esakal | #युथटॉक प्रेम करण्याचा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

#युथटॉक प्रेम करण्याचा संकल्प

#युथटॉक प्रेम करण्याचा संकल्प

sakal_logo
By
अमृता देसर्डा

नवीन वर्षाची सुरवात कुठल्या तरी संकल्पनेनं करावी, एक ध्येय ठेवून त्याचा पाठपुरावा करावा, असं दरवर्षी वाटतं. माझ्या डायरीत त्या संकल्पाची नोंद करून ठेवते. लिहिल्यावर स्वतःशीच हसते आणि स्वतःलाच सांगते, "हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी.' पण लिहून ठेवलं, मनाशी कितीही घोकलं, तरी तो पूर्ण होईलच असं नाही, ही एक बाजू मन सांगत राहतं. येईल तो दिवस साजरा करायचा आणि पुढं जायचं अशी भूमिका मग मनात पक्की होऊन बसते.

अर्थात माझ्या पिढीतील माणसं काहीतरी ध्येय बाळगून त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणारी आहेत, असं मला तरी वाटतं. नुसता प्रयत्न करून आमची पिढी कदाचित दमून जाते किंवा आधीच्या पिढ्यांशी आमची तुलना होऊन आम्ही कसे आहोत हे सांगितलं जातं. त्याबद्दल चर्चा पण होते. ही सगळी प्रक्रिया, मतांचा पाऊस, वादविवाद यांसारख्या गोष्टी आम्ही घडण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. हे सगळं असलं तरीही मित्र-मैत्रिणींना नववर्षाच्या शुभेच्छा देताना, "तुमचा या वर्षीचा संकल्प काय' हा प्रश्‍न मी आवर्जून विचारते. काहीजण म्हणतात, "वेळ नाही, संकल्प करून काय होणार?', तर काहीजण एकदम सकारात्मक उत्तरं देतात. 

एका मैत्रिणीने तिचा संकल्प सांगितला. ती म्हणाली, "मी या वर्षी आजूबाजूच्या माणसांवर खूप प्रेम करणार. सगळ्यांशी आपुलकीनं वागणार.' हे ऐकल्यावर पहिल्यांदा हसू आलं. तिची थोडी चेष्टा केली. पण मग तिच्या संकल्पाचं थोडं कौतुकही वाटलं. असा संकल्प करणं आणि तसा विचार करणं ही एखाद्याला फालतू गोष्ट वाटेल, तर एखाद्याला खूप महत्त्वाची. प्रत्येकाचे त्याचे त्याचे प्रेमाचे संदर्भ वेगवेगळे असतील. कारण एकतर मुळात प्रेम आणि आपुलकी या गोष्टी कशा आहेत, त्या फक्त लिंगभावाशी निगडित आहेत की आजूबाजूच्या नात्यांशी संबंधित आहेत, याबद्दल मनात सतत गोंधळ चालू असतो. 

रोजच्या जगण्यात हे शब्द इतके सहज आणि सोयीचे झालेत, की एखादा "लव्ह यू'चा इमोजी किंवा इमेज जवळच्या माणसांना नुसती "व्हॉट्‌सऍप' केली तरी आपल्याला काय सांगायचं आहे, हे क्षणात आमच्या पिढीला सांगता येतं, व्यक्त करता येतं. एखाद्याला आत्ता काय वाटतं हे इतक्‍या पटकन सांगता येतं, की त्या भावना परिपक्व होत आहेत की नाही, त्याचा आवाका काय हे कळायला आम्ही स्वतःला फुरसत देतो की नाही? या शब्दांच्या अर्थांच्या पलीकडे आम्ही गेलो आहोत काय, याचा विचार करायला आम्हाला सवड आहे किंवा नाही हेही आम्ही पाहत नाही. असा समज आमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या माणसांचा होऊ शकतो. 

आम्ही धावत असताना या भावनांनाही आमच्यासोबत धावायला लावतो. त्याही निमूटपणे आमच्या मोबाईलच्या इनबॉक्‍समध्ये असतात, डायरीत असतात किंवा मग लॅपटॉपच्या खासगी फोल्डरमध्ये असूनही आमच्यासोबत रेस करत असतात. मग लोकलमध्ये हेडफोन लावून चार प्रेमाचे शब्द जवळच्या व्यक्तीशी बोलतो, त्या गर्दीत निवांतपणा शोधून मनातल्या आपुलकीला सोबत जगवतो. किंवा शनिवार-रविवार जोडून आलेल्या सुटीत सलग तीन सिनेमे पाहून, हॉटेलिंग करून, त्या प्रत्येक क्षणांचे सेल्फी काढून ते "इन्स्टाग्राम', "फेसबुक'वर टाकून आभासी प्रेम मिळवून स्वतःला समाधानी करत राहतो. 

आमची प्रेम करण्याची पद्धत ही एकदम थेट आहे. त्यात खूप वेग आहे, आवेग आहे. बेधुंदपणा आणि बेफिकिरी आहे. कदाचित फक्त वर्तमान जगण्याची आणि आत्ताच्या क्षणांचा जगून घेण्याचा विचार त्यात असावा. सगळं काही लवकर मिळविण्याच्या विचारात आम्ही या गोष्टीही लवकर मिळाव्यात म्हणून धडपड करतो. त्या किती टिकतील, आपल्या जगण्याला किती समृद्ध करतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचे आम्ही धाडस करत नाही.

प्रेम प्रत्येकाला हवं आहे, अगदी नव्वदी पार केलेल्या, सुरकुतलेल्या हातांच्या आणि उत्सुक डोळ्यांच्या आज्जीलाही हवं आहे, तर नुकत्याच जन्मलेल्या गोंडस बाळालाही. मग आमच्यासारख्या उत्साहानं ओतप्रोत भरलेल्या तरुणाईला तर प्रेमाचं किती आकर्षण असेल हे सांगायलाच नको. 

माझ्या मैत्रिणीचे मनापासून आभार मानले आणि तिचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जी काही मदत करता येईल ती करण्याचं मी प्रेमपूर्वक आश्‍वासन दिलं, तसंच प्रेम या भावनेला समजून घेऊन त्याच्या अर्थापर्यंत जाण्याचा संकल्पही मनाशी पक्का केला आणि केवळ आभासीच नाही, तर प्रत्यक्ष एकमेकींना भेटायचं हेदेखील आम्ही सहज ऑनलाइन चॅट करून ठरवून टाकलं.

loading image