ढिंग टांग! : सांग, सांग भोलानाऽऽऽथ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

हिमाद्रिपार्श्‍वे च तटे रमन्तं। 
सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रे। 
सुरासुरैर्यक्षमहोरगाद्ये:। 
केदारमीशं शिवमेकमीडे।। 

हिमाद्रिपार्श्‍वे च तटे रमन्तं। 
सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रे। 
सुरासुरैर्यक्षमहोरगाद्ये:। 
केदारमीशं शिवमेकमीडे।। 

""हिमालयाच्या समीप मंदाकिनी नदीच्या तटीनिकटी केदार नामक श्रृंगावर निवास करून राहिलेले बाबाजी नित्य मुनिश्‍वरांकडून पूजित आहेत. तसेच देवदेवता, असुर, यक्ष-किन्नर, नागादी भक्‍तगणही त्यांची पूजा करितात. अशा ह्या अद्वितीय केदारनाथ शिवाची मी स्तुती कर करितो...'' 

...जय हो! बाबाजी की जय हो!! गेली चार वर्षे मी नियमित बाबाजींच्या द्‌वारी येत आहे. दर्शनाचा लाभ घेत आहे. बाबाजी आहेत, म्हणून हा य:कश्‍चित भक्‍त आज (दोन) पायांवर उभा आहे. त्यांच्या द्‌वारी यायचे ह्या कल्पनेनेच माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. पाठोपाठ मी उभा राहातो आणि तडक उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बसून इथे येऊन उभा राहातो. इथल्या बर्फाळ पहाडांच्या साक्षीने इथेच उभे राहून तप:साधना करण्याचे गेली चारेक वर्षे राहून जात होते. यंदा म्हटले, एखादी गुहाबिहा पाहून साधना करावीच. तसा बेत मी रचला. पण देवाचिये द्‌वारी येण्याआधी भक्‍ताला भवसागर मेटाकुटीने पार करावा लागतो, ह्याचा अनुभव आला. बाबाजी माझे अल्पधारिष्ट्य पाहात होते का?

चुनाव संपल्यानंतर मी लागलीच मौनात गेलो. 142 सभा घेणाऱ्या माणसाने तासभर मौन पाळले तर काही बिघडते का? नेमक्‍या त्याच वेळेला मोटाभाईंनी पत्रकार परिषद घेतली. मला एक शब्दही बोलता आला नाही. साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे मग मोटाभाईंनाच द्यावी लागली. 

""हवे शुं करवानुं?'' पत्रकार परिषदेनंतर मोटाभाईंनी चिंताग्रस्त सुरात विचारले. 
""भोलेबाबानी दर्शनमाटे हूं निकळीश...'' मी (हात जोडून) म्हणालो. भोलेबाबा मी मुद्‌दाम म्हटले होते. मोटाभाईंना वाटले की काशीत मतदान असल्याने मी तिथे जाईन!! पण मी तडक केदारनाथाला गेलो. आपले मोठे काम अडले की रिजनल आफिसात जाण्यापेक्षा थेट हेड क्‍वार्टर गाठावे, असे कार्पोरेट जगताचे एक तत्त्व आहे. अध्यात्मातही जवळपास तसेच असते. काशीतला चुनाव बाजूला ठेवून मी थेट हिमालयातच गेलो... 
देव सर्वाभूति आहे. तो जळीस्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र आहे. तरीही साधुसंत तप:साधनेसाठी हिमालयच गाठतात. ते का? तर हिमालयातील वातावरण तप:साधनेसाठी पोषक आहे. काशी विश्‍वनाथाच्या दरबारी काय, मी नेहमीच जातो. पण काशीत गुहा नाही!! ""तिथल्या सा. बां. विभागाच्या इंजिनिअरला सांगून दोन दिवसांत गुहा बांधून घेतो, टेन्शन घेऊ नका'' असे मला योगीजींनी सांगितले होते. पण मला नैसर्गिक गुहा हवी होती.

कडक मौन पाळून मी सरळ हेलिकॉप्टरमध्येच बसलो. 
केदारनाथाच्या आसपासच्या पर्वतांमध्ये अनेक गुहा आहेत. तिथे अनेक तापसी बसलेले असतात. मी येणार म्हटल्यावर तिथल्या कलेक्‍टरने एक गुहा खाली करून घेतली. तिथला साधू बिचारा कमंडलु उचलून दोन दिवसांसाठी कुठे तरी दुसरीकडे गेला असावा! गुहा प्रशस्त आणि सेल्फ कंटेण्ड होती. 

गुहेला एक खिडकी पाडून घेतली. "सेल्फ कंटेण्ड विथ बाबाजी फेसिंग व्ह्यू' अशी ती गुहा सुसज्ज झाल्यावर मी आत गेलो. मी तपश्‍चर्येसाठीच गेलो आहे, हे जनतेला कळावे. म्हणून मी पन्नासेक टीव्ही क्‍यामेरेही नेले होते. म्हटले, करा लेको थेट प्रक्षेपण!! 

बाबाजी, (भक्‍ताकडे) लक्ष असू द्या... जय हो! बाबाजी, जय हो!! माझे मागणे काही "लई' नाही. पण सांग, सांग, भोलानाऽऽऽथ...(मतांचा) पाऊस पडेल काय? 

- ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Dhing Tang Article

टॅग्स