एग्झिट पोल के बाद! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

राजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले. तेथल्या हिरवळीवरील उलटे दोन पाय बघून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. थोडे हुश्‍श केले. 
""प्रणाम नमोजीभाई,'' झालेल्या पायपीटीने दमलेल्या मोटाभाईंनी पिंपळाच्या झाडाखालच्या सुशोभित पारावर बसकण मारली. 

राजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले. तेथल्या हिरवळीवरील उलटे दोन पाय बघून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. थोडे हुश्‍श केले. 
""प्रणाम नमोजीभाई,'' झालेल्या पायपीटीने दमलेल्या मोटाभाईंनी पिंपळाच्या झाडाखालच्या सुशोभित पारावर बसकण मारली. 

""हुं:!!'' नमोजीभाईंनी हुंकार भरला. तो शीर्षासनाचा परिणाम होता की प्रतिप्रणाम? मोटाभाई गोंधळात पडले. बराच वेळ ते फक्‍त घाम पुसत बसून राहिले. शीर्षासनातून नॉर्मल पोझिशनला येत नमोजीभाईंनी पद्‌मासन घालून कपालभाति केली. 
""एग्झिट पोलच्या निकाल बघितला के?,'' मोटाभाईंनी विचारले. 

""हुं:!!'' उत्तरादाखल पुन्हा हुंकार आला. हा मात्र पद्‌मासनाचा परिणाम नव्हता. नमोजीभाईंची मुद्रा काहीशी त्रासिक दिसली. 
""असल्या एग्झिट पोलवर कोण विश्‍वास ठेवतो?,'' कडवटपणाने नमोजीभाई म्हणाले. मोटाभाई पुन्हा बुचकळ्यात पडले. हल्ली मीडियावाल्यांच्या विकले जाण्याबद्दल फार ऐकू येते. मीडिया ही वस्तू फक्‍त विकण्याजोगी असून, कुणीतरी ती सतत विकत घेत असते, असे मोटाभाईंच्या लक्षात आले. ज्याअर्थी मीडियाच्या एग्झिट पोलवर नमोजीभाईंचा विश्‍वास नाही, त्याअर्थी त्यात काही राम नाही, असा विचार करून मोटाभाईंनी विषय सोडून दिला. 

""इलेक्‍शननंतर काय करायचे, हे विचारायला आलो होतो...,'' मोटाभाईंनी अखेर विषय काढलाच. 
""कुठलं इलेक्‍शन? 2024 सालचं?'' नमोजीभाईंनी चमकून विचारले. मोटभाईंच्या मनात एकदम कळ आली. मनात विचार आला, की 2024 सालानंतर तर आपल्याला बहुधा शेअर मार्केटमध्ये पुन्हा उतरावे लागणार... 
""एग्झिट पोलच्या पाहणीनुसार चार राज्यांतली इलेक्‍शनं तर आपल्या हातातून गेलीच! सेमीफायनलमध्येच औट झाल्यावर पुढल्या वर्षीच्या फायनलमध्ये कोण लढेल?,'' मोटाभाईंचा आवाज नकळत रडवेला झाला होता. 
""कोण लढेल म्हंजे? अरे तमे चिंता मत करजो! बद्धा ठीक हुई जशे!!'' नमोजीभाईंनी आश्‍वासक सूर लावला. 

""खरंच म्हणता?'' अधीर होऊन मोटाभाई म्हणाले. 
""...असा मीच मला धीर देत असतो अधूनमधून!'' नमोजीभाईंनी पुन्हा एक दीर्घ श्‍वास घेतला. ओह! मोटाभाईंचा चेहरा पुन्हा पडला. ही चार राज्यांतली इलेक्‍शने चांगली लागली तर पुढे ठीक होईल. पण चिन्हे तरी बरी दिसत नाहीत. ह्या एग्झिट पोलवाल्यांनी सगळा बट्ट्याबोळ केला. खरे तर एग्झिट पोल नावाचा प्रकार कायद्याने बंदच केला पाहिजे. निवडणुकीआधीच झोप उडवण्याची ही लाइन लोकशाहीच्या शतप्रतिशत विरोधी आहे. "कमल मुरझायेगा?' असे मथळे देऊन हे मीडियावाले एग्झिट पोलचे आकडे दाखवू लागले की काळीज कसे थरकापते... 

"हवे शुं करवानुं?'' मोटाभाईंनी निर्वाणीच्या सुरात एकदाचे पुन्हा विचारले. नमोजीभाईंची योगासने पुरी होत आली असावीत. कारण प्रसन्न हसत त्यांनी मोटाभाईंकडे पाहिले. 
""जुओ, नमोजीभाई! मने तो कछु ठीक लागतो नथी!! हा असाच च्यालू ऱ्हायला तर...तर...तर...'' मोटाभाईंना शब्द सुचेना. हे इलेक्‍शन तर गेल्यात जमा आहे. पुढे काय? हे कळायला नको का? 

नमोजीभाई बराच वेळ काही बोलले नाहीत. मग त्यांनी पुढे काय करायचे त्याचा प्लॅन सांगितला. उजव्या हाताची तर्जनी आणि आंगठा एकत्र जुळवून गंभीर मुद्रेने त्यांनी सल्ला दिला. 
""मोटाभाई, तमे हवे योगा करजो, योगा!!... इलेक्‍शननंतर आपल्या दोघांनाही बहुधा योगासनांची शिबिरे घेत फिरण्याची वेळ येणार आहे... आधीच शिकून घ्या! कसं?'' 
...हे ऐकून मोटाभाईंची कपालभाति आपोआप सुरू झाली. 

- ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article on Dhing Tang