पहाटपावलं : ज्योत से ज्योत...

पहाटपावलं : ज्योत से ज्योत...

ऍड. ज्योती विलास जाधव हिला 25 मे रोजी अंबडला येऊन सहा वर्षे झाली. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामधील अंबड हे तालुक्‍याचं गाव. गेली काही वर्षे दुष्काळ व नापिकी यामुळे काही लोक गाव सोडून गेले, काही सोडण्याच्या तयारीत आहेत. पण ज्योतीचा उलटा प्रवास आहे. ती सुखाचा संसार सोडून अंबडमध्ये आली. तिचे यजमान एसटी महामंडळात नांदेडला आहेत. मोठा मुलगा आजोळी आईकडे असतो. ही 18 महिन्यांच्या लेकरासोबत राहते. पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यशिक्षण देणं हे ज्योतीचं काम. राष्ट्रीय विद्यापीठ कौशल्यविकास संस्थेची कार्याध्यक्ष म्हणून ती काम करते. 

ज्योती अंबडमधील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात मुलींच्या छात्रालयात राहते. तिनं अंबडमध्ये राहून विद्यार्थिनींना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली, तेव्हा प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांनी तिला पाठिंबा दिला. डॉ. कटारे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले डॉ. शिवशंकर घुमरे यांनीही ज्योतीला सर्वतोपरी साह्य केलं. कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबविताना तेथील काही प्राध्यापकांचा सहभाग घेणं त्यामुळे शक्‍य झाले. 

पदवीनंतर नोकरी मिळण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये नसल्यानं लहान गावात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस)कडून "नॅशनल युनिव्हर्सिटी स्टुडंट्‌स स्कील डेव्हलपमेंट' (एनयूएसएसडी) हा कार्यक्रम अनेक ठिकाणी राबविला जातो. या कार्यक्रमाची मूळ कल्पना एस. रामादोराई आणि "टीआयएसएस'चे माजी संचालक प्रा. एस. परशुरामन यांची. "टीआयएसएस'च्या कुलगुरू प्रा. शालिनीताई भरत सध्या हा कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

ज्योतीचे शिक्षण "टीआयएसएस'मध्ये झाले आहे. तेथेच तिला "एनयूएसएसडी' कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले. तिला तन्मय नायक यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. 
ज्योतीच्या पुढाकारामुळे व संस्थेच्या सहकार्यामुळे अंबडमध्ये हा कार्यक्रम वर्षभर राबविला जातो. ज्योतीने प्रशिक्षणाचं स्वरूप स्वतःच्या कल्पनेनुसार तयार केलं आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इंग्रजीचा सफाईदार वापर, संवादकौशल्य, संगणकाचा वापर, वित्तीय व्यवहाराबद्दल ज्ञान, या व इतर कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. 

ज्योतीच्या कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. त्यातील तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बॅंका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपन्या, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आहेत. 
लहान गावांतील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ज्योतीने स्वतःहून या ज्ञानयज्ञाशी जोडून घेतले आहे. तिला मोठ्या शहरात नोकरी मिळू शकली असती; पण लहान गावात आपली गरज आहे याची जाणीव ठेवून तिने हा निर्णय घेतला. ज्योतीच्या या ज्ञानयज्ञाला अनेकांची मदत मिळाली आहे. तिच्या कुटुंबीयांचं विशेष कौतुक आहे. 

अशा ज्ञानज्योती गावोगावी उजळल्या, तर तळागाळातील सुशिक्षित मुला-मुलींसाठी नवनव्या संधी उपलब्ध होतील आणि बेरोजगारी कमी व्हायला निश्‍चितच मदत होईल, यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com