युतीचा महामार्ग? (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे. 
वेळ : निजानीज. 
प्रसंग : जुळवाजुळवीचा. 
पात्रे : मराठी माणसाचे तारणहार मा. उधोजीसाहेब आणि...प्रिन्स विक्रमादित्य. 

विक्रमादित्य : (धाडकन दार ढकलत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (लक्ष न देता) हा प्रश्‍न आहे की धमकी? नो! ही सभ्य माणसांची झोपण्याची वेळ असते! गुड नाइट!! विक्रमादित्य : (स्मार्टली)...पण राजकारणी लोक रात्रीच पॉलिटिक्‍स खेळतात ना!! उधोजीसाहेब : (ठणकावून) रात्रीच्या अंधारात पॉलिटिक्‍स करणाऱ्या पुढाऱ्यांपासून दोन हात दूर राहतो मी!! दिवस उठारेटी घालवायचा आणि रात्री मीटिंगा करायच्या, ह्याला काय अर्थय? 

विक्रमादित्य : (समजुतीनं) दिवसा करायचं ते सोशल वर्क, त्याच सोशल वर्कला रात्री पॉलिटिक्‍स म्हणतात!! 
उधोजीसाहेब :(हातातलं पांघरूण फेकून कमरेवर हात ठेवत) मला शहाणपणा शिकवू नकोस! एक कळत नाही, नेमका माझ्या झोपायच्या वेळेला कसा येतोस तू? 

विक्रमादित्य : (स्मार्टली) अर्जंट काम असल्याशिवाय मी कुठेही कधीही जात नसतो!! 
उधोजीसाहेब : (घड्याळात बघत) तुला पंधरा सेकंदांचा वेळ मिळेल! त्यात तुझं काम सांग आणि जा! तुम्हारा समय शुरू होताहय अब..! 
विक्रमादित्य : (सुरवात करत) वेल, मघाशी थोड्या वेळापूर्वी मला एक फोन आला होता..! 
उधोजीसाहेब : (घड्याळ बघणं थांबवत) समय खतम हुआ! गुड नाइट!! 

विक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत) युतीसंदर्भात आपण काय निर्णय घेतला आहे, ते सांगा!! 
उधोजीसाहेब : (त्वेषाने) हु:!! अडलंय माझं खेटर!! यापुढे कोणाशीही कधीही कुठेही युती करणार नाही, असं मी आधीच जाहीर करून टाकलं आहे!! जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कुठेही युती होणे नाही, होणे नाही, होणे नाही!! ह्या कमळवाल्यांशी तर बिलकुल नाही! गेले काही महिने आम्ही त्यांना घाल घाल शिव्याशाप घालतो आहे ते काय उगाच? अरे, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गंडवून कुठे जाल लेको!! सदोदित थापा मारायच्या आणि धूळफेक करत कारभार करायचा, ह्याला कुठे तरी अंत असला पाहिजे आणि येत्या निवडणुकीत आम्ही तो अंत घडवून आणू!! शेवटचं सांगतो,- युती गेली खड्ड्यात!! 
विक्रमादित्य : (हाताची घडी घालून दाराला टेकत) झालं तुमचं बोलून? 

उधोजीसाहेब : (पलंगावर बसत) खरं म्हंजे नाही! पण मी हे तुला का सांगतो आहे? गुड नाइट!! 
विक्रमादित्य : (शांतपणे)..तर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तुम्हाला युती नकोय, हे आता ठरलं ना? 
उधोजीसाहेब : (खोल आवाजात) अरे, आता किती वेळा सांगू? 
विक्रमादित्य : (तिढा टाकत) युती होणार!! 
उधोजीसाहेब : (बुचकळ्यात पडत) हे तू ठरवणार की मी? 
विक्रमादित्य : (थंड आवाजात) नियतीनं ठरवलं आहे!! 
उधोजीसाहेब : (अचंब्याने) कोण ही नियती? 

विक्रमादित्य : (दारातच उभं राहून) मघापासून तेच सांगायचा प्रयत्न करत होतो!! देवेंद्र अंकलचा फोन आला होता. आपल्या समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाला एकत्र जायचं का? असं ते विचारत होते!! 
उधोजीसाहेब : (विरघळत) काहीही म्हण- माणूस सज्जन आहे नै? 

विक्रमादित्य : (फायनल बॉल टाकत) त्या कार्यक्रमाला खुद्द मोदीअंकल येणारेत, आणि तुमच्याशी युतीबद्दल बोलणार आहेत म्हणे!! 

उधोजीसाहेब : (गडबडून) अरे, अरे अरे!! मी कधी युतीला विरोध केला का? ती होणार नाही, अशी भीती व्यक्‍त करत होतो फक्‍त! युती, युती होणारच!! 
विक्रमादित्य : (विजयी मुद्रेने) समृद्धीचा महामार्ग हाच युतीचा महामार्ग आहे बॅब्स! खरं ना? 

- ब्रिटिश नंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Dhing Tang on Alliance