समन्वयाचा ठाम सूर (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

बिनवादाच्या शांत मंडपात अचानक वादाचे ढोल वाजले. ढोलांचा आवाज वाढत गेला आणि एका क्षणी शांतावलाही. साहित्य संमेलनाला वाद नवे नाहीत. राजकारणही नवे नाही. पण न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या नेमस्तपणात साहित्य संमेलनाचा पाया रचला गेला आहे. हे नेमस्तपण यवतमाळच्या संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या भाषणातही दिसले. नेमस्तपण म्हणजे मवाळपण नव्हे; तर समन्वय होय. समन्वयाला कदाचित झगमगाट लाभत नसेल, पण तो डोळे दिपवून विझून जात नाही; तर अंतिमतः समाजहित साधत टिकून राहतो. त्यात गर्जनेचा जोर नसेल, पण ठाम सूर असतो. अचानक उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ.

बिनवादाच्या शांत मंडपात अचानक वादाचे ढोल वाजले. ढोलांचा आवाज वाढत गेला आणि एका क्षणी शांतावलाही. साहित्य संमेलनाला वाद नवे नाहीत. राजकारणही नवे नाही. पण न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या नेमस्तपणात साहित्य संमेलनाचा पाया रचला गेला आहे. हे नेमस्तपण यवतमाळच्या संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या भाषणातही दिसले. नेमस्तपण म्हणजे मवाळपण नव्हे; तर समन्वय होय. समन्वयाला कदाचित झगमगाट लाभत नसेल, पण तो डोळे दिपवून विझून जात नाही; तर अंतिमतः समाजहित साधत टिकून राहतो. त्यात गर्जनेचा जोर नसेल, पण ठाम सूर असतो. अचानक उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. ढेरे यांच्या भाषणात असाच समन्वयाचा ठाम सूर ऐकू आला.

समाजमाध्यमांच्या उथळ कार्यशैलीत तत्काळ व्यक्त होण्याला महत्त्व आले आहे. कोणत्याही घटनेवर क्षणभर थांबून विचार करण्याची आवश्‍यकता असते आणि मग विचारपूर्वक व्यक्त व्हायचे असते, तेच या काळात विसरले जात आहे. स्वाभाविकच ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या "निमंत्रणवापसी'वर संमेलनाध्यक्षांनीही लगेच व्यक्त व्हायला हवे, असा आग्रह धरीत त्यांना सल्ले दिले गेले होते. समोरच्याच्या विवेकीपणावर विश्‍वास नसण्याच्या या काळात, पदाच्या स्वार्थापायी त्या "मौनव्रती' झाल्याचा आरोपही केला गेला. पण मुळातच या पदाचा लोभ नसणाऱ्या आणि आताही कृतज्ञतेने ते पद स्वीकारणाऱ्या डॉ. ढेरे यांनी त्यांच्या नेहमीच्या संयतपणाने सगळ्या घटना घेतल्या. साहित्यिकाने सत्यासाठी ठाम उभे असले पाहिजे. एरवी सार्वजनिक जीवनापासून दूर असणारे, पण आपल्या संशोधनातील सत्यासाठी सार्वजनिक जीवनात उतरून, प्रसंगी सत्तेविरुद्धही लढणारे डॉ. रा. चिं. ढेरे यांची कन्या असलेल्या अरुणाताईंनी तोच वारसा येथेही सांभाळला आणि योग्य मंचावरून ठामपणे निमंत्रणवापसीची घटना अतिशय नामुष्कीची व निषेध करण्याचीच असल्याचे सांगितले.

