ढिंग टांग! : फादर्स डे! 

ब्रिटिश नंदी
सोमवार, 17 जून 2019

स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत! 
काळ : तोदेखील हवेतच! 
प्रसंग : उडता! 
पात्रे : आपलीच लाडकी!! 

स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत! 
काळ : तोदेखील हवेतच! 
प्रसंग : उडता! 
पात्रे : आपलीच लाडकी!! 

(...विमान उडत आहे. मा. उधोजीसाहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत आहेत. अधून मधून ते कुर्सी की पेटी नीट बांधली आहे की नाही, हे तपासून बघत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर चि. विक्रमादित्य खिडकीतून खाली बघत आहेत. अब आगे...) 

चि. विक्रमादित्य : (कुतूहलानं) बॅब्स...तुम्ही काय पुटपुटताय? 
उधोजीसाहेब : (पुटपुटणं वाढवत) मनोजवं मारुततुल्य वेगं। जीतेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं...वातात्मजं वानरयूथमुख्यं.....(त्याच चालीत) गप्प बसायला घेशीऽऽल कायऽऽ...! 
विक्रमादित्य : (संशयानं) कसले मंत्र म्हणताय? विमानात घाबरता वाटतं बसायला! 
उधोजीसाहेब : (उसळून) काय पहिल्यांदा बसलोय विमानात? रामरक्षा म्हणतोय फक्‍त!! 
विक्रमादित्य : (जनरल नॉलेजपोटी) पण रामरक्षा भूत बघितल्यावर म्हंटात ना? 
उधोजीसाहेब : (कळवळून)...कोण सांगतं रे तुला असल्या गोष्टी?

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) रामरक्षा म्हणण्याऐवजी कुर्सी की पेटी बांधा!! इट्‌स सेफ!! 
उधोजीसाहेब : (संयमाने) तर्जनं यमदूतानां राम रामेती गर्जनं...तू झोप कसा तुझ्या कुर्सीत!! माझं मी बघतो!! 
विक्रमादित्य : (उत्साहाने) बॅब्स...आपण कुठं चाललोय? 
उधोजीसाहेब : (मनोभावे हात जोडत) श्रीरामप्रभूंच्या अयोध्येला!! 
विक्रमादित्य : (बालसुलभ कुतूहल कंटिन्यू...) व्हाय? 
उधोजीसाहेब : (कटकटून) रामो राजमणि सदा विजयते। रामे रमेशं भजे..!! का म्हंजे? इलेक्‍शनपूर्वी आलो होतो ना, तसंच आलोय!!

विक्रमादित्य : (गुपित फोडल्यागत) तुम्ही नवस बोलला होता ना? की इलेक्‍शनमध्ये जितके खासदार जिंकून देशील, तितके तुझ्या पायावर घालीन म्हणून!! 
उधोजीसाहेब : (कसनुसा चेहरा करत) काहीत्तरीच! कोण म्हणतं असं? 
विक्रमादित्य : (हट्‌टाने) मग का चाललोय आपण अयोध्येला? 
उधोजीसाहेब : (समजूत घालत) आपल्या श्रीरामप्रभूंना मंदिर बांधून द्यायला नको का? ते आपलं कर्तव्यच आहे!! 
विक्रमादित्य : (उत्साहात) ग्रेट!! आपण तिकडे गेलो की लगेच मंदिराचं कंस्ट्रक्‍शन सुरू होणार? 
उधोजीसाहेब : (बेसावधपणे) छे...ही काय मुंबई आहे का? (भानावर येत) म्हंजे...सरकारी काम आहे ते! वेळ लागतोच!! कोर्ट-कज्जे, राजकारणं वगैरे निपटलं की मग बांधकाम!! 
विक्रमादित्य : (गंभीरपणाने) मग तुम्ही रामरक्षा का म्हणताय?

उधोजीसाहेब : (गुळमुळीतपणे) दर शनिवारी मारुतीच्या देवळात जाताना आपण "भीमरूपी महारुद्रा' म्हणतोच ना! मग रामाच्या मंदिरात जाताना रामरक्षा नको म्हणायला? 
विक्रमादित्य : (युक्‍तिवाद करत) पण रामाचं मंदिर आहेच कुठे तिथे!! बांधायचं आहे ना? 
उधोजीसाहेब : (सर्द होत) होईल, होईल! तुम देखते रहना!! एक दिवस मंदिर वही बनाएंगे!! 

विक्रमादित्य : (उदास होत) ऍक्‍चुअली आपण आज मुंबईतच राहायला हवं होतं! आज मुंबईत शपथविधी होतोय, आणि आपण इथे!! ह्याला काय अर्थय? 
उधोजीसाहेब : (कुजबुजत) गप्प बैस! मुंबईत शपथविधी होतोय, म्हणूनच तर आपण अयोध्येला चाललोय!! 
विक्रमादित्य : (थोडावेळ विचार करत) निवडणुकीनंतर आपल्या आमदारांना कुठे नेणार आहात? 

उधोजीसाहेब : (उडवून लावत) ते कमळवाले काय करतात, त्यावर अवलंबून आहे!! ह्या लोकांचा काही भरवसा नाही!! (दात ओठ खात ओठांची भेदक हालचाल करत) त्यांना माहीत नाही, रिश्‍ते में तो हम उनके बाप होते है, नाम है... 
विक्रमादित्य : (निरागसपणे) काय म्हणालात? कोण कोणाचा बाप म्हणालात? 

उधोजीसाहेब : (अजीजीने) गप्प बैस ना!! राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम ततुल्यं रामनामे वरानने... 
विक्रमादित्य : (अचानक आठवून) बॅब्स...बापावरून आठवलं! हॅप्पी फादर्स डे!! 

-ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Dhing Tang Article