जीत-मंत्र ! (ढिंग टांग!)

जीत-मंत्र ! (ढिंग टांग!)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण महाराष्ट्रात राहिलो असतो तर यवतमाळला साहित्य संमेलनाच्या मांडवात जावे लागले असते !! त्यापेक्षा दिल्लीतला मांडव केव्हाही पर्वडला.

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भारावल्यासारखे झाले आहे. माझा नेहमी हाच घोळ होतो. दिल्लीला जाऊन आलो की पुढली तीन-चार इलेक्‍शन आरामात जिंकू शकू असा आत्मविश्‍वास बळावतो. परत मुंबईत आलो की दोनेक तासात खचायला होते... मुंबईच्या हवेतच दोष आहे !! दिल्लीत गेल्या गेल्या मोटाभाईंची भेट घेतली. 

""केम छो?'' त्यांनी विचारले. हल्ली दिल्लीत माझ्याशी सगळे बरे बोलतात. का कुणास ठाऊक! 
""आराम!'' मी मज्जेत म्हणालो. इथे मुंबईत कशाला तोंड द्यावे लागते, हे त्यांना काय सांगावे? खरे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मुंबईत आराम मिळणे अशक्‍य आहे. आरामासाठी इथे वेळ आहे कोणाला? त्यासाठी एक तर दिल्लीला जावे किंवा नागपूरला तरी!! 

""हवे आराम हराम छे... आवती चुंटणीच्या तयारीला लागा!'' त्यांनी फर्मावले. मी मान डोलावून "हो' म्हटले. पण पोटात गोळा आला होता. चुंटणी म्हणजे निवडणूक असे, कुणीतरी सांगितले, तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. व्यासपीठाच्या नजीक साक्षात नमोजी हाताची घडी घालून (स्वामी विवेकानंदांच्या पोझमध्ये) उभे होते. त्यांना वंदन केले. त्यांनीही पाठीवर हात ठेवून ""कामाला लागा'' असे (मराठीत) सांगितले. बरे वाटले. 

""तुम्हाला कसा सेवक पाहिजे? काड्या घालणारा, येता-जाता तुमच्या प्यांटीच्या खिशातले, ड्रावरातले पैसे उचलणारा, बाहेर जाऊन तुमची बदनामी करणारा सेवक हवा आहे, की इमानदार, मेहनती आणि एकनिष्ठ सेवक हवा आहे?'' त्यांनी मला अचानक विचारले. मी विचारात पडलो. काय उत्तर द्यावे? 
""आम्हाला तुमच्यासारखा प्रधानसेवक हवा आहे!'' मी बाणेदारपणे म्हणालो. त्यांनी पुन्हा एकदा पाठ थोपटली. त्यांनी चॉइसच असा दिला की दुसरे काही उत्तर देताच आले नसते. असो. 

...आता आराम करायचा नाही, खूप काम करायचे आहे, हे ऐकून आम्हा कार्यकर्त्यांचे चेहरे पडले. घरी काय सांगणार? आधीच आमच्या पक्षाचे कार्यकर्ते घरातली इकडची काडी तिकडे करत नाहीत, अशा घरगुती तक्रारी असतात. "सत्तत कसलं ते मेलं दळभद्री राजकारण?' असा घरचा आहेर रोजच्या रोज मिळत असतो. त्यात आता "मेरा बूथ, सबसे मजबूत' ह्या योजनेनुसार हातात मतदारयादी घेऊन कार्यकर्त्यांना घरोघरी हिंडावे लागणार आहे. वाणसामानाच्या यादीऐवजी ही यादी हातात घेऊन हिंडणाऱ्याला घरात कशाला तोंड द्यावे लागते, हे काही लोकांना कळणार नाही!! हल्ली लोकही पहिल्यासारखे राहिले नाहीत. आधी "आमचं मत तुम्हालाच' असे सांगून कांग्रेसवर शिक्‍का मारून यायचे, आता शंभर प्रश्‍न विचारून कमळ सोडून दुसरीच बटणे दाबून येतील, अशी शक्‍यता आहे!! काळ मोठा कठीण आला आहे... 

यंदाची निवडणूक ही पानिपतासारखी आहे. पानपतावर कित्येक मोत्ये गळाली, पानिपतावरचा पराभव पुढली दोनशे वर्षांच्या गुलामगिरीत ढकलणारा ठरला. ही निवडणूक गमावली, तर तस्सेच होईल, असे मोटाभाईंनी बजावून सांगितल्याने आता इलाज नाही. काहीही करून ही निवडणूक जिंकावीच लागेल. जागे राहिले पाहिजे कारण रात्र वैऱ्याची आहे. 

पानिपतावर दत्ताजी शिंदेंनी अखेरच्या क्षणी काढलेले उद्‌गार सारखे आठवताहेत..."बचेंगे तो और भी लढेंगे'! लेकिन बचेंगे क्‍या? हा खरा सवाल आहे! चला, (युतीसाठी) तातडीने उधोजीसाहेबांना फोन लावणे भाग आहे! हर हर महादेव. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com