esakal | ढिंग टांग! : बम्बई का पानी! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग! : बम्बई का पानी! 

टेकीला आलेल्या गडद आभाळाकडे 
पाहत थुंकून कचकचीत शिवी 
हासडली अल्लाबीने : ""आ गये 
माटीमिले...सबकुछ लूटने कू!'' 
तेव्हाच खदाखदा हसत 
रोरावत कोसळला मुंबईचा पाऊस... 

ढिंग टांग! : बम्बई का पानी! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

टेकीला आलेल्या गडद आभाळाकडे 
पाहत थुंकून कचकचीत शिवी 
हासडली अल्लाबीने : ""आ गये 
माटीमिले...सबकुछ लूटने कू!'' 
तेव्हाच खदाखदा हसत 
रोरावत कोसळला मुंबईचा पाऊस... 

बीस माळ्यांच्या बिडलिंगला खेटून 
कंपाऊण्डच्या भिंतीशी लगट करत 
उभे होते अल्लाबीचे किरकोळ 
निळे मेणकापडी झोपडे, रांगेत. 
शेणामेणाच्या तिच्या एकभिंती 
घरातच अल्लाबीने ओढला होता 
गेला पावसाळा...चिवटपणे. 
अल्लाबी जगत राहिली आहे 
केव्हाची ह्या अफाट महानगरात 
आपला झोपडीपास छातीशी कवटाळून 
जमवते आहे दोन टाइम गिळायची सोय, 
आणि चार भगुली, दोन कपडे. 

ढगांकडे पाहून येते तिला 
प्रच्छन्न शिळक, उचकते 
मनाची शिवण टराटरा, 
म्हणते ती मनाशीच की, 
""कुत्ता बारीश! कुत्ता बारीश!'' 
पावसाशी मांडलेला तिचा उभा दावा 
कोंदतो मेणकापडी आडोश्‍यात 
घासतेलाच्या धुरासारखा. 
झोपडीदादाच्या माणसांना तोंड देत, 
अर्ध्यामुध्या कांबरुणात अल्लाबी 
जपते आहे आपला सुप्रसिद्ध 
मुंबईकर जिवटपणा वगैरे. 

भिंतीपलीकडे सरसरा वाढलेल्या 
बीस माळ्याच्या इमारतीतल्या 
काल्पनिक मकानाच्या 
काल्पनिक सज्जात 
उभे राहून अल्लाबीने 
कधी पाहिले नाही 
धावत्या मुंबईचे रंगीबेरंगी रूप. 
वाहनांचा चकचकाटी वेग वगैरे. 
नव्हता तिला सोस कधीही 
चकाचौंध मॉलांकित जिंदगीचा. 
तिला प्यार. तिची दीवार. तिचा संसार. 

परसु रात्री दोनच्या सुमारास 
धुवांधार पावसात तिच्या 
भिंतीला गेले मौन तडे तडतडा. 
धडधडा कोसळलेल्या भिंतीखाली 
गाडला गेला अल्लाबीचा संसार 
निमिषार्धात. चिणून गेले तिचे 
फुटके विश्‍व. दगडामातीच्या 
कंत्राटी प्राक्‍तनाखाली. 
चिखलमातीत मिसळलेल्या 
निळ्या मेणकापडाखाली 
कुठेतरी असतील अल्लाबीच्या 
एकभिंती संसाराची कलेवरे. 
मेटाकुटीने मिळवलेली चार भांडी, 
झाडू, कापडे, मेणकापडे वगैरे. 

अल्लाबीच्या नातलगांना 
जाहीर झालेली पाच लाखांची 
सरकारी मदत आणि तातडीने 
मिळालेले पुनर्वसनाचे आश्‍वासन 
स्वीकारायला कुणीच आले नाही. 
महानगरात सारे काही सुरळीत आहे, 
असे महापौर छातीठोकपणे सांगत 
होते, त्याच दिवशी अल्लाबीचे 
शेणाचे घर पावसात वाहून गेले. 

आजपासून असंख्य वर्षांनी 
पुढे कधीतरी उत्खननात 
सापडलेल्या अवशेषांवर 
निघेल तो निष्कर्ष असा : 
- मुंबईतील माणसे एका भिंतीच्या 
आधारे जगत होती. त्यांच्या 
घराच्या उरलेल्या भिंती 
बंदी घातलेल्या प्लास्टिकने 
मढवलेल्या असत. 
...अल्लाबीच्या घराची गोष्ट 
म्हणूनच प्रागैतिहासिक आहे. 

- ब्रिटिश नंदी 

loading image