उदात्त भारतीयतेचे प्रतीक

नितीन गडकरी 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

"विश्‍वचि माझे घर' हा मूल्यविचार मांडणारा, भारत महासत्ता व्हावा, यासाठी सतत प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे अमोघ वक्‍तृत्व भारतीयांच्या मनामनांत कायम राहील. मूल्याधारित, लोकशाहीवादी समाजरचनेच्या निर्मितीची प्रेरणा वाजपेयी समस्त भारतीयांना देत राहतील.

हिंदुत्व किंवा भारतीयता म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग - न्यायालयाने केलेले हे वर्णन मूर्तिमंत जगणारे कालजयी नेतृत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. संकुचितता, सांप्रदायिकता हे शब्द त्यांच्या मनाजवळ कधीही घुटमळले नाहीत. "वसुधैव कुटुंबकम', जगातले सर्व विचार, सर्व वारे माझ्या घरात खेळू देत म्हणणारी भारतीय संस्कृती अटलजींच्या शरीराने मूर्त रूपात अवतरली होती. ते देशाचे माजी पंतप्रधान होते, आमच्या पक्षाचे आधार होते; तसेच भारतातील उदात्ततेचे प्रतीक होते.

अटलजींच्या राजकीय कारकिर्दीतील कितीतरी वर्षे अभावाची होती. आम्ही सगळे केवळ एका वैचारिक श्रद्धेने बांधले गेले होतो. राष्ट्रभक्‍तीचा संस्कार हाच आमचा एकमेव आधार. अकरा-बारा वर्षांचा असताना पंक्‍चर झालेली सायकल ओढत मी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरील त्यांच्या सभेला प्रमोद बोरावार नावाच्या मित्राबरोबर गेलो होतो. त्या सभेनंतरचा त्यांचा प्रत्येक न प्रत्येक शब्द मी ऐकला. माझ्यासारख्या कित्येकांनी तो मनात साठवला, जीवनाचा मंत्र मानला. मध्यरात्री कोलकत्याहून मुंबईकडे सामान नेणारे डाकोटा जातीचे विमान यायचे. एकदा अटलजी त्या विमानाने नागपूरला येणार असे कळले. कुमार, तरुण वयाचे आम्ही कार्यकर्ते विमानतळाकडे निघालो.

पहाटे दोन वाजता विमान पोहोचताच "जनसंघ, जनसंघ' तसेच "देश का नेता कैसा हो अटलबिहारी जैसा हो' अशा घोषणा द्यायला आम्ही प्रारंभ केला. अटलजींना जवळून पाहताना आम्ही धन्य झालो होतो. त्यांनी आम्हाला आवाज देताच आम्ही हरखून गेलो. ते म्हणाले, "देश का नेता कैसा हो ये मत सोचो. देश महान कैसे बने इसपर विचार करो.' त्यांच्या या सहजतेने आम्ही थरारून गेलो होतो. 

पक्षाने जोडून ठेवलेली कुटुंबे हाच आमच्या संघटनेचा आणि पक्षाचाही आधार होता. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा मुक्‍काम कार्यकर्त्याच्या घरीच असायचा. एकदा मी महाराष्ट्र प्रदेशाचा सचिव या नात्याने अटलजींबरोबर प्रवासात होतो. त्यांची कामे करायला मिळणे, त्यांचे हवे नको ते पाहणे हे काम माझ्यासारख्या कित्येकांना सौभाग्य वाटायचे. औरंगाबादला ते आले आणि तेथून पुढे जालना, बुलडाणा अशा गावांमध्ये आम्ही हेलिकॉप्टरने गेलो. दोन-तीन दिवसांच्या या प्रवासात त्यांना जवळून पाहायला मिळाले. त्यांच्या कोणत्याही मागण्या नसायच्या. ज्या घरात उतरतील तेथील ज्येष्ठांशी ते वेळात वेळ काढून सुसंवाद साधत. त्या कुटुंबातील मुलांची विचारपूस करण्यावर त्यांचा विशेष भर असे.

कार्यकर्त्यांच्या घरात ते केवळ काही तासांत प्रत्येकाला हवेहवेसे वाटू लागत. ते त्या कुटुंबातले एक ज्येष्ठ होऊन जात. संघ परिवारातल्या कुटुंबांचे ते देव होते. त्यांच्या नम्र, शालीन व्यक्तिमत्त्वाने कार्यकर्ता भारून जात असे. साहित्याने, सुसंस्कृततेने त्यांचे हृदय झंकारत असायचे. प्रवासात त्यांची जवळून ओळख व्हायची. 

