पहाटपावलं : आगळावेगळा पर्यावरणरक्षक

डॉ. श्रीकांत चोरघडे 
Monday, 17 June 2019

उष्म्यामुळे जिवाची काहिली होत असताना थोडा थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, नारळपाणी, फळांचे रस, शीतपेयांचे सेवन केले जाते. त्यासाठी स्ट्रॉचा वापर होतो. नारळपाण्याची लज्जत तर स्ट्रॉशिवाय येतच नाही.

उष्म्यामुळे जिवाची काहिली होत असताना थोडा थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, नारळपाणी, फळांचे रस, शीतपेयांचे सेवन केले जाते. त्यासाठी स्ट्रॉचा वापर होतो. नारळपाण्याची लज्जत तर स्ट्रॉशिवाय येतच नाही. हे स्ट्रॉ प्लॅस्टिकचे असतात. एकदा वापरले की कचऱ्यात फेकले जातात. स्ट्रॉमुळे होणारा प्लॅस्टिकचा कचरा अक्षरशः टनावारी असतो, हा विचार सर्वसाधारणपणे कुणी करीत नाही. पण हा विचार आर्किटेक्‍ट असलेल्या श्रेयश नंदनवार या पंचविशीतील तरुणाच्या मनात आला आणि त्याने या समस्येचा शास्त्रोक्त अभ्यास केला.

श्रेयशने नागपुरातील प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरमधून पदवी घेतली. पुढील अभ्यासासाठी तो अहमदाबादच्या Centre for Environmental Planning and Technology या संस्थेत रुजू झाला. संस्थेतर्फे अभ्यास सहलीसाठी तो व्हिएतनामला गेला. तेथे नारळपाणी पिण्यासाठी बांबूचा स्ट्रॉ पाहून त्याला अप्रूप वाटलं. परत आल्यावर चौकाचौकांत होणारा प्लॅस्टिक स्ट्रॉचा वापर त्याला अस्वस्थ करून गेला व सर्वेक्षण करून त्याने या समस्येचं गांभीर्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

एका शीतपेयाच्या दुकानात दिवसाला एक हजार स्ट्रॉ वापरले जातात, तर 500 नारळपाण्याच्या गाड्यांवर प्रत्येकी रोज 150 स्ट्रॉ वापरले जाऊन त्यांचा कचरा होतो, असं त्याला आढळलं. त्याने प्रबंधासाठी हाच विषय निवडला. त्याच्या मार्गदर्शकांनी या वेगळ्या विषयावरच्या अभ्यासासाठी त्याची पाठ थोपटली. 

अहमदाबादमधील शिक्षण पूर्ण करून श्रेयश नागपूरला परतला. मधल्या काळात तो आसाममध्ये गेला असताना तिथं बांबूपासून तयार केलेल्या स्ट्रॉचा वापर त्याने पाहिला. त्याची प्रकिया जाणून घेतली. नागपूरला आल्यावर नोकरीचा विचार न करता पर्यावरणपूरक स्ट्रॉ तयार करण्याचा त्याने निर्धार केला. प्रयोग करून स्वतः पद्धत शोधून काढली. याशिवाय गव्हाच्या पिकाची कापणी झाल्यावर उरलेल्या धांड्यांपासूनही स्ट्रॉ तयार करता येतात, हे लक्षात आल्यावर त्यावरही प्रयोग केले. या दोन्ही प्रकारच्या स्ट्रॉचे उत्पादन त्याने सुरू केलं. त्या स्ट्रॉना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्याचा उत्साह वाढला.

यातील गव्हाच्या धांड्यांचा वापर यशस्वी झाला, तर पर्यावरणरक्षणासाठी दुहेरी उपयोग होणार आहे. ज्या ठिकाणी गव्हाचं पीक निघतं, तिथं गव्हाची कापणी झाल्यावर उरलेले धांडे जाळले जातात. मध्यंतरी दिल्लीतील हवेच्या प्रदूषणासाठी हरियानात जाळल्या जाणाऱ्या धांड्यांच्या धुराला बऱ्याच अंशी जबाबदार धरलं गेलं होतं. या धांड्यांपासून स्ट्रॉ तयार केले, तर शेतकऱ्यांना उत्पादनाचं नवं साधन उपलब्ध होईल व धांडे जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्ती मिळेल.

शिवाय, प्लॅस्टिकच्या स्ट्रॉपासून मुक्ती मिळाल्यामुळे प्लॅस्टिक कचऱ्यापासून सुटका होईल ती वेगळीच. श्रेयशचा हा उपक्रम कदाचित लहान वाटेल; पण अशा स्ट्रॉचा वापर सर्वदूर होऊ लागला, तर पर्यावरण रक्षणाचं महान कार्य केल्याचं श्रेय नक्कीच श्रेयशचं असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article written by Shrikant Chorghade