मनस्वी आणि झुंजार (मुद्रा)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

"एवढी उंची आहे तर तू बॉक्‍सिंग का करीत नाहीस?' असा प्रश्‍न शिक्षकांच्या पत्नीने विचारला तेव्हा सुरवातीला पूजा काही फार उत्सुक नव्हती. ग्लोव्हज्‌ घालायचीही तिची इच्छा नव्हती.

"एवढी उंची आहे तर तू बॉक्‍सिंग का करीत नाहीस?' असा प्रश्‍न शिक्षकांच्या पत्नीने विचारला तेव्हा सुरवातीला पूजा काही फार उत्सुक नव्हती. ग्लोव्हज्‌ घालायचीही तिची इच्छा नव्हती. "आधी तुम्ही ते घालून दाखवा' असा हट्ट तिने धरला. त्या क्षणी ही मुलगी पुढे सुवर्णपदकविजेती ठरेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण, खरोखर तिचा प्रवास त्या दिशेने झाला. ती आशियाई बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. बॉक्‍सिंग आणि भिवानी हे समीकरण सार्थ झाले. 

दहा वर्षांतील ही वाटचाल सोपी नव्हती. यादरम्यान वडिलांच्या विरोधास सामोरे जावे लागले. स्पर्धा काही आठवड्यांवर असताना हात भाजले. खांदा दुखावल्याने कारकीर्दच धोक्‍यात आली. पण, या सर्व अडथळ्यांवर मात करीत 28 वर्षीय पूजा आशियाईविजेती ठरली. अकादमीतील मार्गदर्शकांच्या मदतीने पूजाने वडिलांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केले. सहा महिन्यांनी यश आले. पण, तोपर्यंत आई-वडिलांपासून दुखापती लपविण्यासाठी तिला बरेच सायास करावे लागत. प्रशिक्षक तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. प्रसंगी आपल्या घरी तिला राहायला सांगून तिचा सराव नीट चालू राहील, हे त्यांनी पाहिले. भारतीय महिला बॉक्‍सिंग म्हणजे केवळ मेरी कोम, सरिता देवीच नाही, हेच पूजाने केवळ आपल्या ठोशांनी दाखवून दिले. पूजा ही प्रत्येक वेळी प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला पुढे आणते. पण, तिच्या प्रगतीस खरी चालना मिळाली ती जागतिक स्पर्धेसाठी संघाबाहेर गेल्याने.

दिल्लीतील या स्पर्धेत पूजा स्थान मिळवू शकली नाही आणि त्याने चित्र बदलले. राष्ट्रीय शिबिरातील मार्गदर्शक तिला "खूप काही करू शकतेस. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करशील. पण, जो काही थोडासा आळस अंगात भरला आहे तो सोडून दे,' असे सांगत होते. पूजाला ते कळत होते. पण, वळत नव्हते. मायदेशातील जागतिक स्पर्धेसाठी संघाबाहेर राहिल्यावर ती जागी झाली. तिने आपल्यातील गुणवत्तेस पूर्ण न्याय देण्यासाठी स्वतःला झोकून दिले.

पूजा स्वतःला खेळात पूर्णपणे झोकून देते आणि हेच तिच्या यशाचे रहस्य आहे. जागतिक स्पर्धेत तेच सिद्ध झाले. "आम्हाला तिच्याकडून हेच अपेक्षित होते,' हे भारतीय मार्गदर्शक अली कमार यांचे वक्तव्य तिच्याविषयीचा विश्‍वास दर्शविणारे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article Mudra