गारठलेले वर्तमान ! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

यंदा नेमके थंडीनेही आपल्याला असे खिंडीत गाठले. हा हवामानाचा ऋतुसंमत लहरीपणा म्हणून सोडून द्यायचे की पृथ्वीच्या हवामानात होणाऱ्या घातक बदलांचाच हा परिपाक?

वसंत पंचमीची हिरवीकोवळी चाहूल लागली की चराचरावरची थंडीची पकड हळूहळू ढिली होत जाते. हवेत गारवा रेंगाळत असतो, पण शिशिराचा तडाखा कमी झालेला असतो. होळीच्या आसपास ही हिमलाट फारशी उरतही नाही. परंतु यंदा मात्र महाराष्ट्रात वसंत पंचमी पुरती गारठलेली उगवली. गेला जवळपास महिनाभर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाचा काही भाग जीवघेण्या थंडीच्या लपेट्यात आला आहे. नाशिकमध्ये गंगेच्या घाटावर दोन ज्येष्ठांचा थंडीमुळे मृत्यू ओढवला आहे, तर निफाडमध्ये पारा शून्याच्या नजीक घसरत चालल्याचे दिसून आले. महाबळेश्‍वरी वेण्णालेकच्या आसपास हिमकणांची पखरण दिसून आली.

मराठवाडा आणि विदर्भातील थंडीची लाट अजूनही काढता पाय घ्यायला तयार नाही. थंडीमुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आपल्याकडे क्‍वचितच पाहायला मिळते. यंदा महाराष्ट्रावर तीही वेळ आली. मुंबई-पुण्याच्या शहरी लोकांचे मफलर-स्वेटर महिना उलटला तरी बासनात जायला तयार नाहीत. मुंबईच्या दोन्ही वेधशाळांमध्ये पारा एकांकी तापमानाकडे गेल्याची नोंद झाली. एरवी ऐन थंडीत छताच्या पंख्याचा वेग कमी करणे, एवढाच मुंबईकरांचा थंडीशी संबंध येई. थंडी आलीच तर मुंबईच्या गर्दीत दोन-चार दिवसांपेक्षा अधिक काळ तिचा निभाव लागत नसे. या वर्षी मात्र सर्दी-खोकल्याच्या रुग्णांनी खासगी दवाखाने आणि इस्पितळे गजबजली. थंडीच्या लाटेच्या पाठोपाठ रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यताही वर्तवली जात असल्याने काळजी करण्याजोगी परिस्थिती आहे. पाठोथंडीचा कडाका, त्यात पाचवीला पुजलेले प्रदूषण या दुहेरी पेचात मुंबई-पुण्याचे नागरिक बेजार झाले आहेत. पुण्यात तर थंडीने दशकात दुसऱ्यांदा सर्वांत न्यूनतम तापमान नोंदवले गेले. 2012 च्या फेब्रुवारीतही पुणेकर असेच गारठले होते. नाशिकनजीकच्या द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचा उरलासुरला घासही ही थंडी काढून घेईल असे भय निर्माण झाले आहे. 

हिवाळ्याच्या काळात पश्‍चिमेकडील कास्पियन आणि भूमध्य समुद्रात उद्‌भवणाऱ्या प्रतिकूलतेच्या परिणामामुळे ही शीतलाट आली आहे, असे हवामानतज्ज्ञ सांगतात. गारठवून टाकणारे भणाण वारे कास्पियन समुद्राच्या पृष्ठभागालगतचे बाष्प उचलतात आणि अधिकच थंड होऊन वेगाने इराण, अफगाणिस्तान वा पूर्व पाकिस्तान गोठवत उत्तरेकडून भारतात शिरतात. या थंडगार वाऱ्यांनी आधी काश्‍मीर, हिमाचल प्रदेशात कहर केला. राजधानी दिल्लीतही गारपीट करून राजस्थानमार्गे पुढे कूच केले. आणि आता महाराष्ट्रालाही हुडहुडी भरवली आहे. अशा प्रकारचे प्रतिकूल हवामान साधारणत: संपूर्ण हंगामात तीन-चारदा उद्‌भवते. पण या वर्षी तब्बल नऊ वेळा थंड लहरींनी महाराष्ट्र घुसळून काढला. एकट्या फेब्रुवारीच्या पहिल्या दहा दिवसांत तीन वेळा हे शीतहल्ले झाले आहेत. येत्या दोनेक दिवसांत थंडीचा हा उत्पात कमी होईल, असा दिलासा हवामान विभागाने दिला असला तरी काही प्रश्‍न अनुत्तरितच राहतात.

थैमान घालणारा पाऊस आणि हवालदिल करणारा उन्हाळा महाराष्ट्राला पुरता परिचित असताना यंदा नेमके थंडीनेही आपल्याला असे खिंडीत का गाठले असावे? हा हवामानाचा ऋतुसंमत लहरीपणा म्हणून सोडून द्यायचे की पृथ्वीच्या हवामानात होणाऱ्या घातक बदलांचाच हा परिपाक मानायचा? जानेवारी महिन्यात आर्क्‍टिक खंडातील बर्फाळ चक्रवाती हालचालींचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या उत्तर भागाने हिमलाटेचा कहर सहन केला होता. त्या हिमचटक्‍यांनी होरपळलेली अमेरिका अजूनही पुरती सावरलेली नाही. परंतु महाराष्ट्रासारख्या उष्णकटिबंधातील मुलखात दवबिंदू गोठवण्यापर्यंत थंडीची मजल जावी, हे पर्यावरणीय आक्रित समजायचे की आणखी काही? जागतिक हवामानात घातक बदल होत चालल्याची हाकाटी जगभरातील वैज्ञानिक वेळोवेळी देत आहेत. मानवाने चालवलेल्या सृष्टीच्या मनमुराद संहाराचा हा परिणाम असून यातून वाचण्याची वेळ बहुधा निघून गेली आहे, असे अनेक शास्त्रवेत्ते म्हणतात.

शेकडो स्वयंसेवी संस्था पर्यावरण जतनाच्या कामी जगभर विविध स्वरुपाची कामे करत असली तरी त्यात होणारी अब्जावधी डॉलरची उलाढाल दरवेळी सत्कारणीच लागते असे नाही, ही वस्तुस्थिती आहे. यंदाच्या हिवाळ्यात महाराष्ट्राला थंडीने दिलेला हा झटका पुढे वाढून ठेवलेल्या हवामान संकटाची चाहूल तर नसावी ना? सामान्यांच्या या भयशंकांचे तज्ज्ञांकरवी निरसन होण्याची तूर्त गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article