भाष्य : वैविध्य जपले, तरच समृद्धी

अंकुर पटवर्धन 
बुधवार, 22 मे 2019

जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल. जैवविविधता आणि माणसाची जीवनसमृद्धता, यांचा संबंध समजावून घ्यायला हवा. आजच्या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त... 

बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते स्रोत जोपासण्याची नितांत गरज भासू लागली आहे. थोडक्‍यात काय तर पाच "ज' (जल, जंगल, जमीन, जानवर आणि जन) यांचा हा समतोल नीट सांधला गेला नाही, तर शाश्वत विकास हे स्वप्नच राहील.

देशातील सुमारे 50 टक्के लोकसंख्या शहरात वास्तव्यास येत असताना, त्यामुळे तुटणारी जंगले व नष्ट होणारे अधिवास, नैसर्गिक स्रोत, यामुळे हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरे जाणे कठीण होईल. ठिकठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक स्रोतांनी आपली जीवनशैली घडविली आहे. जसे की रानभाज्या (कंदमुळे, पाने), शेतकऱ्यांनी राखलेले पिकांचे पारंपरिक वाण. शेतीतील जैवविविधतासुद्धा अन्नसुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरू लागली आहे. एकविसाव्या शतकात जैवसंपदेशी संबंधित उद्योग एकूण अर्थव्यवहाराच्या 40 टक्के उलाढाल घडवतील, असा अंदाज आहे.

शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. नुकताच एका ग्रामसभेला गेलो असताना जैवविविधता म्हणजे काय, कशाला करावयाचे जैवविविधतेचे संरक्षण, हे प्रश्न विचारले गेले. शहरात कुठे जैवविविधता टिकून राहिलीये? वृक्षारोपण केले आणि चार झाडांना पाणी घातले की झाले तिचे संरक्षण, असा अनेक स्तरांत असलेला गैरसमज जाणवला. 

खरेच करता येईल का जंगलाची किंमत?

इमारती लाकूड, औषधी असे हिरडा, बेहडासारखी झाडे, मध, तेंदुपत्ता यांसारखे वनउपज यांसारख्या गोष्टी बाजारात विकल्या जात असल्याने त्यांचा फायदा आपल्याला लगेच समजेल. परंतु, जंगलातल्या इतर वन्यप्रजातींचे काय? एखाद्या प्रजातीचे महत्त्व त्या प्रजातीचे स्थानिक पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे व त्यामुळे इतर जीवनावश्‍यक गोष्टींना कसा फायदा होतो, यावरून ठरू शकते, उदा. अंजनी, कुंभा, किंजळ यांसारखी वरवर उपयोगी न भासणारी वन्यझाडे स्वतःकडे अनेक मधमाश्‍या, फुलपाखरे, पक्षी यांना आकर्षित करतात. अशाच कीटकांच्या जैवविविधतेमुळे परागीभवन होऊन आजूबाजूला असणारी आंबा, चिकू, काजू, यांसारखी झाडे फळतात व त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळते.

म्हणजेच, अनेक प्रकारची झाडे-झुडपे, वेलींना समृद्ध असे जंगल टिकून राहिले; तर प्राणी, पक्षी आणि कीटक तर वाढतीलच; शिवाय आपल्या बागाही टिकून राहतील. सध्या कोकणात बऱ्याच ठिकाणी डोंगरावरील नैसर्गिक जंगल तोडून तिथे एकाच प्रकारच्या वृक्षांची लागवड केलेली आढळून येते. उदा. ः रबर. परंतु, एकसुरी लागवड टाळून समृद्ध वनसंपदा भविष्यासाठी जास्त उपयोगी ठरते. हिरवाईने नटलेल्या डोंगरांमधून बारमाही पाणी असणारे झरे, नद्या उगम पावतात. बऱ्याचदा डोंगराच्या वळचणीला वसलेल्या गावांचे जीवनमान या जलस्रोतांवर अवलंबून असते. यावरून आपणच धडा घ्यायला हवा, की जंगलाची किंमत ही तत्कालीन आर्थिक फायद्यापेक्षा वर्षानुवर्षे मिळणाऱ्या "इकॉलॉजिकल सिक्‍युरिटी'मध्ये मोजायला हवी. 

अन्नसुरक्षा, परागीभवन आणि जीवसाखळी

विविध देशांच्या प्रतिनिधींच्या समावेशांनी बनलेल्या जैवविविधतेविषयक धोरणात्मक गटाच्या (IPBES) अहवालात जैवविविधता, परिसंस्थेचे आरोग्य आणि त्याचे मनुष्याला होणारे फायदे यांच्यातील नाजूक नातेसंबंध उलगडून दाखविण्यात आला आहे. गेल्या पाच दशकांत परागीभवनावर अवलंबून असलेल्या अन्नधान्याच्या उत्पादनात सुमारे 300 टक्के वाढ झाली आहे. तसेच, जगातील 90 टक्के सपुष्प वनस्पती या परागीभवनासाठी प्राण्यांवर अवलंबून आहेत.

