आम्लात विरघळलेले 'सत्य' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येतील सत्य खणून काढण्याचा निर्धार दिसत नाही, ही धक्कादायक बाब आहे. सौदी अरेबियाच्या बाबतीत जी बोटचेपी भूमिका घेतली जात आहे, त्यामुळे सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका बळावते. 

सौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या तपासावरून सुरू असलेले राजकारण आणि टोलवाटोलवी धक्कादायक नि संतापजनक आहे. ही हत्या नेमकी कुणी केली, तिच्या कटाचे सूत्रधार कोण, याच्या मुळाशी जाण्याची कोणाची इच्छा आहे की नाही, असाच प्रश्‍न त्यामुळे निर्माण होतो.

सौदी अरेबियाचे राजपुत्र महम्मद बिन सलमान यांचाच या हत्येत हात असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी हे राजघराणे सातत्याने त्याचा इन्कार करीत आहे. मात्र आतापर्यंत याविषयी जे काही खुलासे त्यांच्याकडून केले गेले, ते संशय कमी करण्याऐवजी अधिक गडद करणारे आहेत. सौदी राजघराण्याशी आणि त्यातही महम्मद बिन सलमान यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हत्येविषयी संताप व्यक्त केला खरा; प्रसंगी सौदी अरेबियाच्या विरोधात कारवाई करू, अशा गर्जनाही केल्या. मात्र हा सगळा प्रकार "तू रडल्यासारखे कर... मी मारल्यासारखे करतो, अशा प्रकारचा होता. परंतु, "सेट्रल इंटलिजन्स एजन्सी'ला (सीआयए) खशोगी यांच्या हत्येशी बिन सलमान यांचा संबंध असल्याचे आढळल्याने आणि त्याचे वृत्त बाहेर फुटल्याने ट्रम्प चांगलेच अडचणीत आले आहेत.

"सीआयए'ने असा निष्कर्ष काढणे उतावीळपणाचे असल्याची त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने केलेल्या ढवळाढवळीविषयी माहिती चव्हाट्यावर आणून यापूर्वीही "सीआयए'ने ट्रम्प यांना अस्वस्थ केलेच. अर्थातच त्याहीवेळी आपला हेका त्यांनी सोडला नव्हताच. बिन सलमान यांच्यावर टीकात्मक लिखाण करणारे खशोगी यांची हत्या होऊन दीड महिन्याहून अधिक काळ लोटला आहे; पण त्यांचा मृतदेहदेखील सापडलेला नाही.

तुर्कस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्यांना मारून टाकण्यात आले आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडेतुकडे करून नंतर ते ऍसिडमध्ये फेकून नष्ट करण्यात आले. कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला सुन्न करून टाकेल, असा हा तपशील आहे; पण या हत्येची कारणे खणून काढून सूत्रधारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपापली राजकीय सोय सांभाळण्यात संबंधित राजकारणी गर्क आहेत. सौदी अरेबियाने सुरवातीला हत्या झाल्याचेच नाकारले. नंतर हत्या झाली, हे कबूल करण्यात आले; पण यात बिन सलमान यांचा हात नसल्याची सारवासारव केली. दबाव खूपच वाढल्याने हत्येच्या दिवशी इस्तंबूलला गेलेल्या सौदी अरेबियातील पंधरा जणांसह 18 जणांना अटक करण्यात आली आणि जणू काही त्यांनी हे परस्पर कृत्य केल्याचे भासविण्याचा प्रयत्न सुरू झाला.

आता त्यावरही कडी करण्यात आली असून खशोगी यांना इस्तंबूलमधून पळविण्याच्या सूचना होत्या; मारण्याच्या नव्हेत, असे सौदीच्या सरकारी गोटातून सांगण्यात येत आहे. अशा रीतीने "ध' चा "मा' करण्यात आला, असा पवित्रा घेत हरतेऱ्हेने या किटाळापासून सौदीच्या राजपुत्राला वाचविण्याचा खटाटोप सुरू आहे. 
अमेरिका लोकशाही, मानवी हक्क वगैरे गप्पा कितीही करीत असली तरी अशा प्रकारचे तत्त्वाधिष्ठित राजकारण करण्याचा तिचा इतिहास नाही. शीतयुद्धाच्या काळापासून सौदी अरेबिया हे अमेरिकेचे लाडके बाळ आहे. खनिज तेलाचा साठा हे तर त्याचे कारण आहेच; परंतु मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश म्हणून अमेरिका त्याकडे पाहाते. गेल्याच वर्षी दोन्ही देशांत झालेला यासंबंधीचा करार तब्बल 300 अब्ज डॉलरचा होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना वेसण घालण्यासाठी त्या देशाची मदत रोखण्याच्या घोषणा ट्रम्प यांनी केल्या खऱ्या; पण सौदी अरेबियातूनदेखील ही मदत पुरविली जाते, या वास्तवाबाबत मात्र जणू त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे. बिन सलमान आणि ट्रम्प यांचे जावई क्रुशनर यांचे घनिष्ठ संबंध कधीच लपून राहिलेले नाहीत.

खुद्द ट्रम्प यांच्या कंपन्यांमध्ये सौदीची भरीव गुंतवणूक आहे. जगाला दाखविण्यासाठी खशोगी यांच्या हत्येबद्दल ते त्रागा करीत असले तरी सत्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असल्याचे दिसत नाही. तुर्कस्तानात ही घटना घडली आहे; परंतु त्या देशाचे सर्वेसर्वा एर्दोगानही या निमित्ताने सौदीला जास्तीत जास्त ब्लॅक मेल करून आपले महत्त्व वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.

सुन्नीबहुल देशांचे नेतृत्व सौदीकडून आपल्याकडे यावे, असा त्यांचा प्रयत्न दिसतो. अशा परिस्थितीत काही जणांना फासावर लटकावून सत्य कायमचे गाडून टाकले जाईल की काय, अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रकरणात एका अर्थाने सत्याचीच "ऍसिड टेस्ट' घेतली जात आहे. 

Web Title: Pune Edition Editorial Article in Truth