ऐसे स्फोटकाचे चरित्र... (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

नुकतेच ऐकिवात आले की- 

कळिकाळाला न डरणारे 
क्रांतीची ठिणगी पोटात सामावलेले 
जुलूमशाहीच्या चिंधड्या उडवणारे 
एक ज्वालाग्राही स्फोटक 
क्रांतिकारकांच्या हाती गावले... 

सत्तांधांच्या सिंहासनांखाली 
पेरलेल्या ह्या स्फोटकाचे 
दुष्परिणाम अटळ आहेत. 

नुकतेच ऐकिवात आले की- 

कळिकाळाला न डरणारे 
क्रांतीची ठिणगी पोटात सामावलेले 
जुलूमशाहीच्या चिंधड्या उडवणारे 
एक ज्वालाग्राही स्फोटक 
क्रांतिकारकांच्या हाती गावले... 

सत्तांधांच्या सिंहासनांखाली 
पेरलेल्या ह्या स्फोटकाचे 
दुष्परिणाम अटळ आहेत. 

ह्या स्फोटकाला दर्प आहे, 
श्रमिकांच्या घामाचा. 
ह्या स्फोटकाला गंध आहे 
जनसामान्यांच्या फाटक्‍या जीवितांचा. 
हे स्फोटक दिसते सामान्य धातूसमान, 
किंवा निरुपद्रवी पावडरीसारखे, 
पण त्यातील गाभ्यात साकळलेल्या 
समाजवादाच्या मूलद्रव्याने 
त्याचे सामर्थ्य रुद्ररूप आहे. 
आणि हो, अधून मधून कधी कधी 
ह्या स्फोटकातून अचानक उसळतो, 
कस्तुरीचा मादक परिमळदेखील. 

त्या स्फोटकाने फोडला घाम 
आढ्यतेखोर तख्ताला 
फोडले भांडार धन्याचे 
आणि खुले केले आभाळ 
श्रमिकांच्या श्‍वासोच्छ्वासासाठी. 
त्याच्या एका वक्र भिवईवर 
बोटाच्या इशाऱ्यावर 
साध्याशा खाकरण्यावर 
बंद पडली महानगरे. गोद्या, 
रेल्वेगाड्या आणि बरेच काही. 

हातातील कराल साखळदंड 
मोगऱ्याच्या गजऱ्यासारखे मिरवत 
सुहास्यवदनाने त्याने दिले खुले आव्हान. 
जुलुमबाज व्यवस्थेला आणि तिच्या 
रत्नजडित कोंदणात बसलेल्या 
प्रस्थापितांच्या सुभद्र बैठकांना. 

दमनाच्या यंत्रणेची उडाली वासलात 
सत्तांधांचे बुरुज ढासळू लागले 
तुरुंगांच्या भिंती आणि पोलादाचे 
गज तरी कसे टिकावेत, 
ह्या स्फोटकासमोर? 

तख्तनशीन सत्तांधांच्या 
नजरेला नजर भिडवून 
जाळ ओकणाऱ्या 
ह्या ज्वलज्जहाल स्फोटकाला 
कुणीही करु शकत नव्हते 
डबाबंद किंवा निकामी. 
ज्याच्या निकटतेनेच 
लोखंडी शृंखलांचे होऊन पडत 
निर्जीव, दुर्बल पेळू. 
नामदारांच्या पालख्यांचे 
भोई कमरेपासून लुळे पडत. 

स्फोटकाच्या अस्तित्त्वाने मग 
प्रस्थापितांची उडाली हबेलंडी, 
दिल्लीतील तख्तनशीन सत्ताधारी 
बिचकले, दचकले, वचकले! 

जनसामान्यांचे महानायकत्व 
मिरवणाऱ्या ह्या संजीवक स्फोटकाचे 
पुढे काय झाले? नाही कळले. 

कळले ते इतकेच की, 
बऱ्याच वर्षांनी उत्खनन केले असता 
अन्य काही फुटक्‍या अवशेषांमध्ये 
हा प्राचीन स्फोटगोळा मिळाला. 
परंतु, स्फोटकतज्ज्ञांनी तो आधीच 
निकामी केला होता, असे 
अधिकृत सूत्रांकडून कळते! 
इतकेच. 

- ब्रिटिश नंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Dhing Tang