यातील 75 टक्के वनस्पती या मनुष्याला अन्नपुरवठा करणाऱ्या आहेत. जवळजवळ दोन लाख प्रकारचे कीटक हे परागीभवनाची क्रिया पार पाडतात. यातील महत्त्वाचे घटक आहेत मधमाश्‍या व फुलपाखरे. ढोबळमानाने सांगायचे झाले, तर आपण खात असलेला अन्नाचा प्रत्येक तिसरा घास हा परागीभवनांमुळे तयार झालेला आहे. परागीभवनामुळे बीजधारणा होऊन जंगलवाढीस चालना मिळते. म्हणजेच, जगण्याला आवश्‍यक असा ऑक्‍सिजनसुद्धा या परागीभवनाचेच एक अंग आहे. परंतु, जगभरातून कीटक हळूहळू कमी होत चालल्याने त्यावर अवलंबून असे विशिष्ट सुमारे 60 टक्के इतके कमी झाले आहेत.

आम्ही सह्याद्रीतील जंगलाच्या जवळ असलेल्या शेती व वहाळाच्या आजूबाजूने असणाऱ्या खेकड्यांच्या जातींचा अभ्यास करीत होतो. आमच्यातला एक गट जंगलाच्या जवळ असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी आणि जंगलापासून दूर गावात असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी यांची निरीक्षणे नोंदवीत होता. तेव्हा असे लक्षात आले, की दूरच्या गावाला 
पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. फेब्रुवारी महिनाअखेरीसच गावातील विहिरी आटू लागल्या आहेत व जी वस्ती जंगलाजवळ आहे त्या वस्तीतील विहिरीची पाण्याची पातळी मे महिन्यातसुद्धा टिकून आहे. असे का घडले, याची पाहणी करता असे लक्षात आले, की दूरच्या गावाने कोळसा व फार्म हाउससाठी जमीन (जंगल) हजारो रुपयांना विकली. जंगल संपल्याने बारमाही पाण्याचे झरे हळूहळू आटत गेले व गावातील विहिरींना पाणी मिळेनासे झाले व ग्रामपंचायतीने हजारो रुपये भरून टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

जंगलाजवळील भाताच्या शेतीच्या बांधाला जागोजागी आम्हाला खेकड्यांची अक्षरशः शेकडो बिळे पडलेली दिसली. आम्ही खूप खूष होतो. कारण, आम्हाला विविध प्रकारचे आणि रंग व आकाराचे खेकडे सापडले. पाणीटंचाई असलेल्या भागात दुसऱ्या गटाला खेकड्यांच्या खूपच कमी जाती आढळल्या. तसेच, शेताच्या बांधावर बिळे जवळजवळ नव्हतीच. आता पूर्वीसारखी नैसर्गिक शेती होत नाही. जिकडे बघावे तिकडे ऊस आहे. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा भरपूर वापर, जमीन पण चोपण झालेली व त्यामुळे पावसाचे पाणी मुरत नाही व जवळच्याच नाल्यातून होणारे प्रदूषण, असा आमचा पुस्तकी ज्ञानाचा प्रवास सुरू झाला.

एवढ्यात आमचे शेतकरी मित्र शरदभाऊ शिंदे आले. म्हणाले, "काय तुम्ही अभ्यास करता राव? ही जात कमी झाली, तमुक वाढली, काय उपेग आहे का त्याचा? हा विचार कधी केला का, की त्या खेकड्यामुळे जी बिळे पडताहेत ना शेताच्या बांधाला, त्यामुळे पावसाचे किती पाणी जमिनीत मुरत असेल?'.... बास्स! डोक्‍यात वीज चमकावी तसा लख्ख प्रकाश पडला आणि जाणवले, की जैवविविधता आणि माणसाची जीवनसमृद्धता याचा एकमेकंशी घट्ट जोडला गेलेला असा संबंध आहे. 

लोकसहभागाचे निसर्ग संवर्धनातील महत्त्व

आपली जैवसंपदा फक्त अभयारण्ये, zoo, botanical gardens, संरक्षित वने यातूनच फक्त सुरक्षित ठेवता येणार नाही. त्यासाठी विकेंद्रीकरणाची आणि सक्षम अशा लोकसहभागाची आवश्‍यकता आहे. सखोल अभ्यासाने व लोकसहभागाने जिथे शक्‍य आहे तिथे वन्यसंपदेचे आर्थिक फायदा आणि नुकसानीच्या हिशेबाशी असणारे व शाश्वत विकासाशी जोडले गेलेले नाते उलगडून दाखवायला हवे.

जैवविविधता कायद्यांतर्गत बंधनकारक असलेल्या स्थानिक जैवविविधता समित्या (BMC - Biodiversity Management Committees) गावोगावी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून तयार व्हायला हव्यात व त्यांच्या क्षेत्रातील जैवसंपदेचे नियोजन व व्यवस्थापन यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायला हवी. प्रत्येक वेळेला वन खात्यावर अवलंबून राहणे योग्य होणार नाही.

आपला खारीचा वाट आपण उचलल्याने जर एक सक्षम नियोजनबद्ध निर्णयक्षम प्रणाली तयार झाली, तरच होईल शाश्वत विकासाकडे वाटचाल आणि होईल खरा "सबका साथ, सबका विकास'!! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Environment Issue