सहगल यांच्या येण्याने काय साधले असते हेही सांगितले. संयोजकांची चूक त्यांच्या पदरात घालतानाच समाज म्हणून आपण काय चूक करीत आहोत, हेही त्यांनी लक्षात आणून दिले. समाजात, साहित्यात किंबहुना विचारांमध्येही बहुविधतेची आवश्‍यकता असते आणि सहिष्णू विचारांची प्रक्रिया निरोगीपणाने चालू राहिली पाहिजे हे आग्रहाने सांगितले. धर्माच्या, संस्कृतीच्या, परंपरांच्या नावाने झुंडशाही धुमाकूळ घालत असताना भारतीयत्वाच्या प्राणभूत संकल्पनांवरचे आपले लक्ष विचलित होता कामा नये. दैनंदिन व्यवहारातील न्याय आणि औदार्य झुगारून दिले जात असताना चूप राहता कामा नये. पण त्याचबरोबर झुंडीला झुंडीचे उत्तर असता कामा नये. कोणत्याही सत्तेला परिवर्तन नको असते. सत्ता स्थितीशीलप्रिय असते, तर गतिमान जीवनातून निर्माण होणारे साहित्य परिवर्तनाची प्रक्रिया सुरू ठेवते. सत्ता अधिकाधिक स्थितीशील असतानाच्या काळात साहित्य, साहित्यिक यांची समाजासंदर्भातील जबाबदारी वाढते.

साहित्याकडून समाजपरिवर्तनाची प्रक्रिया संथगतीने सुरूच राहते, पण मुख्यतः साहित्य परिवर्तनाची दिशा दाखवत असते. साहित्यिकाने प्रवाहाबरोबर वाहात जायचे नसते, तर प्रवाहात उभे राहून प्रवाहाला दिशा दाखवायची असते, हे आजच्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणीय कृतीतून दिसले. लोकसंस्कृतीतून तयार झालेले साहित्य प्रवाही राहिले होते. संतसाहित्याने समाजाला परिवर्तनाची दिशा दाखवली होती, याकडे संमेलनाध्यक्षांनी लक्ष वेधले आहे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणाची चाकोरी तयार झाली आहे. ठराविक मुद्‌द्‌यांभोवती विचारांची गुंफण केली जाते. डॉ. ढेरे यांच्या भाषणात ही चाकोरी टाळलेली आहे. परंपरेच्या प्रवाहीपणाचे डोळस विश्‍लेषण करीत परंपरेतूनच वाङ्‌मयाला सत्ता निरपेक्ष सामर्थ्य आणि लढाईचे बळ मिळत असते हेही समजावून सांगितले आहे.

सध्या याचाच विसर पडत आहे. कोणत्याही काळातील साहित्याने माणसाच्या उन्नत्तीचाच विचार आपल्यासमोर ठेवलेला असतो. ते कायम माणुसकीचा धर्म सांगणारे आणि न्यायाच्या बाजूने उभे राहिलेले दिसते. समाजापुढच्या समस्यांची उकल करून ते दिशा देत असते. तरीही सध्याची जगण्याच्या परिघातील गुंतागुंत पाहता निर्मितीतील सर्वस्पर्शी आवाहकता टिकवणे हा साहित्यिकांपुढचा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाचे उत्तर, किमान त्याची दिशा दाखवली जायला हवी. समाजात बहुविध विचार असले पाहिजेत आणि त्यांचा समन्वयही असला पाहिजे. आज झुंडीने झुंडीला उत्तर दिले जात आहे आणि लढे मात्र एकेकट्याने लढले जात आहेत. त्यामुळेच साहित्यातील सहतत्त्व नष्ट होते आहे, यावर संमेलनाध्यक्षांनी बोट ठेवले आहे.

अविचारी झुंडींचे भय, देशी साहित्यपरंपरेची मुळे उखडली जाण्याचे दुःख, स्त्रीजीवनातील द्वंद्व याविषयीचे चिंतन मांडले आहे. हा काळ विसंगतींनी भरलेला असला तरीही हेच दुसरे प्रबोधनाचे युग असल्याचे म्हटले आहे. साहित्याच्या विश्‍वभानाची जाणीव करून देणारा समन्वयाचा ठाम सूर मराठी साहित्यात दीर्घकाळ ऐकू येत राहील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article on Sahitya Sammelan