अजिंक्‍यतारा (पहाटपावलं)

डॉ. श्रीकांत चोरघडे 
सोमवार, 29 एप्रिल 2019

परवा एका सत्कार समारंभाला गेलो होतो. विदर्भातील यवतमाळजवळच्या पाटणबोरी गावातून आलेला हा चोवीस वर्षांचा तरुण आज जागतिक कीर्तीचा संशोधक म्हणून नावाजला गेला आहे.

परवा एका सत्कार समारंभाला गेलो होतो. विदर्भातील यवतमाळजवळच्या पाटणबोरी गावातून आलेला हा चोवीस वर्षांचा तरुण आज जागतिक कीर्तीचा संशोधक म्हणून नावाजला गेला आहे. त्याचं नाव अजिंक्‍य रवींद्र कोत्तावार. लहान असताना अजिंक्‍य उनाडक्‍या जास्त करायचा. आई- वडिलांनी परिचयाच्या आध्यात्मिक व्यक्तीकडे नेल्यावर त्यांनी सांगितलं, "काळजी करू नका. हा मोठा शास्त्रज्ञ होईल.' त्यामुळे दहा वर्षांच्या अजिंक्‍यच्या डोक्‍यात "शास्त्रज्ञ' या शब्दानं घर केलं आणि तो अभ्यासाकडे थोडंफार लक्ष देऊ लागला.

परीक्षेत पास होत होता, तरी खूप हुशार अशी त्याची ओळख नव्हती. पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश मिळेल इतके गुण त्याला मिळाले. इंजिनिअर झाल्यावर नोकरी मिळाली, पण काहीतरी नवं करण्याची त्याची वृत्ती स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणातून नुसते "रोबो' तयार न होता स्वतंत्र बुद्धी वापरून सर्जनशीलता विकसित करावी या दृष्टीनं त्यानं अभ्यासक्रम तयार केला आहे. अशा नवोन्मेषाच्या वृत्तीमुळे आज 26 व्या वर्षी त्यानं वेगवेगळे शोध लावून 18 पेटंटची नोंद केली आहे आणि ही त्याची पाच वर्षांतील कामगिरी आहे. त्याचा आणखी एक विक्रम आहे तो म्हणजे एका दिवसात चार पेटंट मिळविण्याचा! त्याला कुणी "अजिंक्‍यतारा' म्हणतात, तर कुणी "रॅंचो' म्हणतात. 

त्याचं गाजलंलं पेटंट खेड्यापाड्यातील माता-भगिनीचं कष्ट कमी करणारं आहे. खेडोपाडी पाणीटंचाईमुळे दुरून पाणी आणावं लागतं. ही अडचण लक्षात घेऊन त्यानं हातानं सहज ओढून नेता येणारे ड्रम तयार केले. एका वेळी दोनशे लिटर पाणी त्यातून आणलं जातं.

आसामममध्ये "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'मध्ये एम. टेक. करायला गेला असताना तेथील मुख्य पीक असलेल्या चहापत्तीपासून चहा बनविण्याच्या प्रक्रियेत वाया जाणाऱ्या कचऱ्यातून बायोडिझेल तयार करण्याची पद्धत त्याने शोधली. त्यानं पेटंट घेतलेले काही शोध पुढीलप्रमाणे ः 1) वाहनांची कार्यक्षमता वाढविणारे इंजिन, 2) पेट्रोल व डिझेलवर चालू शकणारे वाहन. 3) धावत्या गाडीतून वीजनिर्मिती 4) हायड्रोमॅग्नेटिक ब्रेकिंग सिस्टिम. 5) लोणी काढण्याचे यंत्र. 6) डिजिटल बायोमेट्रिक व्होटिंग सिस्टिम. 7) वाहनांसाठी अपघात व चोरीची सूचना देणारं संयंत्र. "थ्री इडियट'मधील दाखवलेला रॅंचो ज्याच्यावरून घेतला आहे, ते सोनम वांगचुक यांच्या संपर्कात अजिंक्‍य आहे. त्यांच्या सहकार्यानं त्यानं नागपुरात ज्ञान फाउंडेशनची स्थापना केली आहे.

विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून शिकावं या दृष्टीने त्यानं 500 मॉडेल्स तयार केली असून, सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांना या माध्यमातून मार्गदर्शन मिळालं आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यानं एक शोधप्रकल्प सुरू केला आहे. "यंग अचिव्हर्स'सह अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत. शालेय जीवनात कमी गुण मिळविणाऱ्या पाल्यांमुळे निराश होणाऱ्या पालकांना व विद्यार्थ्यांना अजिंक्‍य व त्याचा हा जीवनपट पथदर्शी ठरावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on PahatPawal