंती. कमळ पक्षाच्या मुख्यालयातच भोजनाची सोय करण्यात आली असून, पुरणपोळी, जलेबी, फाफडा, ढोकळा, तसेच अन्य प्रांतीय पदार्थ आग्रह करकरून वाढले जातील. त्यामुळे सर्व निमंत्रितांनी दिवसभर कडकडीत उपवास करून मगच यावे, अशी प्रार्थना आहे.

भोजन प्रबंध "अनलिमिटेड थाळी' ह्या तत्त्वावर करण्यात आला आहे. मर्जीतील सहयोगी पक्षांना प्रवेशशुल्कात (प्रति अतिथी रु. तीनशे अधिक जीएसटी) वीस टक्‍के इतकी घसघशीत सवलत देण्यात येईल, ह्याचीही नोंद घ्यावी. (वि. सू. : आमरस पुरीही उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र त्यासाठी वेगळा आकार पडेल.) 

विशेष आनंदाची बातमी म्हणजे, एग्झिट पोल दिग्विजयाच्या विजयोत्सवात सामील होण्याबाबत खुद्द श्रीमान नमोजी ह्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यांच्या पंगतीच्या लाभासहित भोजन कार्यक्रम पार पडणार, असल्याने लाभार्थ्यांना डब्बल लाभ होणार आहे. आपले लाडके नमोजी नुकतेच केदारनाथ यात्रेला जाऊन आले असल्याने त्यांच्या शरीरातून सध्या जबरदस्त दैवी ऊर्जा बाहेर पडत्ये आहे. ताक किंवा आमटीच्या भुरक्‍यासह ती ऊर्जाही लाभार्थ्यांच्या पोटात जाईल व वेगळीच अनुभूती येईल, असा मला विश्‍वास वाटतो. 

सहयोगी पक्षांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा श्रीमान नमोजी ह्यांचा विचार आहे. "सर्वांना एकदा जेवायला बोलवा...नंतर संधी मिळेल न मिळेल!' असे त्यांनी मला भरल्या डोळ्यांनी सांगितले. त्यांना रुमाल देऊन मी तत्काळ हे अनौपचारिक निमंत्रण लिहावयास बसलो आहे. तेव्हा ह्या निमंत्रणाचा मान राखून सर्वांनी स्नेहभोजनास वेळेवर उपस्थित राहावे ही पुन्हा एकदा विनंती. 

आपला अत्यंत विनम्र. मोटाभाई. 
आरएसव्हीपी : मोटाभाईच! 
वि. सू. 1 : शुगरचा त्रास असलेल्यांनी स्वत:चा डबा व औषधे घेऊन यावीत. 
वि. सू. 2 : पुष्पगुच्छांपेक्षा फळांच्या परडीचे अधिक स्वागत होईल.

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com