अटलजी राजकारणी म्हणूनही थोर होते. द्रष्टे होते. ते संघाचे स्वयंसेवक होते. हिंदुत्व आणि हिंदू धर्माबद्दल बरेच गैरसमज दृढ होते, आहेत. त्यांना छेद देण्याचे खरे काम राजकारणात केले ते अटलजींनी. आक्रमक, विस्तारवादी ही दूषणे अटलजी खोटी ठरवायचे. ते प्रखर राष्ट्रवादी होते. भारताने महासत्ता व्हावे, याचा त्यांच्या अंतरी सदैव ध्यास. संकुचित, सांप्रदायिक या शब्दांना खोटे ठरवत ते सर्व पक्षांमध्ये मैत्रीचे पूल बांधायचे. त्यांच्या उदारमतवादी दृष्टिकोनामुळे ते बेरजेचे पूल बांधायचे. वैचारिक विरोधकही त्यांच्या या उदारतेचे स्वागत करायचे. कपट त्यांच्या मनाला कधीही शिवले नाही. अटलजींचे परराष्ट्र धोरण हा तर स्वतंत्र भारताच्या राजकारणातला मानाचा अध्याय. शेजारी राष्ट्रांशी मैत्र ठेवणे अन्‌ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा सहिष्णू रूपात मांडत राहाणे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे कित्येक नवे मित्र जोडले गेले. उपखंडाचे राजकारण सौहार्दाचे झाले. कारगिल युद्धाच्या वेळीही सीमारेषांचा आदर करण्याचा आग्रह त्यांनी कधीही सोडला नाही.

राष्ट्राचा इतिहास असे थोर नेते घडवत असतात. दुसऱ्याची रेषा त्यांनी कधीही मिटवली नाही, दुसरी मोठी रेषा आखण्यावर त्यांनी कायम भर दिला. तेरा दिवसांच्या सरकारनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. "बाजारात मते उपलब्ध होती, पण ती विकत घेणे ही संसदीय लोकशाही नाही,' असे सांगत त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही. ते पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला गेले, तेव्हा संपूर्ण देश हळहळला होता. पुढे भाजपची पुन्हा सत्ता आली. त्यांना विकल करण्याचे प्रयत्न केले जात असतानाही ते सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र ठेवण्याचे अगदी मन:पूर्वक प्रयत्न करीत. मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झालो, तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो.

विकल कायेचे अटलजी पहुडले होते. त्यांच्या मानलेल्या जावयाने रंजन भट्टाचार्य याने "बापजी ( अटलजींचे परिवारातले नाव ) आपके पक्ष के अध्यक्ष आशीष लेने के लिये आये है,' असे सांगितले. अटलजींचा हात वर गेला. चेहऱ्यावर स्मित झळकले. तो हात आश्‍वासक होता. त्यांनी खुणेनेच जवळ बोलावले. पाठीवर हात फिरवला. पक्षाला पुढे नेणारी प्रेरणा त्या स्पर्शातून माझ्यापर्यंत पोहोचत होती. पक्षाच्या भविष्यासाठी मिळालेले ते आशीर्वचन होते. पक्ष म्हणून भाजप वाढवताना ते कायम सामूहिक निर्णयाचे तत्त्व अंगीकारत. आभाळाएवढी उंची लक्षात घेता त्यांचे कोणतेही मत पक्षाला स्वीकारावे लागलेच असते. पण ते कायम सांगत "पंचोंकी राय से पक्ष चलेगा.'

कोणताही निर्णय न लादण्याची त्यांचा हा गुण विलक्षण होता. त्यांचे मोठेपण सहिष्णू विचारात, सामूहिक निर्णयाच्या स्वीकारात दडले होते. ते आता पार्थिवरूपाने आपल्यात नाहीत. राष्ट्रवादी विचारांना सर्वोच्च स्थान देणारी भारतीयता अक्षुण्ण प्रवाहित ठेवणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. "विश्‍वचि माझे घर' हा मूल्यविचार मांडणारा, भारत महासत्ता व्हावा, यासाठी सतत प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे अमोघ वक्‍तृत्व भारतीयांच्या मनामनांत कायम राहील. मूल्याधारित, लोकशाहीवादी समाजरचनेच्या निर्मितीची प्रेरणा वाजपेयी समस्त भारतीयांना देत राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Politics