...रंगकलेचे सार्थक व्हावे! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास असलेल्या मराठी रंगभूमीचे सारे प्रवाह मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले. बदलत्या जगाशी नाळ जुळलेले हे नजीकच्या भूतकाळातले पहिलेच संमेलन ठरावे. त्यामुळे त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला. 

रंगलेल्या नाटकाचा खेळ संपल्यानंतरही त्यातील व्यक्‍तिरेखा रंगभूमीचा ठाव सोडून रसिकांच्या मनात राहायला येतात, तसा भास तूर्त नाट्य संमेलनाला उपस्थिती लावून आलेल्या रसिकांना होत असणार. तब्बल साठ तास चाललेल्या 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा पडदा नुकताच पडला. आता उरतील त्या चर्चा, दिवाळीनंतर येणारा शिमगा आणि अन्य काही नाट्यबाह्य घडामोडी. त्याची रसिकांना तशी सवय आहेच.

रसिकांच्या हाती काहीही लागू न देणारे हे सरकारी अनुदानावर पडणारे संमेलनांचे मांडव म्हणजे अनेक वर्षांचे जुनाट सांस्कृतिक दुखणेच म्हणायचे. तथापि, "असल्या निष्फळ संमेलनांचे उरूस बंद करा' अशी हाकाटी करणाऱ्या टीकाकारांची तोंडे काही अंशी बंद करण्यात हे संमेलन बऱ्यापैकी यशस्वी ठरले. कारण वर्षानुवर्षे न दिसणारी काही सुखद आणि आशादायक दृश्‍ये येथे बघावयास मिळाली. साहजिकच, संमेलनाला प्रतिसादही उत्तम मिळाला. रसिकांचे मागणे लई नाही, हेच यावरून दिसून येते. 

मुंबईत, मुलुंड-भांडुप या उपनगरांमध्ये पार पडलेला हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा झाला. बदलत्या जगाशी नाळ जुळलेले हे नजीकच्या भूतकाळातले पहिलेच संमेलन ठरावे. हेवेदावे, स्वार्थांध खेळ्या, उखाळ्या-पाखाळ्या, रंगकर्मींची आपसातील "टोळीयुद्धे' असल्या सवंग आणि नाट्यबाह्य कारणांनीच ही संमेलने गाजताना रसिक निर्विकारपणे पाहात होता. या साऱ्या गैरमतलब गोष्टींना छेद देणारे यंदाचे संमेलन ठरले. किमान प्रथमदर्शनी तसे दिसले तरी! अखिल भारतीय नाट्य परिषदेची धुरा नव्याने हाती आलेल्या प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे याखातर कौतुक आणि अभिनंदन करायला हवे. पक्षाभिनिवेश, भूतकाळातली कटू भांडणे यांना फाटा देऊन "जुने जाऊ द्या मरणांलागुनी' या उक्‍तीनुसार सर्वसमावेशक असा नाट्यसोहळा त्यांनी तडीला नेला. अर्थात, काही नाराजीचे सूर, गैरसोयी, गैरसमजुती, मानापमान अशा काही ढोबळ चुका झाल्याही असतील. त्याची मन:पूत चर्चा समाजमाध्यमांवर होत आहे आणि यापुढे होत राहील. तथापि, "...काही असले तरी एकंदरीत कार्य मात्र झक्‍क झाले' असा "कच्चा दाखला' देण्यास तरी कोणाचा प्रत्यवाय नसावा. 

व्यावसायिक नाटकांबरोबरच समांतर, हौशी, प्रायोगिक आणि संगीत नाटकांचे सशक्‍त प्रवाह मराठी रंगभूमीच्या आजवरच्या वाढीत मोठे योगदान देऊन गेले आहेत. यातले काही प्रवाह जन्मत: क्षीण होते; तर काहींचा ओघ आटला होता. संगीत नाटकांचा प्रवाह असाच भूमिगत सरस्वतीसारखा. यंदा नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कीर्ती शिलेदार यांनाच मिळाल्याने तो प्रवाह पुन्हा भूतळी अवतरेल काय, येणारा काळच त्याचे उत्तर देईल. मधल्या काळात संगीत नाटकासह अन्य प्रवाहही नाट्य संमेलनांच्या मांडवात चुकूनही दिसत नसत. इथे व्यावसायिक रंगभूमीवाल्यांचाच वावर दिसे. यंदा मात्र संमेलनाच्या मांडवात सतीश आळेकर, विजया मेहता, डॉ. जब्बार पटेल, सई परांजपे आदींची उपस्थिती दिसल्याने सोहळ्याला एकप्रकारे भारदस्तपणा आला. मांडवात कधी नव्हेत, ते विजय तेंडुलकर, सुधा करमरकर, दामू केंकरे अशा दिवंगत नाट्यकर्मींची छायाचित्रेही ठळकपणे लावलेली दिसली. हे सारे अपूर्वच होते. रात्री-अपरात्री तरुण कलावंतांनी सादर केलेल्या एकांकिका, बोलीभाषांमधले मोजके प्रयोग अशा कितीतरी एरवी दुर्लक्षित राहिलेल्या कलाबंधांची दखल या मांडवात घेतली गेली. हे सारे स्वागतार्ह होते. 

साठ तासांच्या या सोहळ्यात राजकीय पुढाऱ्यांची भाषणेही परिपाठानुसार पार पडली; परंतु त्यालाही मर्यादा होत्या. सांस्कृतिकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी परिपाठानुसारच काही घोषणा केल्या आणि अन्य पुढाऱ्यांनीही परिपाठानुसारच या क्षेत्रातील समस्यांना हात घातला. काहीं धुरिणांना मराठी रंगभूमीची उंची खटकली; तर काहींनी संहितेबरोबरच भव्यताही मराठी नाटकात दिसली पाहिजे, असा आग्रह धरला. भव्य सेट उभारले तर तिकिटाचे चढे दर टोचणार नाहीत, असा हा युक्‍तिवाद... कुणी मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे रंगदालन मुंबईत उभे करण्याचे वचन दिले. रसिक आणि रंगकर्मींनी या राजकीय घोषणा नि वचनाबिचनांना फार गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. भव्य नेपथ्याने नाटकांचे प्रेक्षक ओढता येतील, हा युक्‍तिवाद हास्यास्पद आहे. हे म्हणजे "मराठी चित्रपट नीट चालत नसतील, तर बिग बजेट चित्रपट काढा' असे सांगण्यापैकी आहे. 

नाटकाचा प्रेक्षक रोडावला असेल, तर तो बदललेल्या जीवनशैलीचा सर्वाधिक परिणाम आहे. त्याच चौकटीत समस्येचे उत्तर शोधावे लागेल. पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास असलेल्या मराठी रंगभूमीचे सारे प्रवाह या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले, हेच खूप झाले! परिस्थितीवशात दूर पांगलेले मोठे कुटुंब सणासुदीनिमित्त एकत्र यावे, तसा भास रसिकांना झाला. हे मनोमिलन मांडवातच न संपता दीर्घकाळ टिकावे, ही नटेश्‍वराच्या चरणी प्रार्थना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Pune Editorial Article on Cultural