रोमन हॉलिडे! (ढिंग टांग!)

रोमन हॉलिडे! (ढिंग टांग!)

रोम, दिनांक (माहीत नाही) वार (माहीत नाही) : गेले तीन-चार दिवस रोमच्या रस्त्यांवरून हिंडतो आहे. महाराष्ट्रातील मतदान आटोपून तडक विमानात बसून सहकुटुंब इटलीला रवाना झालो. मनात म्हटले, संपली आमची निवडणूक! आता काय तो गोंधळ घाला!! नाही म्हटले तरी प्रचारात भयंकर दगदग झाली होती. महाराष्ट्रातील उन्हापासून सुटका करण्यासाठी इथे यावे लागले. संपूर्ण दौऱ्यात कुणीही राजकारण किंवा मतदान वगैरे उल्लेखसुद्धा करायचे नाहीत, अशी अट घालूनच निघालो होतो. 
अयोध्येचा दिग्विजयी दौरा पार पाडल्यानंतर आमच्या रामभक्‍तीत विलक्षण चेतना निर्माण झाली.

महाराष्ट्रातल्या मतदारांना त्याची चुणूक दिसलीच असेल! अयोध्येत गेलो असताना कुणीतरी सांगितले होते की, खरे रामराज्य पार रोमपर्यंत पसरले होते. इतकेच नव्हे, तर रोमचे प्राचीन नाव रामनगर असेच होते. रामचेच पुढे रोम झाले म्हणे. अयोध्या सरयु नदी काठी आहे, तर रोम टायबर नदीच्या तीरावर... एकंदर साम्य चिक्‍कार होते. ऊर अभिमानाने भरून आला. तेव्हाच ठरवले होते की अयोध्येनंतर आता थेट रोममध्ये जाऊन राम मंदिराचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करायचा. त्यासाठी इटलीचा दौरा काढणे भाग होते. येताना ब्यागेतून धनुष्यबाण आणावा, असे चि. विक्रमादित्य ह्याने सुचवले होते. पण नाही आणला! विमानात शस्त्र नेता येत नाही, हे सामान्य ज्ञान त्याला देऊन थोडे खट्‌टू केले. असो. 

रोममध्ये गेल्यावर रोमनांसारखे वागावे असे म्हणतात, असे चि. विक्रमादित्य म्हणत होता. मला बिलकुल मान्य नाही. गुडघ्याइतके लोखंडी बूट घालून, बोजड शिरस्त्राणासहित रोमच्या रस्त्यावरून आपण कसेबसे हिंडतो आहोत, ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. एवढ्या वजनदार चिजा अंगावर बाळगून रोमन योद्धे युद्ध तरी कसे करीत होते, देव जाणे! ते भयंकर बूट, चिलखत, शिरस्त्राण एवढा जामानिमा अंगावर चढवण्याच्या आत युद्ध संपत असेल!! 

...रोमच्या रस्त्यावर (क्‍यामेरा गळ्यात घालून) हिंडत होतो. तेवढ्यात चि. विक्रमादित्याने शर्टाचे टोक खेचून सांगितले, ""बॅब्स...ते बघा! देवेन अंकल तर नाहीत ना?'' 
समोरून एक काळ्या कोटातील इसम चालत येताना दिसला आणि दचकलोच. माणूस डिट्‌टो फडणवीसांसारखा दिसत होता. विषाची परीक्षा नको, म्हणून मी सरळ फूटपाथ बदलला. निवडणूक संपल्यानंतरही तेच तेच चेहरे काय बघायचे? पण त्या इसमाने घाईघाईने गाठलेच. पण हा गृहस्थ "तो' नव्हता. 

"बोन्जुर्नो!'' तो म्हणाला. आपल्याला अजूनही इटालियन येत नाही, आणि शिकायची इच्छासुद्धा नाही. सभ्यपणाने मी हस्तीदंती करून एक नेमस्त मराठी नमस्कार ठोकला. 
""मि स्कुस्सी...एक्‍सक्‍युज मी... इंदियन?'' त्याने विचारले. मी अर्थातच हो म्हणालो. (खुलासा : "हो' हे मराठीत म्हणालो. इतालियनमध्ये "हो' ला काय म्हंटात कुणाला माहीत?) त्यावर तो दिलखुलास हसला. 

"ग्रात्स्य... म्हणजे थॅंक्‍यू! माझं नाव डॉन बासरी मोडलीनी!!,'' त्याने ओळख करून दिली. बासरी मोडलीनी हे काय नाव झाले? पण असेल बुवा, आपल्याला काय करायचंय? मी मराठी नेमस्तपणाने आडनाव सांगितले. त्यावर तो एकदम दचकला. "ओई ओई ओई' असे काहीतरी ओरडत त्याने हातवारे केले. मला काही टोटल लागली नाही. 

मि स्कुझी... पोसे फार्ले उनो दोमांदा? पेर फावोरे...,'' सदर मनुष्य इतालियन भाषेत अजीजी करीत आहे, एवढेच कळले. तो पुढे म्हणाला, आणि खचलोच... 
""सिन्यॉर उद्धवसाहेब... मोदीजी जिंकणार की रागा?'' 
तात्पर्य : निवडणूक ही वस्तू मराठी माणसाची कॉलर धरली की सोडत नाही म्हंजे नाहीच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com