ढिंग टांग! : राजीनामापर्व! 

ढिंग टांग! : राजीनामापर्व! 

निवडणूकपर्व संपून देशात राजीनामापर्व सुरू जाहले आहे. जो तो राजीनामे तोंडावर फेकू लागला आहे. हे होणारच होते! निवडणुकीतील धक्‍कादायक, अनपेक्षित आणि विपरीत निकालांनंतर आम्हीही तातडीने राजीनामा तोंडावर फेकणार होतो. परंतु राजीनामा नेमका कशाचा द्यावा, हे न कळल्यामुळे बेत नाइलाजाने रद्द करावा लागला.

शिवाय राजीनामा फेकण्याजोगे तोंडदेखील आम्हाला सांपडले नाही. तथापि, राजीनामा देण्यात जे एक नाट्य असते व त्याला आम्ही सपशेल मुकलो, हे मात्र शतप्रतिशत सत्य आहे. मागील वेळी आम्ही पुरस्कार वापसीच्या चळवळीतही हिरिरीने सहभागी झालो होतो. परंतु कुठलाच पुरस्कार आयुष्यात न मिळाल्याने परत तरी काय करायचे, हे न कळल्याने आमचा सहभाग मर्यादित राहिला होता. असो. 

मतांचे धर्मांध आणि जातीय ध्रुवीकरण साधून काही संधिसाधूंनी सरशी साधल्याच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा सपाटा अन्योन्यांनी लाविला, त्यास आमचा पाठिंबा आहे. आमच्याकडे एखादे जबाबदारीचे पद असते तर ते आम्ही आज खचितच सोडले नसते, परंतु राजीनामा मात्र नक्‍की दिला असता! जो राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असा राजीनामा हा प्रशस्तिपत्रापेक्षाही अधिक मोलाचा असतो, येवढे आम्हाला नक्‍कीच कळते. किमानपक्षी राजीनामा दिल्याचे आम्ही निदान जाहीर तरी नक्‍की केले असते. मगर... मगर ये हो न सका! 
तरीही अन्योन्यांप्रमाणेच, (निवडणुकीतील निकालांनी) आमचाही पुरता भ्रमनिरास झाल्याचे दाखवून देणे क्रमप्राप्त होते. -अन्यथा आम्हांस वैचारिक कोण म्हणेल? त्यात आम्ही पडलो प्रखर वैचारिक...

इतके प्रखर की ऐन निवडणुकीच्या काळात आम्ही भयंकर प्रतिज्ञा करून बसलो!! देश अत्यंत धोकादायक स्थितीतून मार्गक्रमणा करीत असून, धार्मिक ध्रुवीकरणाचे ढग घोंघावत आहेत, (आमच्यासारख्या) सेकुलर वैचारिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत क्‍लेशकारक आहे. तस्मात, ह्या धर्मांध शक्‍तींना नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही अंगात सदरा घालणार नाही, असे आम्ही ऐन निवडणुकीत जाहीर केले होते. आता ही प्रतिज्ञा अक्षरश: अंगलट आली आहे!! 

त्याचे जाहले असे, की निवडणुकीचे काळात उन्हाळा ऐन भरात असल्याकारणाने आम्ही बव्हंशी वेळ उघड्यावरच घालवला. आमच्या शरीरयष्टीच्या सतत दर्शनाने वैतागलेल्या काही आप्तेष्टांनी आम्हाला ""निदान सदरा तरी घाल बे'' असे वारंवार बजावले. परंतु आम्ही त्या उन्हाळ्यासदेखील वैचारिक डूब दिली!! धर्मांधांचा मतविभाजनाचा कट उधळू, तेव्हाच सदरा अंगावर चढवू अशी जाहीर घोर प्रतिज्ञा करून आम्ही आमचा इरादा "उघडा' केला. परंतु आमच्या इराद्याच्या फासळ्या बघून कासावीस झालेल्या मतदारांनी बहुधा विपरीत कौल दिला असावा, असा आमचा संशय आहे. 

आता निवडणुकीतील हारजितीचा आणि सदरा घालण्या- न घालण्याचा संबंध काय, असे तुम्ही विचाराल. वैचारिक घामोळे आलेल्यांना आमच्या ह्या घोर प्रतिज्ञेचा अन्वयार्थ लागणार नाही!! धर्मांधांची सत्ता उलथत नाही, तोवर मी लग्न करणार नाही, अशी शपथ एका प्रखर व्यक्‍तिमत्त्वाच्या युवतीने घेतल्याचे "फेसबुका'वर ऐकून आम्ही काही काळ विचलित झालो होतो. (त्या युवतीस आता पांच वर्षे थांबणे आले!!) ते ऐकूनच आम्हाला सदऱ्याच्या राजीनाम्याची कल्पना स्फुरली होती. आता पांच वर्षे आम्हाला उघड्यावर काढावी लागणार आहेत, ह्या कल्पनेनेच अंगाची आगाग होत आहे. 

अतएव, आमच्या प्रतिज्ञेत आम्ही एव्हापासून किंचित बदल करीत आहो! तो असा : आम्ही दिवसा सदरा घालू व रात्री काढून ठेवत जाऊ. तसेच तो दर महिन्यात एकदा (तरी) पाण्यात घालू. त्यायोगे आम्ही देशाचे बहुमूल्य असे पाणी वाचवू!! आमचा हा विधायक राजीनामा तत्काळ मंजूर होईल, ही अपेक्षा आहे. इति. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com