'टायगर' अजूनही मॅचविनर (नाममुद्रा)

शैलेश नागवेकर
Monday, 21 January 2019

मेअखेर सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनीला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळणार हे उघड आहे. परंतु त्यासाठी ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेच्या पूर्वपरीक्षेत त्याला काठावर तरी पास होणे आवश्‍यक होते, पण अशा आव्हानात्मक परिस्थितीत तेवढ्याच तडफदारपणे लढण्याची क्षमता नसेल तर तो धोनी कसला? त्याने पूर्वपरीक्षेत केवळ उत्तीर्ण होऊन नव्हे, तर पहिला क्रमांक पटकावून आपले कर्तृत्व दाखवून दिले. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही, तो शिकारच करतो.

वय वाढत असले, तरी धोनीकडे ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांच्या गोलंदाजांची शिकार करण्याची आक्रमकता होती आणि आहेच. म्हणूनच एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन-तीन द्विशतके करणारा रोहित शर्मा, शिखर धवन आणि "द ग्रेट' विराट कोहली असे फलंदाज असतानाही धोनी मालिकेत सर्वोत्तम ठरला. याचाच अर्थ "टायगर' अजूनही मॅचविनर आहे हेच सिद्ध होते. याच ऑस्ट्रेलियात चार वर्षांपूर्वी धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये शस्त्रे म्यान केली होती, पण आता त्याच कांगारूंच्या भूमीत आपल्या विश्‍वकरंडकाच्या मोहिमेला त्याने जीवदान मिळवून दिले. हा निव्वळ योगायोग नसतो. गुणवत्ता आणि क्षमतेचे बाळकडू योग्य पद्धतीने घोटवून घेतलेले असले की असा योग जुळवून येतो. कोणत्याही प्रसंगी हार न मानणारे धोनीसारखे खेळाडूच असा पराक्रम करू शकतात. 

धोनी पूर्ण भरात असताना यष्टिरक्षक असलेला दिनेश कार्तिक सातत्याने खेळत नव्हता. रिषभ पंतचा पर्यायही समोर उभा असताना धोनीवर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने विश्‍वास टाकला. वास्तविक अशा परिस्थितीत हा विश्‍वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी दुपटीने वाढत असते. धोनीने या दोघांसह आपल्या चाहत्यांनाही निराश केले नाही. वयोपरत्वे आक्रमकतेत फरक पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आवश्‍यक ती सावधगिरीही घ्यावी लागते.

सध्या धोनी याच भूमिकेत असतो, म्हणून तो कधी संथ खेळताना दिसतो. पूर्वीप्रमाणे तो षटकारांची बरसात करत नाही, पण गरज असते तेव्हा प्रेक्षकांमध्ये चेंडू भिरकावतो. 2011 च्या विश्‍वकरंडक अंतिम सामन्यात मारलेला विजयी षटकार आणि ऑस्ट्रेलियात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मारलेला विजयी षटकार यामध्ये केवळ अंतराचा फरक असेल, पण अखेर षटकार तो षटकार आणि धोनी तो धोनीच! 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on M S Dhoni