पहाटपावलं : 'बायसिकल मेयर' 

डॉ. श्रीकांत चोरघडे 
सोमवार, 24 जून 2019

"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते.

"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते. जागतिक स्तरावर दहा कोटी नवीन सायकलस्वार तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे हा आहे.

व्यक्तिश: त्यामुळे नियमितपणे सायकल चालविणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरामय राहू शकते. या "महापौरां'ची नेमणूक दोन वर्षांसाठी असते. ही जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी आठवड्यातून चार ते आठ तास द्यावेत, अशी अपेक्षा असते. या संस्थेचं ध्येय 50x30 असं आहे. याचा अर्थ 2030 पर्यंत प्रत्येक शहरातील 50 टक्के लोकसंख्येकडून सायकलचा वापर व्हावा असा आहे.

2019 संपेपर्यंत जगातील दोनशे शहरांमध्ये ही चळवळ कार्यरत व्हावी, असे ध्येय आहे. या "महापौरा'ने प्रत्येक महिन्यात आपल्या कामाचा गोषवारा मूळ संस्थेला सादर करावा, अशी अट आहे. त्यात केलेलं काम, आलेल्या अडचणी, त्यातून काढलेला मार्ग, काही नव्या सूचना या गोष्टी अभिप्रेत आहेत. भारतामध्ये असे बारा "महापौर' वेगवेगळ्या शहरांत नेमलेले आहेत. महाराष्ट्रात मुंबई व नागपूरमध्ये असे "महापौर' आहेत. मुंबईतील फिरोजा सुरेश व नागपूरमधील दीपांती पाल ही त्यांची नावं. 
दीपांतीला लहानपणापासून चाकांचं वेड होतं. त्यामुळे स्केटिंग, तीनचाकी सायकल, नंतर दुचाकी सायकल असा तिचा छंद सुरू राहिला.

पदवीनंतर तिनं "सायकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन' या नागपुरातील संस्थेमध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागात नोकरी धरली. सोबत "एमबीए'चा अभ्यास सुरू केला. सहा वर्षांनंतर नोकरी सोडली तेव्हा ती संचालक पदावर पोचली होती व "एमबीए'ची पदवीही मिळाली होती. मधल्या काळात "व्हॉट्‌सऍप'वरून अनिरुद्ध यांच्याशी ओळख झाली. त्यांनाही असाच लांब पल्ल्याचा सायकल चालविण्याचा छंद होता. त्यांनी पाच वर्षांपूर्वी नागपूरला N Cyclopedia हे सायकलचं दुकान सुरू केलं. तसेच लोकांनी सायकल वापरावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. सायकल शिकवणं, ज्यांना शर्यतीत भाग घ्यायचा आहे अशांना मार्गदर्शन करणं, असा त्यांचा छंद होता. त्यांनी स्वतः 400 किलोमीटर सायकल चालवून विक्रम केला आहे. 

मुंबईहून नागपूरला आल्यानंतर अनिरुद्धसोबत दीपांतीनं त्यांच्या दुकानाशी व त्यांच्या छंदाशी स्वतःला जोडून घेतलं. एकेकाळी तिचं वजन 92 किलोपर्यंत वाढलं होतं. सायकलमुळे आज ते 63 किलोपर्यंत उतरलं आहे. नागपुरात ती कायम सायकलवरून फिरते. अनिरुद्धनं दुकानाची दुसरी शाखा उघडली आहे. त्या निमित्तानं दोन्ही दुकानांचं काम पाहायला रोज 15-20 कि.मी. सायकलनं प्रवास होतो.

घरची कामं, खरेदी यासाठी दीपांती सायकलचा वापर करते. अशा छंदामुळे व त्यात दाखवलेल्या रुचीमुळे तिला "बायसिकल मेयर' म्हणून निवडलेलं आहे. सायकलस्वारांची संख्या वाढावी, या दृष्टीनं तिचे प्रयत्न सुरू असतात. तिच्या या यज्ञाच्या सफलतेसाठी शुभेच्छा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Pahatpaval