ढिंग टांग! : छोटे कुटुंब...दे.भ. कुटुंब!

ब्रिटिश नंदी
Saturday, 17 August 2019

तसे पाहू गेल्यास आमच्यासारखा देशभक्‍त मनुष्य उभ्या देशात शोधून सांपडावयाचा नाही. परंतु, गेल्या अठ्‌ठेचाळीस तासांपासून आमच्या मुखमंडलावर विलक्षण तेज दिसो लागले आहे. हे तेज आहे पराकोटीच्या राष्ट्रप्रीतीचे.

तसे पाहू गेल्यास आमच्यासारखा देशभक्‍त मनुष्य उभ्या देशात शोधून सांपडावयाचा नाही. परंतु, गेल्या अठ्‌ठेचाळीस तासांपासून आमच्या मुखमंडलावर विलक्षण तेज दिसो लागले आहे. हे तेज आहे पराकोटीच्या राष्ट्रप्रीतीचे. देशभक्‍तीचे. देशकर्तव्याचे!! आपण आपोआप देशभक्‍त ठरलो, हे कळणे किती हर्षदायक असत्ये!! आमचे येक शेजारी श्रीयुत बन्या बेरके हे इमर्जन्सीच्या काळात तुरुंगाची हवा खाऊन आले होते. वास्तविक, पैश्‍यांचा अपहार केल्याप्रकरणी अंदर झालेला हा बेरक्‍या कालौघात लोकशाहीवादी ठरला आणि आता इमर्जन्सीतील बंदीना मिळू पाहणाऱ्या मानधनासाठी खटपटी करतो आहे!! आमच्याबाबतीत असेच काहीसे घडले असे कोणाला वाटेलही. 

त्याचे असे आहे की देशासाठी आम्ही काय केले नाही? या प्रश्‍नाचे ताजे उत्तर आहे- लग्न! ज्याने संसाराची उठाठेवच केली नाही, त्याला कुटुंब कोठले? तस्मात आम्ही आपाप: "दे. भ.' ठरलो आहो! कारण "कुटुंब छोटे आखणारी व्यक्‍ती एकप्रकारे देशभक्‍तीच करीत असते' हे आम्हाला स्वातंत्र्यदिनी आकळले. असो. हा विचार आम्हाला नवीनच होता.

अत्यंत भक्‍तिभावाने आम्ही प्रात:स्मरणीय मा. ना. नमोजी यांचे लाल किल्ल्यावरील भाषण ऊर्फ मौलिक विचार, कानाच्या द्रोणात जमा करीत होतो, तेव्हाच आम्हास देशभक्‍तीचा हा नवा आयाम कळून चुकला. हर्षोल्लासाने धुंद होत्साते आम्ही थेट श्रीमान नमोजी यांचे दर्शनाला गेलो. पुढे घडले ते असे : 
""शतप्रतिशत प्रणाम!,'' आम्ही भक्‍तिभावाने म्हणालो. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभरच एक तिडीक चमकून गेली. परंतु, पुढल्याच क्षणी उजळ हास्य तेथे उमटले. 
""शुं काम?,'' त्यांनी प्रेमळपणाने विचारले. 

"आमच्यासारख्या नगण्य कार्यकर्त्याला दर्शनाचा लाभ देता, हेच खूप झाले!!,'' लीनदीन आम्ही! 
""हूं समस्या टालतो नथी, अने पालतो पण नथी! सांभळ्यो?'' ते म्हणाले. 
""लोकसंख्या फार वेगाने वाढते आहे...हे रोजगाराच्या अभावी घडते असे आम्हाला वाटते!'' आम्ही चर्चेला थेट प्रारंभ केला. 
""लोकसंख्यानां प्रस्फोट आ बहु भयंकर संकट छे!! त्येच्यासाठी कायतरी ठोस करवु जोईये!'' मराठीमिश्रित गुजराथीत ते स्वत:शीच म्हणाले. ठोस काहीतरी केले पाहिजे? हे आम्हाला तितकेसे पटले नाही. ठोस काहीतरी न करणे गरजेचे आहे असे आम्हाला म्हणायचे होते, परंतु, जीभ रेटली नाही. असो. 

"काही काही लोक विनाकारण भरमसाट मोठे कुटुंब करून ठेवतात. उदाहरणार्थ आमचे एक शेजारी श्री. फफ्या सरमळकर याने गेल्या वर्षी चौथ्यांदा देशद्रोह केलान!! त्याच्या देशद्रोहाचे पेढे घेऊन निर्लज्जपणे घरी आला होता. तो देशद्रोही आहे, हे आधी कळले असते तर सहा-सात पेढे खाल्ले नसते...,'' आम्ही आमच्या पातकाची कबुली दिली. 

"नान्हा कुटुंब, सुखी कुटुंब! सुखी कुटुंब तो सुखी देस! सुखी देस तो सुखी प्रिथ्वी..!'' श्रीमान नमोजींनी तर्जनी उंचावत आम्हाला गुरोपदेश केला. आम्ही तो ऐकून घेतला. 
"'आम्ही बहुधा जन्मजात देशभक्‍त आहो! कां की, कुंडलीत विवाहयोगच नाही!!'' आम्ही शक्‍य तितके संयतपणे माहिती दिली. आयुष्यात सलग चोवीस नकार पचवणारे आम्ही!!

एकदा तर आम्हाला वधूवर सूचक मंडळातील कारकुनाने चक्‍क अपमानित करुन हाकलून दिले होते. त्या कारकुनाने केलेल्या अपमानानंतर आम्ही कुटुंबविरहित राहावयाचे ठरवले. धन्य तो कारकुन, ज्याच्यामुळे आम्हांस देशभक्‍त ही पदवी प्राप्त झाली. आमची (करुण) पार्श्‍वभूमी अत्यंत नम्रतेने सांगून आम्ही मा. नमोजींना शेवटी विचारले... 
"" का हो...देशभक्‍त असल्याचे आम्हाला सर्टिफिकेट मिळेल का?'' 

- ब्रिटिश नंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Dhing Tang